राम जन्मभूमी ट्रस्टवर केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ‘आप’ नेते खासदार संजय सिंह (Sanjay Singh) सध्या देशभरात चर्चेत आहेत. सोशल मीडियात देखील ते ट्रेंड होताहेत. त्यांच्या विरोधात अनेक ऑनलाईन कॅम्पेन्स चालवली जाताहेत. त्यांच्या घरावर हल्ला देखील करून झालाय.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओत कुठलीतरी बैठक सुरु असल्याचे दिसतेय. या बैठकीत अचानक एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की व्हिडीओ ‘आम आदमी पक्षा’च्या बैठकीतील असून संजय सिंह (Sanjay Singh) हे आपल्याच पक्षाच्या आमदाराला बूटाने मारहाण करताहेत.
हाच व्हिडीओ फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
पडताळणी:
- व्हिडीओ बघताक्षणीच व्हिडिओतील व्यक्ती ‘आप’ खासदार संजय सिंह नाहीत हे लक्षात येते. त्यामुळे व्हिडीओ नेमका कुठला आणि व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्ती कोण हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या.
- आम्हाला ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वेबसाईटवर ६ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ मिळाला. ‘भाजप आमदार-खासदारात रंगली फ्रि-स्टाइल’ या हेडलाइनखाली प्रसिद्ध बातमीमध्ये घटनेची तपशिलात माहिती मिळते.
मारहाण करणारी व्यक्ती कोण?
- बातमीनुसार घटना उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधील आहे. संत कबीर नगर जिल्ह्यातील भाजपचे खासदार शरद त्रिपाठी (Sharad Tripathi) आणि मेहदावल मतदारसंघाचे आमदार राकेश सिंह (Rakesh Singh Baghel) एका कार्यक्रमासाठी आले होते.
- प्रकल्पाच्या कोनशीलेवर खासदार शरद त्रिपाठी यांचे नाव नव्हते. यावरून शरद त्रिपाठी आणि राकेश सिंह यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. बाचाबाचीत खासदार शरद त्रिपाठी यांनी पायातला बूट काढून आमदार राकेश सिंह यांना जोरदार मारहाण सुरू केली.
- संतापलेल्या राकेश सिंह यांनीही शरद त्रिपाठी यांची कॉलर पकडून त्यांना थपडा लगावल्या. ही हाणामारी वाढत चालल्याचे पाहून उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अखेर मध्यस्थी करावी लागली. पण तरीही हा वाद मिटला नाही. विशेष म्हणजे हे सगळं घडत असताना उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले आशुतोष टंडन हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
- ‘बीबीसी मराठी’च्या युट्यूब चॅनेलवर देखील या घटनेची बातमी बघायला मिळाली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडिओत आपल्याच पक्षाच्या आमदाराला मारहाण करणारे खासदार ‘आप’चे संजय सिंह नसून भाजपचे शरद त्रिपाठी आहेत. त्यांनी आपल्याच पक्षाच्या राकेश सिंह बघेल यांना बूटाने मारहाण केली होती.
हे ही वाचा- शिवराज नारियलवाले मारहाण व्हिडीओद्वारे धार्मिक चिथावणी आणि कोरोनासंबंधी दुष्प्रचाराचा प्रयत्न!
[…] हेही वाचा: पक्षातीलच आमदाराला बुटाने मारणारे ‘आ… […]