Press "Enter" to skip to content

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीत घोळ, एक सिलेंडर पडला तब्बल २२२१ रुपयांना?

‘देवेंद्र फडणवीस तुमचे सिलेंडर सोन्याचा वर्ख चढवून आलेत का काय? किती येड्यात काढणार जनतेला?’

Advertisement

या अशा वाक्यांसह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि त्यावर काही मजकूर व्हायरल होत आहे. ‘आम्ही ७३ लाख १६ हजार सिलेंडर दिले त्याची किंमत १६२५ कोटी रुपये आहे.- देवेंद्र फडणवीस’ असं फोटोच्या वर आणि ‘म्हणजे १ सिलेंडर पडला RS. २२२१ ला; बहुदा सिलेंडर अमेरिकेतून मागवले असावेत’ असं फोटोच्या खाली लिहिलेलं आहे.

हाच फोटो ट्विटरवर सुद्धा व्हायरल होताना दिसतोय. ‘शिल्पा बोडखे INC’ यांनी हा फोटो ट्विट करताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना टॅग करत लिहिलंय की ‘…अन जयंत पाटील साहेबांनी भागाकार करत फडणविसांनी दिलेल्या आकडेवारीचा सिलिंडर फोडला. #BJPExposed’

हेच ट्विट बातमी लिही पर्यंत ८९ जणांनी रीट्विट केलं होतं.

पडताळणी:

देवेंद्र फडणवीस यांनी ही आकडेवारी नेमकी कुठे आणि कधी दिली हे तपासताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आलेली एक  पोस्ट सापडली. या पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या आकडेवारीचा घोळ उकलून सांगितला  आहे.

जयंत पाटील यांच्या पोस्टनुसार ‘उज्ज्वला गॅससाठी १६२५ कोटी खर्च केल्याची बतावणी करण्यात आली. देशभरात ७३ लाख १६ हजार सिलेंडर दिले. या हिशोबाने एक सिलेंडरची किंमत २२२१ रुपये इतकी होते. मुळात एक सिलेंडर सबसिडीसह सुमारे ६०० रुपयांत मिळतो. मग हे फसवे आकडे काय दर्शवतात?’

जयंत पाटील आणि व्हायरल पोस्ट मधील दाव्यांची पडताळणी करण्यासाठी फडणवीस यांच्या ज्या वक्तव्याला धरून हे सगळं सुरु आहे, तो शोधायचा प्रयत्न आम्ही केला. त्यावेळी आम्हाला फेसबुकवरच फडणवीस यांच्या अधिकृत पेजवर २६ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सवर घेतलेली पत्रकार परिषद सापडली.

यामध्ये केंद्राने राज्याला किती आणि कोणकोणत्या पद्धतीने मदत केलेली हे सांगताना त्यांनी काही आकडेवारी दिली आहे. इतर आकडेवारी सांगत असताना सिलेंडर बाबत बोलताना व्हिडीओच्या ६.१५ मिनिटाला काय सांगताहेत पहा:

“या व्यतिरिक्त उज्ज्वलाचं सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ७३ लाख १६ हजार सिलेंडर्स देण्यात आले आहेत. यांची किंमत आहे १६२५ कोटी रुपये.”

आम्ही स्वतः एका सिलेंडरचा भाव काढण्यासाठी रुपये आणि सिलेंडरच्या संख्येचा भागाकार केला तेव्हा आकडा आला २२२१.१५९१ म्हणजेच २२२१ रुपये.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत पत्रकार परिषदेचा जो व्हिडीओ सापडलाय त्यात फडणवीस यांनी तेच आकडे सांगितले आहेत जे व्हायरल पोस्टमध्ये आहेत. ही आकडेवारी देताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची काही गफलत झाली की त्यांच्या हातातल्या कागदपत्रांमाध्ये आकडेवारी चुकीच्या पद्धतीने नोंदविण्यात आली, हे देवेंद्र फडणवीस हेच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.  फडणवीस यांच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारला खरोखर एक सिलेंडर २२२१ रुपयांना पडला आहे का? हा जो प्रश्न उपस्थित होतोय, तो ही वेगळ्या संशोधनाचा विषय ठरतोय.

एक गोष्ट मात्र इथे स्पष्ट होतेय ती अशी  की ‘देवेंद्र फडणवीस यांच्या हिशोबात एक सिलेंडर २२२१ रुपयांना पडलाय’ हा जो दावा व्हायरल पोस्टमध्ये आणि जयंत पाटील यांनी केलाय तो ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत खरा ठरलाय; कारण फडणवीस यांची आकडेवारी तरी तेच सांगतेय. म्हणूनच या व्हायरल दाव्यांना आम्ही  चेकपोस्टवर ‘हिरवा कंदील’ देत आहोत.

हेही वाचा:

‘मोदींची निवड WHO च्या चेअरमनपदी’ म्हणत अभिनंदन करणाऱ्यांनो, असं कुठलं पदच अस्तित्वात नाही !

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा