हैदराबाद पोलिसांनी देशभरातील नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. माझा, फँटा, सेव्हन अप, कोका कोला, माउंटन ड्यू, पेप्सी यांसारख्या कोल्ड्रिंक्सच्या (cold drink) बाटलीत कंपनी कामगाराने इबोला व्हायरस (Ebola Virus) संक्रमित रक्त मिसळले आहे. त्यामुळे येते काही दिवस अशी शीतपेये पिऊ नका, अशा सूचनांचा यामध्ये समावेश असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
व्हायरल दावा:
‘प्लीज सभी मित्रो फोर्वर्ड करे Hyderabad पुलिस की तरफ़ से पुरे भारत मे सूचना दि गयी है. क्रुपया आने वाले कुछ दिनो तक आप कोई भी कोल्ड ड्रिंक जैसे माज़ा, फैन्टा, 7 अप, कोका कोला, mauntain डीओ, पेप्सी, इत्यादि न पिये क्यूकी इसमेसे एक कम्पनी के कामगार ने इसमे इबोला नामक खतरनाक वायरस का दूषित खून इसमे मिला दिया है. ये खबर कल NDTV चैनल मे बतायी थी. आप जल्द से जल्द इस मेसेज को फोर्वर्ड करके मदद करे. ये मेसेज आपके परिवार मे फोर्वर्ड करे . आप जितना हो सके इसे शेअर करे.. धन्यवाद.’
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रकाशभाऊ जगताप यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर खूप जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केलीय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने गुगल सर्च करून पाहिले परंतु यासंदर्भातील एकही अधिकृत बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही. व्हायरल दाव्यातील उल्लेखाप्रमाणे NDTV ची सुद्धा बातमी सापडली नाही.
व्हायरल इमेज गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिली असता असे लक्षात आले की हे दावे २०१९ सालापासून व्हायरल होतायेत, परंतु हा फोटो २०१५ सालचा आहे. पाकिस्तानी वेबसाईट ‘pak101.com’ वर १६ ऑक्टोबर २०१५ रोजी हे फोटोज अपलोड करण्यात आले होते.
गुजरनवाला जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह बेग पूर येथील फेक कोका कोला बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. या धाडीमध्ये चार जणांना अटक करण्यात आली आणि कारखाना मालकाविरोधात गुन्हा दाखल केला गेला, अशी माहिती वेबसाईटवर देण्यात आली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की कामगाराने कोल्ड्रिंक्समध्ये इबोला व्हायरस संक्रमित रक्त मिसळल्याने हैदराबाद पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिल्याचे दावे चुकीचे आहेत. NDTV ने याविषयीची कुठलीही बातमी दिलेली नाही. व्हायरल इमेज २०१५ सालची असून ती पाकिस्तानातील आहे.
हेही वाचा: लहान मुलीला सुटकेसमध्ये घेऊन चाललेल्या अपहरणकर्त्याच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment