उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक निकलांमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या या विजयानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आहे.
सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारी पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये दावा करण्यात येतोय की अखिलेश यादव (Akhilesh Yadav) मुख्यमंत्री न बनू शकल्याने प्रयागराजमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या केली आहे. पोस्टसोबत 3 वेगवेगळे फोटो देखील बघायला मिळताहेत.
फेसबुकवर देखील ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.
पडताळणी:
व्हायरल पोस्टची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही तिन्ही फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधले.
पहिला फोटो
पहिला फोटो ‘संजीवनी टुडे’ या वेबसाईटवर 24 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये बघायला मिळाला. बातमीनुसार घटना झारखंडमधील रामगढ येथील आहे.
बोकारो जिल्ह्यातील कसमार पोलीस स्टेशन हद्दीतील कर्मा येथील रहिवासी तारा महतो यांचा मुलगा रणधीर कुमार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होते. त्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
दुसरा फोटो आणि तिसरा फोटो
व्हायरल पोस्टमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोतील तरुण कोण आहेत याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. मात्र, पडताळणी दरम्यान आम्हाला प्रयागराज पोलिसांचे एक ट्विट मिळाले. प्रयागराज पोलिसांनी व्हायरल पोस्टच्या रिप्लायमध्ये या फोटोंचा प्रयागराज क्षेत्रातील विधानसभा निवडणुकांशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या 24 तासात प्रयागराजमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रयागराज पोलिसांनी या रिप्लायमध्ये म्हंटले आहे.
पडताळणी दरम्यान आम्हाला ‘आज तक’च्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या एका घटनेची बातमी मिळाली. बातमीनुसार लखनौमधील एका घटनेत लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या पराभवामुळे एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
लखनौमध्येच समाजवादी पार्टीच्या एका कार्यकर्त्याने देखील लखनऊमधील भाजप कार्यालयाबाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अखिलेश यादव मुख्यमंत्री न बनू शकल्याने प्रयागराजमध्ये 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या केल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल फोटोजचा उत्तर प्रदेश निवडणुकांशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा- तमिळनाडूतील सैनिकाच्या आत्महत्येचा व्हिडीओ महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा म्हणून व्हायरल!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment