उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोमध्ये अखिलेश यादव सोफ्यावर बसलेले आहेत आणि ते समोर बसलेल्या एका व्यक्तीची विचारपूस करताना दिसताहेत. अखिलेश यांच्या मागच्या विटाच्या भिंतीचा रंग देखील उडालेला आहे. अशात अखिलेश यादव बसलेले असलेला सोफा लगेच लक्ष वेधून घेणारा आहे.
अखिलेश यादव यांच्या याच फोटोच्या आधारे विरोधकांकडून त्यांच्यावर निशाना साधला जातोय. उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह (Swatantra dev singh) यांनी हा फोटो शेअर केलाय. त्यात त्यांनी दावा केलाय की समाजवादाचा झेंडा घेऊन चालणारे अखिलेश यादव जेथे कुठे जातात, तिथे आपला सोफा सोबत घेऊन जातात.
काँग्रेस नेते श्रीनिवास बी व्ही (Srinivas BV) यांनी देखील हा फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करताना ते म्हणतात, “ज्या घराच्या भिंतीवर प्लास्टरही नाही, त्या घरात नेताजींसाठी आरामदायी सोफा कुठून आला?”
पडताळणी:
अखिलेश यादव यांचा व्हायरल फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला खुद्द अखिलेश यादव यांच्याच ट्विटर अकाऊंटवरून ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये हा फोटो बघायला मिळाला. फोटोच्या कॅप्शननुसार अखिलेश यादव यांनी इटावामधील एका डेंग्यूने ग्रसित गावातील कुटुंबाची भेट घेतली होती. त्याप्रसंगीचा हा फोटो आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे किवर्ड सर्च केलं असता ‘आज तक’च्या वेबसाईटवर “बिना प्लास्टर वाले घर में कहां से आया नया सोफा जिस पर बैठे अखिलेश यादव?’ अशा मथळ्याखाली प्रकाशित बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार अखिलेश यादव यांनी ३ नोव्हेंबर रोजी इटावामधील सैफई तालुक्यातील गिझा गावातील मुकेश बाथम यांच्या कुटुंबाची भेट घेतली. मुकेश यांना 5 मुले आहेत, त्यापैकी 4 नंबरच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.
मुकेश बाथम यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार गेल्या 4 महिन्यांत त्यांच्या दोन मुलांची लग्ने झाली होती. त्यातल्याच एका मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. अखिलेश यादव ज्या सोफ्यावर बसले होते, तो सोफा डेंग्यूने मृत्यू पावलेल्या मुलाच्या लग्नात भेट म्हणून मिळाला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संदर्भात सोशल मीडियावर केले जात असलेले दावे चुकीचे आहेत. डेंग्यू पीडिताच्या कुटुंबियांना भेटायला गेलेले अखिलेश यादव स्वतःचा सोफा घेऊन गेले नव्हते, तर तो सोफा त्याच कुटुंबाचा आहे. हा सोफा मुलाच्या लग्नात भेट म्हणून मिळाला होता.
हेही वाचा- अखिलेश यादव यांनी भाषणात केवळ ‘जीनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा’ दावा केला?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment