अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही महिन्यांपासून सरकार धार्जिणी, भाजप धार्जिणी भूमिका घेत सातत्याने काहीही ट्विट्स करताना दिसत आहे. त्यातच तिने शेतकरी आंदोलनाबाबत असेच एक फेक दावा असणारे ट्विट केले आणि वृद्ध शेतकरी महिलेचा अपमान होईल असे वक्तव्य केले. यावरूनच गायक दिलजित दोसांजने तिला खडे बोल (kangana and diljit twitter) सुनावले. हा वाद पराकोटीला वाढतच गेला, याची नेटकर्यांनी चांगलीच मजा घेतली. याच वादाविषयी बातमी देताना ‘दै. सकाळ’ने चक्क एका मिमला खरे समजत त्यातील मजकुराच्या आधारे बातमी प्रकाशित केलीय.
सकाळने चक्क ‘अगर आज जट बिगड गया ना तो, मनाली टू मुंबई टट्टीया करती जायेगी’‘ अशा हेडलाईनसह बातमी प्रसिद्ध केली आहे. ‘दिलजित-कंगना’ वादाने आता किळसवानी पायरी गाठली असे म्हणत या बातमीची सुरुवात झालीय. विशेष म्हणजे कंगनाच्या ट्विटला दिलजितने उत्तर दिल्यानंतर त्याची स्तुती करायला ऋतिक रोशन सुद्धा आल्याचं यात लिहिलंय.
काय आहेत ट्विट्स:
कंगना: “कॉन्ट्रव्हर्सी मेरा रोज का काम, हो चुकी हुं एक दम ढीट. जब पुरा बॉलीवूड कुछ ना कर पाया, तू क्या उखाड लेगा दिलजित.”
दिलजित: “मेरे मुह ना लग ओये, सच्ची केहंदा बहुत पछतायेगी. अगर आज ये जाट बिगड गया ना, मनाली टू मुंबई टट्टीया करती जायेगी.”
हृतिक: “सरदारजी मोहब्बत हो गयी है आपसे.”
पडताळणी:
ट्विटरवर कंगना राणावत आणि दिलजीत दोसांझ यांच्यात वाकयुद्ध (kangana and diljit twitter) भडकलंय. कंगना सातत्याने विषय भरकटवण्याचा प्रयत्न करतेय. ती शेतकरी आंदोलनाविषयी आणि तिने शेअर केलेल्या फेक फोटो आणि दाव्याविषयी न बोलता या वादात बॉलिवूड आणि करण जोहरला खेचण्याचा प्रयत्न करतेय. दिलजीत मात्र अगदी मुद्देसूदपणे कंगनाला पुन्हा-पुन्हा शेतकरी आंदोलनाविषयी बोलायला भाग पाडतोय.
सहाजिकच दिलजित दोसांज सारखा व्यक्ती कंगनाला एवढ्या हीन पातळीवर जाऊन प्रतिउत्तर देईल? यावर शंका आल्याने ‘चेकपोस्ट मराठी’ने सदर बातमी व्यवस्थित वाचली. पुरावे म्हणून बातमीत ट्विटरचे स्क्रीनशॉट सुद्धा दिले आहेत. परंतु जेव्हा त्या इमेजेसकडे आम्ही बारकाईने पाहिले तेव्हा ह्या सगळ्या प्रकरणातील गडगड लक्षात आली.
ज्या ट्विटर हँडल्सवरून हे ट्विट केले गेले आहेत ते भलेही ब्ल्यू टिक असणारे दिसत असले तरी युजरनेम कडे लक्ष दिले तर हे नक्कीच फेक असतील असे जाणवते. त्यासाठी आम्ही एकेक युजरनेम टाकून सर्च केले तर लक्षात आले की कंगना आणि हृतिकच्या नावाने ‘LafdaQueen’ आणि ‘@MazaAagyaVaai’ या ट्विटर युजरनेमवरून ट्विट केल्याचे लक्षात आले. परंतु असे ट्विटर अकाऊंटच अस्तित्वातच नाहीये. हेच दिलजित बाबतही ‘@GOAT’ असे कॅपिटल लेटर्स असणारे ट्विटर अकाऊंट अस्तित्वातच नाही. स्मॉल लेटर्स असणारे आहे पण ते ‘लिओ वांग’ या व्यक्तीचे आहे.
ट्विटरवरच सर्च केल्यानंतर कंगना, हृतिक आणि दिलजित यांचे खरे व्हेरीफाईड हँडल्स सापडले. कंगना राणावत ‘@KanganaTeam‘ हृतिक रोशन ‘iHritik‘ आणि दिलजित दोसांज ‘@diljeetdosanjh‘ या युजरनेमसह ट्विटरवर ऍक्टिव्ह आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘दै.सकाळ’ने दिलजित-कंगना वादाविषयी जी बातमी दिलीय ती फेक ट्विट्सच्या आधारे दिलीय. फेसबुकवर सकाळने अधिकृत पेजवरून पोस्ट केलेल्या या बातमीच्या कमेंट्समध्ये सोशल मिडिया युजर्सने कमेंट करून ‘सकाळ’ला खडे बोल सुनावले आहेत. मिम आणि खरे ट्विट्स यातला फरक न समजणारे फेक न्यूजच्या विरोधात काय लढणार? असा सवाल केला जातोय.
हेही वाचा: शिवसेनेला नाईलाजास्तव मत द्यावं लागल्याचा कंगनाचा दावा फेक!
[…] हे ही वाचा- ‘दै. सकाळ’ने दिली मिम ट्विट्स खरे मानत… […]