Press "Enter" to skip to content

चायनीज फास्टफूड चाऊमीनच्या अतिसेवनाने डोक्यात किडे होऊन झाला युवकाचा मृत्यू? वाचा सत्य!

चायनीज फास्टफूड चाऊमीनच्या (Chow mein) अतिसेवनाने नजीबाबाद येथील युवकाच्या डोक्यात किडे झाले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे दावे करणारी युट्युब न्यूज सोशल मीडियात व्हायरल होतेय. त्याच युट्युब चॅनलचे ग्राफिक्ससुद्धा व्हायरल होताना दिसते आहे.

Advertisement

फेसबुकवर व्हायरल होत असलेले ग्राफिक्स:

May be an image of 1 person and text that says "बिजनौर www.bijnorexpress.com खबर सबसे EXPRESS पहले EXPRESS BREAKING NEWS ताजा खबर फास्टफूड खाने वाले लोगों के लिए चेतावनी नजीबाबाद में चाऊमीन ने ली युवक की जान BijnorExpress.com BijnorE"

त्याच बिजनौर एक्स्प्रेसच्या बातमीचा व्हिडीओ:

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक धनंजय कदम यांनी या बातमीचा व्हिडीओ व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे आहे की चायनीज फास्टफूडसाठी (Chinese fast food) वापरल्या जाणाऱ्या कच्च्या कोबीमुळे डोक्यात किडे झाले. कोबीमुळे झालेले किडे(cabbage worm) कशानेच मरत नाहीत. यांना चाकूने कापले तरीही त्यांचे तुकडे होत नाहीत. या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी काही कीवर्ड्सच्या मदतीने गुगल सर्च केल्यानंतर हे लक्षात आले की कोबीच्या किड्यांविषयीचे दावे अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत.

‘कोबीवर असणाऱ्या किड्यास ‘टेपवर्म’ (tapeworm) असे म्हणतात. या टेपवर्मचे अंडे, कोश आपल्या शरीरात जातात आणि त्या अळ्या शरीरभर निर्माण होतात. या अळ्यांचे आपल्या शरीरातील सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे मेंदू.

डोक्यात गेलेल्या या अळ्या सुरुवातीला डोकेदुखीचे लक्षण दाखवतात. जर लवकरात लवकर हे लक्षात आले की ही डोकेदुखी ‘टेपवर्म’मुळे होतेय तर त्यावर इलाज होणे शक्य आहे. परंतु तिसऱ्या स्टेजला या अळ्यांची अंडी शरीरातील पेशींमध्ये जाऊन गाठी तयार करायला सुरुवात करतात. या स्टेजला ‘न्युरोसिस्टीकइर्कोसीस’ (neurocysticercosis)असे म्हणतात.

न्युरोसिस्टीकइर्कोसीस’ या स्टेजमध्ये रुग्णावर त्या दर्जाचे उपचार न मिळाल्यास तो बेशुद्ध होऊन त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो, अशी माहिती ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या २०१७ सालच्या एका रिपोर्टमध्ये वाचायला मिळते.

गमतीची गोष्ट अशी की ‘द ट्रिब्युन इंडिया‘च्या १४ एप्रिल २०२१ रोजीच्या रिपोर्टमध्ये या माहितीच्या अगदी उलट माहिती वाचायला मिळते. ट्रिब्यूनच्या रिपोर्टमधील माहिती तज्ज्ञांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. लुधियानामधील दयानंद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या न्युरोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. गंगादीप सिंह यांनी या सर्व दाव्यांना ‘मिथक’ असे संबोधले आहे. तसेच स्वयंपाक करताना भाज्या आणि हात स्वच्छ धुवून घेण्याचाही सल्ला त्यांनी दिलाय. ‘टेपवर्म’ हे अस्वच्छतेमुळे होतात असे त्यांनी सांगितले.

उघड्यावर शौचास बसल्याने त्यातील जंतू इतरत्र पसरतात. मुख्यतः डुकरे यांचे शिकार होतात आणि या डुकरांचे नीटसे न शिजवलेले मांस खाल्ले की मनुष्याला या टेपवर्मचा प्रादुर्भाव होतो. यावर औषधांनी उपचार करता येतो. अपवादात्मक परिस्थितीत सर्जरी सुद्धा केली जाते. परंतु आता पूर्वीपेक्षा ‘न्युरोसिस्टीकइर्कोसीस’च्या केसेस कमी झाल्या आहेत याला स्वच्छ भारत अभियानामुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी होणे कारणीभूत असावे.

– डॉ. गंगदीप सिंह. न्युरोलॉजी विभाग प्रमुख, दयानंद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, लुधियाना

ट्रिब्युनने पिजीआयच्या न्युरोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजवीर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की.

“जर तुम्ही पालेभाज्या, फळ भाज्या व्यवस्थित धुतल्या नाहीत तर ते कोबी असो किंवा बटाटे, टेपवर्मचा धोका तुम्हाला आहेच. तसेच कच्चे आणि अर्धवट शिजवलेले अन्न सुद्धा खाणे टाळावे. ‘न्युरोसिस्टीकइर्कोसीस’च्या केसेसमध्ये अनेकदा लोक तांत्रिक मांत्रिकाकडे जाऊन किडे काढत बसतात. अशा चुकीच्या गोष्टींत वेळ घालवून मग दवाखान्यांत दाखल होतात तोवर वेळ गेलेली असते. त्यामुळे अशा फसव्या गोष्टींना बळी न पडता थेट दवाखाना गाठावा.”

– डॉ. राजवीर सिंह, सहाय्यक प्राध्यापक, न्युरोलॉजी विभाग, पीजीआय

‘न्यूज१८ हिंदी’च्या रिपोर्टनुसार चाऊमीन बनवताना त्याची चव वाढवण्यासाठी विविध प्रकारचे ऍसिड आणि खूप मोठ्या प्रमाणात अजिनोमोटो (Ajinomoto) वापरले जाते. यामुळे आपल्या स्वादग्रंथींना अपाय होऊ शकतो. मैद्याच्या पदार्थांमुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. कच्च्या भाज्या वापरताना स्वच्छतेचे भान राखले जात नाही. यामुळे त्यावरील जंतू सहजपणे आपल्या शरीरात जाऊ शकतात असे सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले की व्हायरल बातमी काहीशी दिशाभूल करणारी आहे. चायनीज फूडमधील कोणत्या घटकामुळे युवकाचा मृत्यू झाला हे स्पष्ट होत नाही. तसेच कोबीच्या किड्यांना मारता येत नाही, कापता येत नाही हे दावे अगदीच आधारहीन आहेत. ‘टेपवर्म’चा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस योग्यवेळी उपचार मिळाल्यास तो बरा होऊ शकतो.

चायनीज फास्टफूड खायचे असल्यास स्वच्छतेची खबरदारी ज्या ठिकाणी घेतली जाते तेथे खाण्यास हरकत नाही. परंतु हे लक्षात असायला हवे की कुठल्याही पदार्थाचे अतिसेवन हानिकारकच असते. कोणत्याही प्रकारच्या भाज्या, मांस स्वच्छ धुतल्याशिवाय आणि व्यवस्थित शिजवल्याशिवाय खाऊ नये.

हेही वाचा: ५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा