पाकिस्तानच्या पेशावरमधील मदरशामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात (peshawar attack) काहींना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली.
न्यूज नेशन चॅनेलचे कन्सल्टिंग एडिटर दीपक चौरसिया यांनी एका ट्विटच्या माध्यमातून पेशावरच्या मदरशामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती देतानाच, या मदरशामध्ये बॉम्ब बनवले जात असल्याचा दावा केलाय. चौरसियांचं हे ट्विट जवळपास १५०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.
याच दाव्याचे स्क्रिनशॉट्स फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत.
पडताळणी:
चौरसियांच्या या दाव्याच्या पडताळणीसाठी सर्वप्रथम आम्ही पेशावर बॉम्बस्फोटाची माहिती घेण्यासाठी गुगल सर्च केलं. आम्हाला या घटनेची माहिती देणारे अनेक मीडिया रिपोर्टस मिळाले.
बहुतेक भारतीय माध्यमांनी ANI या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. तर ANI वृत्तसंस्थेच्या बातमीचा स्रोत पाकिस्तानी मीडिया आहे. ANI नुसार हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ११० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
त्यानंतर आम्ही पाकिस्तानी माध्यमांमधील या घटनेचं वृत्तांकन बघण्यासाठी पाकिस्तानातील महत्वाचे वृत्तपत्र असणाऱ्या ‘डॉन’च्या वेबसाईटला भेट दिली. या वेबसाईटवरील बातमीनुसार पेशावरमधील डीर कॉलनीमधली ही घटना आहे.
‘डॉन’च्या बातमीनुसार सीनियर पुलिस सुपरीटेंडेंट मनसूर अमन यांनी बॉम्बस्फोटाविषयी (peshawar attack) अधिक माहिती देताना सांगतात की स्फोटासाठी इंप्रोवाइस्ड एक्सप्लोसिव डिवाइज़चा वापर करण्यात आला. त्यासाठी साधारणतः पाच किलो स्फोटके वापरण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी वकार अजीम यांनी सांगितले की, कोणी तरी बॅग घेऊन मदरशामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मदरशाच्या कुराणच्या वर्गात हा स्फोट झाला.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गार्डियनने देखील या घटनेसंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमीनुसार जामिया जुबेरिया या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत साधारणतः ५०० विद्यार्थी रहीमुल्ला हक्कानी या धर्मगुरुचे भाषण ऐकायला जमले असता हा स्फोट घडविण्यात आला. या बातमीनुसार देखील कुणीतरी बाहेरून विस्फोटक मदरशामध्ये आणले असल्याचीच माहिती मिळते.
सध्या तरी कुठल्याही अतिरेकी संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही. पाकिस्तानी तालिबानकडून एका नोटिशीच्या आधारे विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या घटनेची निंदा करत आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांकडून ‘दहशतवादी कृत्य’ म्हणून या घटनेचा तपास सुरु आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील बातम्यांनुसार पेशावरमधील मदरशात झालेला हल्ला बाहेरून कुणीतरी स्फोटके आणून मदरशात ठेवल्यानेच झाला आहे.
दीपक चौरसियांच्या मदरशामध्ये बॉम्ब बनवले होते, ह्या दाव्याला कुठलाही आधार नाही. कुठल्याही पुराव्याशिवाय चौरसिया यांनी हा दावा केला आहे.
हे ही वाचा– हिंदू धर्मियांची माथी भडकाविण्यासाठी पत्रकार दीपक चौरसियांनी वापरला पाच वर्षांपूर्वीच्या पेंटिंगचा संदर्भ!
[…] […]