कुर्ला स्टेशनच्या फलाटावरून जात असलेल्या मुस्लीम अंत्ययात्रेचे म्हणजेच जनाज्याचे व्हिडीओज सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवर ‘हिम्मत देखिये इनकी, इनका विरोध नहीं किया तो कल ये पुरा हिंदुस्तान कब्जा लेंगे’ असे लिहून फॉरवर्ड केले जातेय.
काही दाव्यांत असेही लिहिले आहे की आता ते फलाटावरच शव दफन करणार आणि काही दिवसांत मजार उभी करणार.
ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सऍपवरही हे दावे खूप जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय राजवाडकर, सुभाष विस्पुते, करण गायकवाड, दत्तू गवाणकर आणि सुभाष देसाई यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की ही पहिलीच घटना नाही. या आधीही अनेकदा मुस्लीम जनाजा कुर्ला स्टेशनच्या फलाटावरून गेला आहे. या संबंधीच्या बातम्या २०१८, २०१९ अशा वर्षांत प्रसिद्ध झाल्या होत्या.
मुस्लीम अंत्ययात्रा फलाटावरून का न्यावी लागते?
मुंबईमधील गजबजाट असणाऱ्या स्टेशनवरील फलाटावरून अंत्ययात्रा नेण्याचा प्रकार निश्चितच आश्चर्याचा विषय आहे परंतु यामागचे नेमके कारण काय? हे शोधत असताना आम्ही याविषयीच्या विविध बातम्यामधील माहिती एकत्रित केली.
कुर्ला येथील सुन्नी मुस्लीम कब्रस्तान पूर्व भागात आहे. पश्चिम कुर्ल्याच्या मुस्लीम समाजातील कुणाच्या मृत्यूनंतर याच कब्रस्तानमध्ये यावे लागते. परंतु रेल्वेलाईन ओलांडण्यासाठी नीटसा रस्ता नाही. चुनाभट्टी वरून दुसरा एक मार्ग आहे परंतु एवढा मोठा वळसा घालून येण्यासाठी त्या अंत्ययात्रेस तब्बल २ तास लागतात.
यास पर्याय म्हणून मुस्लीम समुदायास खांद्यावर जड शव घेऊन दोन रेल्वे ब्रिज चढून उतरून मग फलाटावरून चालत कब्रस्तानाकडे जावे लागते. यासंबंधी स्थानिक मुस्लिमांनी कित्येकदा रेल्वे प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे पुलाची मागणी केली आहे परंतु ती आजतागायत प्रलंबित आहे.
ही केवळ पश्चिमेला राहण्याऱ्या मुस्लीम समजासाठीच नव्हे तर पूर्वेच्या राहणाऱ्यांचीही समस्या आहे. कबरस्तानकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गात अतिक्रमण आहे. झोपडपट्टीसदृश्य भागातून असणारी चिंचोळी गल्ली आहे परंतु येथून एकावेळी एक व्यक्ती चालू शकतो, अंत्ययात्रा कशी जाईल? त्यामुळे त्यांना फलाट क्रमांक १ वरून दफनभूमीकडे जावे लागते.
रेल्वे प्रशासन महानगरपालिकेकडे आणि पालिका रेल्वे प्रशासनाकडे सदर समस्येसंबंधी टोलवाटोलवी करतेय. रेल्वे प्रवासी संघटनेनेही यासंबंधी अनेकदा अर्ज केले आहेत. गर्दीच्या वेळी अशा जनाजामुळे चेंगराचेंगरी झाली तर काय कराल? असे कडवट प्रश्नही विचारले आहेत परंतु अजूनही काही हालचाल झाल्याचे ऐकिवात नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत सदर व्हायरल व्हिडीओ नेमका कोणत्या तारखेचा आहे हे समजले नाही परंतु यामागचे कारण आम्ही शोधू शकलो. कुर्ला स्टेशनच्या पश्चिम भागातून पूर्वेकडे असणाऱ्या कब्रस्तानकडे जाण्यासाठी दुसरा सोयीस्कर मार्ग नसल्याने नाईलाजाने मुस्लीम समुदायास फलाटावरून जनाजा घेऊन जावा लागतो. यामध्ये कुठेही स्टेशनवर अथवा देशावर कब्जा करण्याचा मानस असल्याचे आढळले नाही.
हेही वाचा: हिंदू वस्त्यांमध्ये रासायनिक भेसळ असणारे अन्नपदार्थ विका असा ‘दारूल उलुम देवबंद’चा फतवा? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: कुर्ला स्टेशनच्या फलाटावरील मुस्लीम … […]
[…] हेही वाचा: कुर्ला स्टेशनच्या फलाटावरील मुस्लीम … […]