आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सेमी-फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला. या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर भारतीय सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन टीमच्या पिवळ्या रंगाच्या जर्सीमधील एका व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओतील व्यक्ती ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत असताना बघायला मिळतोय.
व्हायरल व्हिडिओच्या आधारे दावा केला जातोय की ऑस्ट्रेलिया भारताचा खरा मित्र असून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानकडून झालेल्या भारताच्या पराभवाचा बदला घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर स्टेडियम ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या निनादात दुमदुमले. त्यासाठी व्हिडिओतील तरुणाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देखील दिले जाताहेत.
‘झी सलाम’च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील अशाच प्रकारच्या दाव्यासह सदर व्हिडीओ शेअर केला.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांच्या 19 जानेवारी 2021 रोजीच्या ट्विटमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला. ट्विटच्या कॅप्शनुसार हा व्हिडीओ जानेवारीमधील भारतीय संघाच्या गाबा कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतरचा आहे.
या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ‘न्यूज 18 लोकमत’च्या वेबसाईटवर 20 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीमध्ये देखील व्हायरल व्हिडीओ भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील गाबा कसोटी विजयानंतरचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर जानेवारीमध्ये देखील हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील अनेक राष्ट्रीय माध्यमांनी यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. ‘भारत माता की जय’च्या घोषणा देणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्याचे अनेकांनी कौतुक केले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्याचा व्हिडीओ जुना आहे. शिवाय या व्हिडिओचा सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकातील ‘ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान’ यांच्या दरम्यानच्या सेमी फायनलशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा- पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडणाऱ्यांना योगी सरकारने धडा शिकवल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment