आफ्रिका खंडातील गाम्बिया (Gambia) नावाच्या देशात मुस्लीम अल्पसंख्यांक होते तोवर ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र होते, परंतु जसजशी मुस्लीम लोकसंख्या वाढली तसे लगेच ‘मुस्लीम राष्ट्र’ म्हणून घोषित करण्यात आल्याचे दावे व्हायरल होत आहेत. भारतातही अशीच काही वेळ भविष्यात येईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सऍप अशा सर्वच माध्यमांतून हे दावे व्हायरल होतायेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निअर अली यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता हे लक्षात आले की २०१५ साली गाम्बियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष याह्या जम्मेह (Yahya Jammeh) यांनी गाम्बियास मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले.
मुस्लीम लोकसंख्या वाढली म्हणून ‘मुस्लीम राष्ट्र’?
नाही. गाम्बिया हे सुरुवातीपासूनच मुस्लीमबहुल राष्ट्र आहे. देशाची ९६% लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे, ३% ख्रिश्चन आणि उरलेले १% लोक पारंपारिक आफ्रिकन धर्माच्या चालीरीतीचे पालन करत आहेत. या संख्येवरून सहजच लक्षात येऊ शकते की मुस्लीम लोकसंख्या वाढली म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याच्या दाव्यांत तथ्य नाही.
‘बीबीसी‘च्या बातमीनुसार गाम्बियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष याह्या जम्मेह यांनी ११ डिसेंबर २०१५ रोजी एक राजकीय सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी गाम्बियास मुस्लीम राष्ट्र घोषित केले. यावेळी अचानक घेतलेल्या या निर्णयाविषयी स्पष्टीकरण देताना त्यांनी गाम्बियाच्या पारतंत्र्याचा भूतकाळ मिटवून टाकण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. १८ फेब्रुवारी १९६५ रोजी गाम्बियाला ब्रिटीश वसाहतीतून स्वातंत्र्य मिळाले होते.
अर्थात या निर्णयास जोरदार विरोध सुद्धा झाला होता. २०१६ सालीच झालेल्या निवडणुकीत याह्या जम्मेह यांचा पराभव झाला. या निकालावरच त्यांनी आक्षेप घेतला आणि पदावरून पायउतार होण्यास नकार दिला. न्यायालयीन प्रक्रिया, आफ्रिकेतील इतर राष्ट्रांचा दबाव, या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर याह्या यांना थेट देशाबाहेर काढून देण्यात आले होते.
भारताची धर्मानुसार लोकसंख्या:
२००१ साली झालेल्या शासकीय जणगणनेनुसार आपल्या देशात ८०.५% हिंदू, १३.४% मुस्लीम, २.३% ख्रिश्चन आणि उर्वरित टक्केवारीत इतर धर्मीय आहेत. या आकडेवारीनुसार मुस्लीम बहुसंख्य होतील आणि मग भारत मुस्लीम राष्ट्र बनेल असा काही कुतर्क काढणे काहीसे हास्यास्पद आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की गाम्बिया देशात मुस्लीम धर्मीय बहुसंख्य झाल्याने त्यास मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे दावे फेक आहेत. गाम्बिया या पूर्वीपासूनच मुस्लिमबहुल देश आहे.
हेही वाचा: प्रसिद्ध कॉमेडियन टिकु तलसानिया यांनी इस्लामचा स्वीकार केलाय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
गांबिया हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र होतो की नाही हे पहावे लागेल
म्हणून भविष्यात भारत मुस्लिम राष्ट्र मुस्लिम संख्या वाढल्यास
होईल हे बोलायला ठीक आहे हा तर्क करण्यात वेळ घालविण्या पेक्षा भारत सरकारवर दबाव आणला पाहिजे की जसे ३७० कलम लागू केले, जीएसटी लागू केली, नोटबंदी केली तसेच लोक संख्या नियंत्रण कायदा पहिल्या प्रथम आणणे आवश्यक आहे,परंतु कॅांगरेस व भाजपा दोघांनीही जाणून बुजून हा कायदा आणला नाही।यांवर सर्वानी बोलावे।