Press "Enter" to skip to content

आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायोमधून मंत्रिपदाचा उल्लेख हटविल्याच्या बातम्या फेक!

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातील अनेक आमदारांसह केलेल्या बंडाळीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कुठल्याही क्षणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा येऊ शकेल, अशी एकंदर परिस्थिती आहे.

Advertisement

राज्यातील या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांच्या ट्विटर बायोचा एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर बायोमधून मंत्रिपदाचा उल्लेख हटविला असल्याचा दावा या स्क्रिनशॉटच्या आधारे केला जातोय. मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी यासंबंधीच्या बातम्या देखील दिल्या आहेत.

देशदूत‘ने आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला असल्याची बातमी दिली आहे, तर ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या बातमीमध्ये देखील आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरील बायोमधून मंत्रीपद काढून टाकले असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘जनसत्ता‘, ‘नवभारत टाईम्स‘ आणि ‘इंडिया टीव्ही‘ने देखील यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी माध्यमातील बातम्यांचे खंडन केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर बायोमध्ये कधीच मंत्रिपदाचा उल्लेख नव्हता, अशी माहिती प्रियंका चतुर्वेदी यांनी यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

आम्ही Wayback Machine या वेबसाईटवर अर्काइव्ह करण्यात आलेले आदित्य ठाकरे यांचे जुने ट्विट्स देखील चाळले. यामध्ये देखील आदित्य ठाकरे यांच्या बायोमध्ये मंत्रिपदाचा उल्लेख कुठेही बघायला मिळत नाही. आदित्य ठाकरेंच्या मार्च 2020 मध्ये अर्काइव्ह करण्यात आलेल्या ट्विटर बायोमध्ये देखील तीच माहिती बघायला मिळतेय, जी सध्या त्यांच्या बायोमध्ये आहे.

2020 Archive Aditya Thackeray
Source: Wayback Machine

याचाच अर्थ असा की गेल्या साधारणतः अडीच वर्षांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर बायोमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ट्विटर बायोमधून मंत्रिपदाचा उल्लेख हटविला असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटर बायोमधून मंत्रिपदाचा उल्लेख हटविला नसून अशा प्रकारचा उल्लेख त्यांच्या बायोमध्ये कधीच नव्हता.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचा उल्लेख शहीद असा केला? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा