देश सध्या कोरोनाशी लढत आहे. लसीकरण ही सध्या या लढाईत आपली सर्वात मोठी प्राथमिकता आहे. मात्र अशा स्थितीत देखील लसीकरण कार्यक्रमाविषयी (corona vaccination) आणि लशींविषयी अनेक अवैज्ञानिक दावे आणि अंधश्रद्धा (misinformation) पसरवल्या जाताहेत.
लस घेतल्याने शरीरात चुंबकत्व निर्माण होते किंवा लस तयार करण्यासाठी डुकराचे मांस वापरले आहे त्यामुळे धार्मिक नियमांना अनुसरून लशीकरणावर बहिष्कार टाकावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात लस घेऊ नये. या तीन सर्वात जास्त व्हायरल झालेल्या गैरसमजांचे पुराव्यानिशी ‘फॅक्ट चेक’.
१. दावा: लस घेतल्याने शरीरात चुंबकत्व वाढते
नाशिकच्या अरविंद सोनार यांचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला. यात त्यांनी हाताला एक दोन रुपयांची नाणी आणि स्टेनलेस स्टीलचे चमचे चिकटवले आहेत. त्यांचा दावा असा की लस घेतल्याने त्यांच्या शरीरात चुंबकत्व निर्माण झाले.
पडताळणी:
सोनार यांचे दावे सकाळ, लोकमत सारख्या नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यामुळे सदर बाब व्हायरल होण्यासाठी अधिकच बळकटी मिळाली.
स्टेनलेस स्टील आणि चुंबकत्व-
‘स्टेनलेस स्टील’ या नावात स्टील म्हणजेच लोखंड जरी असले तरी ते गंज पकडू नये, टिकाऊ व्हावं म्हणून त्यात क्रोमियम आणि निकेल धातूंचा समावेश केला जातो. यांमुळे लोखंडाची मूळची चुंबकीय शक्ती कमी होते. घरगुती भांडी, दवाखान्यातील कात्री ब्लेड सारखी उपकरणे यांचे स्टेनलेस स्टील असेच चुंबकीय शक्ती नसणारे असते.
हे पडताळण्यासाठी आपणही चुंबकाला घरगुती स्टेनलेस स्टीलची भांडी लावून पाहू शकता, जेणेकरून खात्री होईल की ती भांडी चुंबकाला चिकटत नाहीत. मग सोनारांच्या चुंबकाला कसे चिकटले?
सोनारांच्या हाताला वस्तू चिकटण्याचे कारण काय?
‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती‘ने स्वतः हा प्रयोग करून दाखवला आणि यातील फोलपणा स्पष्ट केला आहे. समिती प्रमाणेच इतर तज्ज्ञांचे मत हेच आहे की या वस्तू चिकटण्याचे कारण चुंबकीय शक्ती नसून घामग्रंथींमुळे त्वचेवरील ओलसरपणावर या सपाट, तुकतुकीत वस्तू चिकटत आहेत. ‘माय महानगर’ने हार्मोनतज्ज्ञ डॉ. तुषार गोडबोले यांचे स्पष्टीकरण नोंदवले आहे.
वस्तुस्थिती:
लसीकरणामुळेच शरीरात चुंबकत्व निर्माण झालं या दाव्यास अजून तरी शास्त्रीय आधार नाही. केंद्र सरकारच्या PIB ने देखील या दाव्यास ‘फेक‘ संबोधित केले आहे. तरीही खबरदारी म्हणून याविषयी सखोल चौकशी करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिले आहेत.
२. दावा: लस तयार करण्यासाठी डुकराचे मांस वापरले जाते
“क्या आप जानते हैं कि कोरोना के वैक्सीन को स्टेबलाइज रखने के लिए सुअर की चर्बी का इस्तेमाल किया जाता है ??” असे सांगत सोशल मीडियात अनेक दावे व्हायरल होत होते. यामुळे डूकरास निषिद्ध मानणाऱ्या मुस्लीम धर्मियांनी लस न घेण्याचा ठराव मांडावा का? अशी चर्चा घडवून आणली होती. शाकाहारी हिंदू, ज्यू धर्मियांतही लसीबाबत गोंधळ निर्माण झाला होता.
वस्तुस्थिती:
हे खरे आहे की एका ठिकाणावरून दुसरीकडे लस नेताना तिच्या तापमानात बदल होऊन परिणामकारकता खराब होऊ शकते. ते तापमान कायम राहावं यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. हे जिलेटीन डुकराच्या चरबीपासून बनवले जाते. परंतु फायझर, मॉडर्ना, ऍस्ट्राझेनिका-ऑक्सफोर्डची कोव्हीशिल्ड आणि भारतीय कोव्हॅक्सीन या कोणत्याही लशीच्या बनावटीसाठी डुकराचे किंवा अन्य कुठल्या प्राण्याचे मांस वापरले असल्याचा उल्लेख नाही. बहारिन, सौदी अरेबिया, बांग्लादेश, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया यांसारख्या मुस्लीमबहुल राष्ट्रांनी लसीकरण चालू केले आहे.
३. दावा: स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात लस घेऊ नये
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यात जर लस घेतली तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नये असे दावे व्हायरल झाले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’ने या दाव्याविषयी अतिशय साध्या सोप्या भाषेत आणि पुराव्यानिशी पडताळणी केली आहे. आमच्या पडताळणीत सदर दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. मुळात मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांची प्रतिकारशक्ती कमी होते हा दावाच फेक आहे. त्यामुळे त्या काळात कोरोनाची लस घेतल्याने शरीरावर काही विपरीत परिणाम होण्याचा संबंध येतच नाही. याविषयी इतरही माहिती जाणून घेण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करून विस्तृत रिपोर्ट वाचू शकता.
हे ही वाचा- केजरीवाल, राहुल गांधींना सेल्समन म्हणत तिसरी लाट ‘फायजर’ची खेळी सांगणाऱ्या दाव्याची झाडाझडती!
Be First to Comment