Press "Enter" to skip to content

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी घेतली होती गृहमंत्री अमित शहा यांची भेट?

गुलाब नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी साधारणतः महिनाभरापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. पक्ष सोडताना त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. अनेकांकडून आझाद आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती.

आता कथितरित्या गुलाम नबी आझाद यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. गुलाम नबी आझाद यांचा अमित शाह यांच्या सोबतचा हा फोटो काँग्रेस सोडण्याच्या दोन दिवसांपूर्वीचा आहे. आझाद यांनी पक्ष सोडण्यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती, अशा प्रकारचा दावा हा फोटो शेअर करताना केला जातोय.

Advertisement

मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या अधिकृत चॅनेलवरून हा फोटो ट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोध घेतला असता आम्हाला महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 30 सप्टेंबर 2021 रोजीच्या ट्विटमध्ये हा फोटो बघायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये गोवा निवडणुकीच्या संदर्भाने नवी दिल्ली येथे अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. गोव्याचे तत्कालीन मंत्री मायकल लोबोही यावेळी उपस्थित राहिल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

ANI या वृत्तसंस्थेच्या वेबसाईटवरील बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार हा फोटो 30 सप्टेंबर 2021 रोजीचा आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मायकल लोबो (Michael Lobo) यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत गोवा विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत चर्चा झाल्याचे देखील बातमीमध्ये सांगण्यात आले आहे.

सध्या व्हायरल होत असलेला फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना केली असता व्हायरल फोटो एडिटेड असल्याचे अगदी सहज लक्षात येते. व्हायरल फोटोत देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोच्या जागी रॉचे संचालक सामंत कुमार गोयल यांचा चेहरा चिपकवण्यात आला आहे तर, मायकल लोबो यांच्या ठिकाणी गुलाम नबी आझाद यांचा चेहरा वापरण्यात आला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो फेक आहे. मूळ फोटोत भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मायकल लोबो बघायला मिळताहेत. हाच फोटो एडिट करून त्याठिकाणी गुलाम नबी आझाद आणि सामंत कुमार गोयल यांचा चेहरा वापरण्यात आला आहे.

हेही वाचा- भारत जोडो यात्रा: राहुल गांधींनी विवेकानंदांना अभिवादन न केल्याचा स्मृती इराणी यांचा दावा चुकीचा!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा