Press "Enter" to skip to content

धार्मिक रंग द्यायला ‘मलप्पूरम’च्या खांद्यावर बंदुक, पण घटना निघाली ‘पलक्कड’ची!

केरळमधील प्रेग्नंट हत्तीणीच्या मृत्यूची बातमी कालपासून सोशल मिडीयावर सर्वत्र दिसतेय. या मृत्यूमुळे पुन्हा एकदा मानवाचा भेसूर चेहरा समोर आल्याची खंत जवळपास प्रत्येक दुसरा माणूस व्यक्त करतोय. भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मात्र या मृत्यूला मलप्पूरम जिल्ह्यातील घटना म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलाय.

मनेका गांधींनी ANI न्यूज एजन्सीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलय, “ये हत्या है, मलप्पूरम ऐसी घटनाओं के लिए कुख्यात है, यह देश का सबसे हिंसक राज्य है. उदाहरण के लिए यहां लोग सड़कों पर जहर फेंक देते हैं जिससे 300 से 400 पक्षी और कुत्ते एक साथ मर जाएं.”

Credit : Twitter

आपलं हेच म्हणणं सांगणारं ट्वीट देखील मनेका गांधींनी केलंय. सोबतच केरळचे वनमंत्री आणि प्रकरणाशी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नंबर देखील शेअर करण्यात आलेत.

Credit : Twitter

मनेका गांधी यांच्यानंतर केंद्र सरकारमधील मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील ट्वीट करून ‘मलप्पूरम’ येथील हत्तीणीच्या हत्येची केंद्र सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल असं म्हंटलय. 

Credit : Twitter

घटनेत ‘मलप्पूरम’चा उल्लेख करून प्रकरणातील संभाव्य आरोपी मुस्लीम समुदायाचे असण्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोशल मीडियात तश्या पद्धतीचे प्रयत्न देखील झाले.

सुप्रीम कोर्टात वकील असणारे प्रशांत पटेल उमराव यांनी ट्वीट केलंय.

“मलप्पूरम, जहां प्रेग्नेंट हथिनी की हत्या की गई है वहां 70%+ शांतिप्रिय आबादी है,वहां हिन्दू प्रताड़ित हैं। चूंकि हिन्दू गणेश जी की पूजा करते हैं इसलिए उमा नामक हथिनी को मारा गया। मलप्पूरम IS का गढ़ है व मुस्लिम लीग द्वारा इसमें 9 जिले मिलाकर अलग राज्य बनाने की मांग हो रही है”

Credit : Twitter

अनेक न्यूज चॅनेल्स आणि न्यूज पेपर्सच्या वेबसाईटवर घटनास्थळ म्हणून ‘मलप्पूरम’चाच उल्लेख करण्यात आलाय. त्यातल्या काहींनी नंतर आपली माहिती अपडेट केलीये.  

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने प्रकरणाची तपासणी करायला घेतली त्यावेळी आमच्या हाती ANI न्यूज एजन्सीचं ट्वीट लागलं. या ट्वीटमध्ये केरळचे वनमंत्री के. राजू यांची प्रतिक्रिया आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की घटना ‘मलप्पूरम’मधली नसून ‘पलक्कड’ जिल्ह्यातली आहे.

Credit : Twitter

घटनेवर प्रतिक्रिया देताना केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केलेल्या ट्वीटमध्ये देखील ही घटना पलक्कडमधील असल्याचंच म्हंटल गेलंय. शिवाय अनेक न्यूज चॅनेल्स आणि न्यूज पेपर्स मध्ये देखील घटनास्थळ म्हणून ‘पलक्कड’चाच उल्लेख बघायला मिळतोय.

Credit : Twitter

त्यानंतर आम्ही घटना ‘पलक्कड’मध्ये नेमकी कुठे घडली याबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला ‘द न्यूज मिनिट’च्या एडिटर इन चीफ ‘धान्या राजेन्द्रन’ यांचं ट्वीट मिळालं. या ट्वीटमध्ये राजेंद्रन यांनी स्पष्ट  केलंय  की हत्तीण पल्लकड जिल्ह्यातून वाहणाऱ्या वेल्लीयार नदीमध्ये मृत अवस्थेत सापडली. पलक्कड जिल्ह्यातल्या मन्नारकड भागातल्या ‘कोत्तोपडम’ या गावातील ही घटना असल्याची माहिती त्या देतात.

Credit : Twitter

खातरजमा करण्यासाठी आम्ही गुगल मॅपवर वेल्लीयार नदी शोधण्याचा प्रयत्न केला पण ती ना मलप्पूरम जिल्ह्यात दिसली ना पलक्कडमध्ये.

ज्या वनअधिकाऱ्याच्या व्हायरल फेसबुक पोस्ट मुळे हे प्रकरण सगळ्या जगासमोर आलं त्या मोहन कृष्णन यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक लोकांनी हे प्रयत्न करून झाले असणार म्हणून त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

परंतु त्यांच्या फेसबुक वॉलवर आम्हाला ‘मन्नरक्कड लाइव्ह’ या लोकल न्यूज चॅनलचे नाव मिळाले. त्यांच्या फेसबुक पेजवरून मिळालेल्या नंबरवर आम्ही कॉल करून चौकशी केली.

त्यांनी हेच सांगितलं की वेल्लीयार नदी मलप्पूरम जिल्ह्यातील नसून ती पलक्कड मधीलच आहे. ती फार छोटी नदी असल्याने गुगल मॅपवरसुद्धा दिसणे मुश्कील आहे.

‘मन्नरक्कड लाइव्ह’च्या संपादकांनी मेसेज करून आम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. पहा काय सांगितलंय त्यांनी:

“घटनेची प्रॉपर जागा आहे अंबालाप्पारा. मलप्पूरम जिल्ह्याची बॉर्डर. अंबालाप्पारा पलक्कड जिल्ह्यातील एक गाव आहे. (मन्नारक्कड तालुका, कोट्टापदम पंचायत, थिरूवीळामकुन्नू वनाचा उपविभाग)

वन अधिकारी हत्तीणीला मे १३, १४ तारखांपासून थिरूवीळामकुन्नू भागात पाहत आहेत. तिला जखमा झाल्या होत्या, अधिकारी तिच्यावर इलाज करण्यासाठी लक्ष ठेऊन होते. त्यानंतर हत्तीण २५ मे रोजी अंबालाप्पारामध्ये आली. अंबालाप्पारा हा नागरी वसाहतीचा भाग आहे. ती हत्तीण थेय्यामकुंडात जाऊन उभी राहिली. थेय्यामकुंड वेल्लीयार नदीचा भाग आहे. वेल्लीयार ही छोटीशी नदी आहे. तिचा उगम सायलेंट व्हॅलीच्या जंगलात झालाय. ती पुढे ठुथा नदीला जाऊन मिळते आणि ठुथा भारथपुळा नदीला.”

Credit : Whatsapp

हत्तीण जेथून आली ती सायलेंट व्हॅलीसुद्धा पलक्कड जिल्ह्यातच आहे.

credit: google

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत ही गोष्ट स्पष्ट झाली की दि. २७ मे रोजी केरळमध्ये घडलेली ही क्रूर घटना कुठल्याही विशिष्ट धर्माशी थेट संबंधित नाही. घटनेमागे कुठलंही धार्मिक कारण नाही.

ही घटना ७० टक्के मुस्लीम लोकसंख्या असणाऱ्या ‘मलप्पूरम’मधील असल्याचे दावे साफ खोटे आहेत. घटना ‘पलक्कड’ जिल्ह्यातील ‘अंबालाप्पारा’ या गावातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘अंबालाप्पारा’ हे ‘पलक्कड’ आणि ‘मलप्पूरम’च्या सीमेवर वसलेलं ठिकाण आहे. ‘मलप्पूरम’चा या घटनेशी फक्त तेवढाच संबंध आहे.

त्यामुळे ज्या ‘मलप्पुरम’ जिल्ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचा घटनेशी संबंध नसून घटना पलक्कड जिल्ह्यातील असल्याचे ‘स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर’च्या को-प्रोड्युसरने राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्यासाठी वापरला एडीटेड व्हिडीओ!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा