Press "Enter" to skip to content

‘अपहेलिअन फेनॉमेना’मुळे 22 ऑगस्टपर्यंत हवामान अधिक थंड राहणार असल्याचे दावे फेक!

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जातोय की अल्बेलियन घटनेमुळे 22 ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहणार आहे. दरम्यानच्या काळात शरीर दुखणे आणि घसा भरून येणे, ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो असेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.

Advertisement

काय आहे व्हायरल?

उद्यापासून 22 ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहील. याला अल्बेलियन घटना म्हणतात. ही उद्या सकाळी 5-27 वाजता सुरू होईल.

Alphelion Phenomenon चे परिणाम आपण फक्त पाहणारच नाही तर अनुभवू देखील शकतो. ते ऑगस्ट 2022 मध्ये संपेल.

या काळात आपण पूर्वी कधीच नसलेल्या थंडीचा अनुभव घेऊ शकतो.. त्यामुळे आपले शरीर दुखते आणि घसा भरतो, ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतो. म्हणून, जीवनसत्त्वे आणि इतर निरोगी अन्न उत्पादनांसह आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे चांगले आहे.

 सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 90,000,000 किमी आहे.

पण या Alphelion Phenomenon दरम्यान, दोघांमधील अंतर वाढून 152,000,000 किमी होईल. म्हणजेच 66% वाढ.

कृपया हे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांमध्ये शेअर करा.

फेसबुकवर हा मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही ‘अपहेलिअन’ म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. इंटरनेटवर यासंबंधीचे अनेक लेख वाचायला मिळाले. आपण जाणतोच की पृथ्वी स्वतःभोवती फिरतानाच सूर्याभोवती देखील फिरते. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण हे अगदीच वर्तुळाकार नसते तर अंडाकार असते. त्यामुळे वर्षातील दोन दिवस असे असतात की ज्या दिवशी पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ आणि सर्वात लांब असते.

पृथ्वी ज्या दिवशी सूर्यापासून सर्वात लांब असते, तो दिवस म्हणजे अपहेलिअन दिवस आणि पृथ्वी ज्या दिवशी सूर्यापासून सर्वात जवळ असते तो दिवस म्हणजे पेरीहेलिअन दिवस. अपहेलिअन (aphelion) आणि पेरीहेलिअन (perihelion) या दरवर्षी घडणाऱ्या घटना आहेत. दरवर्षी 4 जानेवारी रोजी पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ असते तर 4 जुलै रोजी सूर्यापासून सर्वात लांब.

खरंच पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यानचे अंतर 66 टक्क्यांनी वाढणार?

व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात आलाय की पृथ्वी आणि सूर्यादरम्यानचे सरासरी अंतर 90 दशलक्ष किलोमीटर असते ते वाढून 152 दशलक्ष होणार आहे. म्हणजेच सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर 66 टक्क्यांनी वाढणार आहे. नासाकडून देण्यात आलेली माहिती मात्र यापेक्षा वेगळी आहे.

नासानुसार पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर सुमारे 150 दशलक्ष किलोमीटर असते. अपहेलिअन पॉईंटवर असताना पृथ्वी सूर्यापासून सरासरी अंतरापेक्षा दूर म्हणजेच 152.6 दशलक्ष किलोमीटरवर असते, तर पेरीहेलिअन पॉइंटवर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर असते 147.5 दशलक्ष किलोमीटर. म्हणजेच अपहेलिअन पॉईंटवर असताना पृथ्वी सूर्यापासून सरासरी अंतरापेक्षा 2.6 दशलक्ष किलोमीटर किंवा 1.66 टक्क्यांनी दूर असते.

जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधक तसेच नासाकडून या घटनांचा पृथ्वीच्या तापमानावर काही परिणाम होण्याच्या शक्यता नाकारण्यात आल्या आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे ‘अपहेलिअन फेनॉमेना’मुळे 22 ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहणार असल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल दावे फेक आहेत. पृथ्वीचे अपहेलिअन पॉईंटवर असणे ही काही यावर्षीच होत असलेली गोष्ट नाही, तर हे दरवर्षीच घडते. यामुळे पृथ्वीच्या तापमानावर परिणाम होत नाही.

हेही वाचा‘एस.टी’ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४००० किमी मोफत प्रवासाची योजना सुरु केली आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा