पोर्तुगीज खलाशी ‘वास्को-द-गामा’ने (Vasco Da Gama) भारत शोधला. त्यानंतर इतर पोर्तुगीज, फ्रेंच मग इंग्रज भारतात आले आणि भारतात व्यापार करू लागले असे आपण शाळेत अभ्यासले. परंतु हा इतिहास खोटा होता. स्वतः ‘वास्को-द-गामा’ने आपल्या डायरीत ‘कान्हाभाई’नावाच्या (Kanji Malam) गुजराती व्यापाऱ्याने आपल्याला भारत दाखवल्याचे सांगितल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
मुकुल कानिटकर यांचा एक व्हिडीओ अनेक दिवसांपासून व्हायरल होतोय. त्यात त्यांनी भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या तब्बल ६६% एवढा होता असा दावा केलाय. त्यातच त्यांनी ‘वास्को-द-गामा’ला कान्हाभाई नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याने भारत दाखवला असाही त्यांनी दावा केलाय. हेच दावे विविध रुपात सातत्याने सोशल मीडियात पहायला मिळत असतात.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्हाला ‘एबीपी न्यूज’ने सदर व्हायरल दावे फेक असल्याचे सांगणारा जुना रिपोर्ट मिळाला.
‘बीबीसी’ने ‘वास्को-द-गामा’च्या (Vasco Da Gama) संपूर्ण प्रवासाविषयी अगदी विस्तृत माहिती दिली आहे. त्या रिपोर्टमध्येही कान्हाभाई (Kanji Malam) नावाच्या भारतीय व्यापाऱ्याचा कुठेही उल्लेख नाही. दक्षिण आफ्रिकेतून निघून ‘केप ऑफ गुड फोप’ला वळसा घालून ‘वास्को-द-गामा’ केरळमध्ये असलेल्या ‘कालिकत’ बंदरात पोहचला होता. या दरम्यान त्याचे प्रचंड हाल झाले होते. त्याचे ३० साथीदार मृत्युमुखी पडले होते.
गुजराती व्यापाऱ्याची गोष्ट कुठून आली?
‘दैनिक भास्कर’च्या बातमीनुसार ‘गुजरात आणि समुद्र’ अशा विषयावर कच्छ मांडवी या भागात २०१० साली इतिहासकारांचे जागतिक संमेलन भरले होते त्यामध्ये गुजराती इतिहासकार मकरंद मेहता (Makarand Mehta) यांनी ‘कानजी मालम’ या (Kanji Malam) गुजराती व्यापाराने ‘वास्को-द-गामा’ला भारताचा मार्ग दाखवला होता असा दावा केला होता.
या दाव्यास त्यांनी नेमका कुठल्या गोष्टींचा सबळ पुरावा दिलेला हे काही समजू शकले नाही. परंतु तेव्हापासूनच कदाचित ‘वास्को-द -गामा’ आणि गुजराती व्यापाऱ्याचे संबंध सोशल मीडियात प्रस्थापित झाले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की ‘वास्को-द-गामा’ला भारतात गुजराती व्यापारी कान्हाभाई यांनी आणल्याचे दावे तथ्यहीन आहेत. किंबहुना ज्या गुजराती इतिहासकाराने दुसऱ्या एका व्यापाऱ्याच्या नावे हीच गोष्ट सांगितलीय त्यांच्याही दाव्यास पुष्टी करण्यासाठी सबळ पुरावे उपलब्ध नाहीत.
टीप- यासंबंधीची अधिकृत माहिती मिळाल्यास येथेच अपडेट करण्यात येईल.
हेही वाचा: एकेकाळी भारताचा ‘जीडीपी’ जगाच्या एकूण ‘जीडीपी’च्या तब्बल ६६% होता? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]