‘होमिओपॅथी’ औषधांनी केली कमाल ! अगदी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण.
या हेडलाईन खाली ‘होमिओपॅथी’ औषधोपचाराने कोरोना रुग्ण बरे झाल्याची बातमी २४ मे रोजी ‘न्यूज18 लोकमत’ने दिली. मध्यप्रदेशातील भोपाळच्या ‘शासकीय होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल’ मधून तीन कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करून घरी सोडलं असं बातमीत सांगितलं आहे.
‘कोरोना व्हायरस पासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने काही होमिओपॅथी औषधं घेण्याचा सल्ला दिला आहे आणि आता याच होमिओपॅथी औषधांनी कमाल करून दाखवली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ मध्ये होमिओपॅथी औषधांमुळे 3 कोरोना रुग्ण बरे झालेत. त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्यात.’ असंही या बातमीत म्हंटलंय.
पडताळणी:
सगळं जग कोरोनावर ईलाज शोधत असताना आपल्या देशात ‘होमिओपॅथी’ औषधांनी जर रुग्ण बरे होत असतील त्यासारखी आनंदाची बाब नक्कीच नाही. पण बातमी आली म्हणून त्यावर विश्वास ठेवावा, ही परिस्थिती सध्या तरी नाही.
बातमीच्या पडताळणी साठी ‘चेकपोस्ट मराठी’ने थेट भोपाळच्या ‘गव्हर्नमेंट होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’च्या प्रिन्सिपल कम अधीक्षकांशी संपर्क साधला. आमच्याशी बोलताना डॉ. एस. के. मिश्रा यांनी संबंधित बातमीला दुजोरा देताना ‘आम्ही कालच, म्हणजे २४ मे रोजी ३ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे आणि आज ६ रुग्णांना डिस्चार्ज देणार आहोत. हे सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. आता त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.’ असे सांगितले.
आम्ही डॉ. एस. के. मिश्रा यांच्याकडे रुग्णांमधील लक्षणांविषयी विचारपूस केली असता, रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं दिसत नसल्याचं सांगितलं. ‘आर्सेनिकम अल्बम ३०’ या गोळ्या आणि इतरही काही ‘होमिओपॅथी’ औषधांचा वापर करून रुग्णांवर उपचार केल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय सुरुवातीला काही प्रमाणात अॅलोपथिक औषधांचा सुद्धा वापर केल्याचं त्यांनी सांगितलं. हीच माहिती लिखित स्वरुपात द्यायला मात्र डॉक्टरांनी नकार दिला. ते आपल्या अधिकारात नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
२६ मे रोजीच्या ‘हिंदुस्थान टाईम्स’मध्ये याच विषयावर एक बातमी आली आहे. बातमीत त्याच ‘होमिओपॅथी’ कॉलेजच्या रिसर्च विंगचे डॉ. एस.एन. शुक्ला याचं कोट आहे. त्यात डॉक्टर शुक्ला म्हणतात की ‘रुग्णांवर उपचार करताना आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या उपचारपद्धती आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन करत आहोत. आम्ही रुग्णांना नेमकी कुठली औषधे देतोय आणि कुठली नाही, याविषयीची माहिती मात्र मी देऊ शकत नाही. राज्य सरकारने आम्हाला कोव्हीड केअर हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली, त्याला आता दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटलाय ’
२६ मे रोजीच्याच ‘द इंडियन एक्सप्रेस’ मध्ये देखील यावर बातमी प्रसिद्ध झाली आहे. हॉस्पिटलच्या अधीक्षिका डॉ. सुनिता तोमर यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला असं सांगितलंय की, ‘ICMR ची नियमावली पाळण्यासाठी रुग्णांना दाखल करून घेताना आम्ही अगदी सुरुवातीला ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा डोस देखील दिला होता.
याच बातमीत भोपाळचे जिल्हाधिकारी तरुण पिथोडे यांचा कोट देखील छापण्यात आलाय. तरुण पिथोडे म्हणतात की जर आम्ही असं म्हणत असू की फक्त ‘होमिओपॅथी’च्या औषधांनीच रुग्णांवर उपचार केले, तर ते म्हणणं चुकीचं ठरेल. हे कदाचित प्रासंगिक असू शकतं. रुग्णांमध्ये प्रतिकारक्षमता वाढलेली असू शकते.”
वस्तुस्थिती:
- भोपाळच्या शासकीय ‘होमिओपॅथी’ कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य, अधीक्षक डॉ. मिश्रा सांगतायेत आम्ही अगदी सुरुवातीला या रुग्णांना ‘ऍलोपॅथी’ औषधं दिली होती.
- त्याच हॉस्पिटलच्या अधीक्षिका डॉ. सुनिता तोमर म्हणतायेत की आम्ही रुग्ण दाखल करून घेताना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा डोस दिला होता.
- भोपाळचे कलेक्टर म्हणतायेत की रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे सुद्धा ते बरे झाले असतील. फक्त ‘होमिओपॅथी’च्याच औषधांनी आम्ही रुग्णांवर उपचार केले असं सांगणं चुकीचं ठरेल कारण ‘ऍलोपॅथी’ औषधांचा सुद्धा वापर केला होता.
- स्वतः ‘न्यूज 18 लोकमत’ने बातमीत लिहिलं आहे की ‘या रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या या रुग्णांना हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाशिवाय लक्षणांनुसार होमिओपॅथी औषधंही देण्यात आली.’
या सर्व उपलब्ध माहितीच्या आधारे आणि रुग्ण दाखल झाले तेव्हा त्यांच्यात लक्षणेच नव्हती किंवा अगदीच कमी होती या तथ्याकडे बघता कुठल्याही ठोस शास्त्रीय पुराव्याशिवाय ‘होमिओपॅथी’ औषधांनीच हे रुग्ण बरे झाले, अशा म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे ‘‘होमिओपॅथी’ औषधांनी केली कमाल! अगदी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण’ अशी हेडलाईन वापरून ‘न्यूज 18 लोकमत’ वाचकांची दिशाभूल केली आहे, हे सिद्ध होतंय.
हे ही वाचा:
आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या होमिओपॅथीक ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ गोळ्या कोरोनावरचा रामबाण उपाय आहे का?
[…] […]
[…] […]
[…] […]