पंजाब हरियानातील केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन छेडल्यानंतर ते कसे देशद्रोही, खलिस्तान समर्थक आहेत, त्यांना विरोधी पक्षांची फूस आहे असं सांगण्याचा प्रयत्न सरकार समर्थकांकडून सातत्याने केला जातोय. नझीर मोहमद या व्यक्तीचे फोटोज व्हायरल करत दावा केला जातोय की मुस्लीम व्यक्ती शेतकरी मोर्चासाठी पगडी बांधून शीख झालीय. (Muslim become a Sikh to join the farmers protest)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माहिती सल्लागार आणि भाजप प्रवक्ते शलभ मणी त्रिपाठी यांनी ‘घंटेभर में किसान बनने का चमत्कार देखिये’ अशा कॅप्शनसह फोटो शेअर केले आहेत. यात नझीर मोहम्मद नावाच्या व्यक्तीचे फेसबुक प्रोफाईल आहे आणि त्याच व्यक्तीचा पगडी गुंडाळलेला सेल्फी आहे.
‘एक कोटी भाजप समर्थक’ या ग्रुपवर देवेश तुळसकर या व्यक्तीनेही सदर दावे करणारी पोस्ट शेअर केली आहे.
हिंदूओंकी आवाज, UP मे फिर एक बार योगी आदित्यनाथ सरकार 🚩योगी समर्थक जुड़े, योगी आदित्यनाथ फॅन्स अशा काही ग्रुप्सवर हे फोटोज आणि दावे शेअर केले जात आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणी करताना आम्ही सर्वात आधी नझीर मोहम्मद या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाईलला भेट दिली. त्यानुसार व्हायरल पोस्ट्समध्ये वापरण्यात आलेला पगडीचा फोटो नझीर यांनी पोस्ट केलाय हे खरेच आहे परंतु तो पोस्ट करण्याची तारीख ८ एप्रिल आहे.
शेतकरी आंदोलन ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात चालले आहे ते कायदे जून महिन्यात चर्चेत होते, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात हे तीन कायदे संमत झाले. म्हणजेच सदर व्यक्तीने जवळपास ५ महिने आधीच तो फोटो फेसबुकवर अपलोड केलाय.
सहाजिकच आहे की शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मुस्लिम व्यक्तीने शीख वेशभूषा धारण केली (Muslim become a Sikh to join the farmers protest) या दाव्याला काहीएक अर्थ नाही. खोट्या आणि चिथावणीखोर दाव्यांसह आपले फोटोज व्हायरल व्हायला लागल्यानंतर मोहमद यांनी त्यांचे फेसबुक प्रोफाइल लॉक केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये भाजप समर्थकांनी शेतकरी आंदोलन कसे बनावट आहे हे सांगण्यासाठी केलेला हा प्रयत्न सुद्धा फेक निघाला. व्हायरल पोस्ट्समधील व्यक्ती नझीर मोहम्मद याने पगडी गुंडाळलेला फोटो या कायद्यांच्या अगोदरच काही महिने पोस्ट केलाय. याचा आताच्या शेतकरी आंदोलनाशी काहीएक संबंध नाही.
हेही वाचा: ‘शेतकरी आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, खलिस्तान जिंदाबादचे नारे’ भाजप नेत्यांचे दावे किती खरे?
[…] […]
[…] […]
[…] […]