उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanth) यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 255 जागा जिंकून घवघवीत यश मिळवले. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
फोटोमध्ये अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव (Mulayam singh Yadav) आणि काका शिवपाल सिंह यादव (Shivpal Singh Yadav) देखील दिसताहेत. दावा केला जातोय की अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता ANI या वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 10 जून 2019 रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये व्हायरल फोटो बघायला मिळाला.
ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मुलायम सिंह यादव यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मुलायम सिंह यादव यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि प्रगतीशील समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल यादवही उपस्थित होते.
‘आज तक’च्या वेबसाईटवर देखील यासंबंधीची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीनुसार मुलायम सिंह यादव यांना हायपरग्लायसेमिया आणि हायपर डायबिटीजचा त्रास आहे. यापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मुलायम सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.
मुलायम सिंह यादव यांना लखनौच्या लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टर भुवनचंद्र तिवारी यांच्या देखरेखीखाली मुलायम सिंह यांच्यावर उपचार करण्यात आले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केलेले नाही.
फोटो जून 2019 मधील असून मुलायम सिंह यादव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी मुलायम सिंह यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. व्हायरल फोटो त्याच भेटीदरम्यानचा आहे.
हेही वाचा- ‘द काश्मीर फाइल्स’ बघून योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment