पुदुच्चेरी युनिव्हर्सिटीच्या रामू नावाच्या विद्यार्थ्याने (pondicherry university student ramu) कोरोना व्हायरसवरील घरगुती उपचार शोधला असून त्याला ‘WHO’ अर्थात ‘जागतिक आरोग्य संघटने’ने देखील स्वीकारले असल्याचा दावा व्हायरल होतोय. भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी ही माहिती दिली असल्याचं देखील सांगितलं जातंय.
नेमकं काय म्हंटलंय या मेसेजमध्ये ?
मूळ हिंदीतील व्हायरल मेसेजचा मराठी अनुवाद येथे देत आहोत.
“रामूने हे सिद्ध केले आहे की 2 चमचे मध आणि थोड्याश्या आल्याच्या काढ्यात 1 चमचा काळी मिरी पावडर मिळवून सलग 5 दिवस प्यायल्याने कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होतो आणि शेवटी संपूर्णतः नष्ट होतो.
संपूर्ण जगाने हा उपाय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. एकदाची 2021 मध्ये चांगली बातमी ऐकायला मिळाली. कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्रमंडळी आणि कुटुंबियांपर्यंत पोहोचवा.”
ट्वीटरवर हाच मेसेज दुसरे एक भाजप खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांच्या नावाने शेअर केला जातोय.
गेल्या वर्षभरात देखील अनेकांकडून वेगवेगळ्या वेळी हाच दावा केला गेला.
फक्त भारतीयच नाही, तर विदेशी लोकांनी देखील उत्साहाच्या भरात हा दावा व्हायरल करण्यात आपलं योगदान दिलं.
पडताळणी :
सर्वप्रथम तर आम्ही साक्षी महाराज किंवा डॉ. सत्यपाल सिंह यांनी अशा प्रकारची काही माहिती दिली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांपैकी कुणीही अशा प्रकारचा काही दावा केला असल्याची माहिती मिळाली नाही.
त्यानंतर आम्ही गुगलवर अशा प्रकारच्या कुठल्या संशोधनाविषयी काही माहिती मिळतेय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात देखील आमच्या हाती निराशाच पडली. कुठल्याही न्यूज चॅनेल किंवा न्यूज पेपरमध्ये यासंबंधी प्रकाशित बातमी आम्हाला सापडली नाही.
त्यानंतर आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटला भेट दिली. तिथे देखील जागतिक आरोग्य संघटनेने असल्या कुठल्या संशोधनाला स्वीकृती दिली असल्याची माहिती आम्हाला सापडली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवरच्या कोरोनासंदर्भातील अफवांचे खंडन करणाऱ्या सेक्शनमध्ये मात्र आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार संघटनेने हे स्पष्ट केलेले आहे की सूपमध्ये किंवा इतर जेवणार मिरपूड घालून कोरोनाचा प्रतिबंध केला जाऊ शकत नाही. त्यामुळे कोरोना बरा होत नाही.
त्यानंतर अजून खात्री करून घेण्यासाठी आम्ही पुदुच्चेरी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू गुरमीत सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा दावा धुडकावून लावला. पुदुच्चेरी युनिव्हर्सिटीच्या कुठल्याही विद्यार्थ्याने (pondicherry university student ramu) कोरोनासंदर्भातील कुठलाही उपचार शोधलेला नाही. या प्रकरणाशी पुदुच्चेरी युनिव्हर्सिटीचा काहीही संबंध नाही, असे गुरमीत सिंग यांनी स्पष्ट केले.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालंय की कोरोनाच्या घरगुती उपचारासंबंधीचा सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला दावा फेक आहे. खुद्द पुदुच्चेरी युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनीच हा दावा धुडकावून लावला आहे.
हे ही वाचा- गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना बरा होत नाही, सोशल मीडियावरील दावा चुकीचा!
[…] […]
[…] […]