Press "Enter" to skip to content

‘कोरोना आजार नाही, षडयंत्र’ म्हणणाऱ्या डॉ. निलेश पाटील यांचे दावे दिशाभूल करणारे!

‘कोरोना आजार नाही, एक षडयंत्र’ असे म्हणणाऱ्या डॉ. निलेश पाटील (Dr. Nilesh Patil) आणि डॉ. पल्लवी पाटील यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.

‘कोरोना आला नाही …… इथेच होता, आहे, आणि राहणार, डॉ. निलेश आणि डॉ. पल्लवी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी केला चमत्कार, पीपीई किट न घालता रोज चार तास पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात.’

Advertisement

ही अशी वाक्ये लिहून युट्युब व्हिडीओची लिंक जोडलेला एक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक उमेश कुचेकर आणि प्रफुल्लकुमार कांबळे यांनी निदर्शनास आणून दिलं.

Dr. Nilesh Patil viral video whatsapp message screenshot
Source: Whatsapp

डॉ. निलेश पाटील यांनी केलेले दावे:

  • कोरोना व्हायरसच्या अस्तित्वावरच शंका आहे
  • कोव्हीड१९ टेस्टिंग किट्सच्या GMP सर्टिफिकेशनमध्ये गडबड
  • जगभरात कोव्हीड१९ टेस्टिंग कीट बनवणाऱ्या केवळ १३-१४ कंपन्या आहेत, त्यापैकी ८ कंपन्या चायनीज आहेत
  • कोरोनाचा इन्क्यूबेशन पिरीयड ७ दिवसांचा
  • पेशंटला डिस्चार्ज देण्याच्या नियमांत WHO आणि भारत सरकारच्या नियमांत विसंगती
  • औषधांविना तीन रुग्णांना बरे केले, पीपीई कीट न घालता संपर्कात आलो तरीही ठणठणीत

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीसाठी सुरुवात करताना सर्वात आधी व्हायरल व्हिडीओ बारकाईने ऐकला. व्हिडीओमध्ये डॉ. निलेश पाटील आणि त्यांची पत्नी डॉ. पल्लवी पाटील यांनी केलेली वक्तव्ये बऱ्याच ठिकाणी परस्परविरोधी असल्याचं लक्षात आलं. पाहूयात डॉ. पाटील (Dr. Nilesh Patil) यांचे दावे आणि त्यांची वस्तुस्थिती.

कोरोना व्हायरसच्या अस्तित्वावरच शंका

डॉ. पाटील सुरुवातीला असा दावा करताहेत की कोरोना भारतात आधीपासूनच होता. नंतर पुढे ते म्हणताहेत की शरीरात साडे तीन हजार व्हायरसेस असतात. त्याला ओळखणे अवघड आहे. तो असूही, शकतो किंवा नसूही शकतो किंवा ते शरीरातील एखादं द्रव्य (फ्ल्युड) असणार. ही दोन्ही वाक्ये परस्परविरोधी आहेत.

ते म्हणताहेत की एवढ्या मोठ्या संख्येत तो व्हायरस कोरोनाचाच आहे हे ओळखणं अवघड आहे. याचंच विश्लेषण करताना ते उदाहरण म्हणून टीव्हीवर क्रिकेट पाहताना हेल्मेट घातलेले विराट कोहली आणि अजिंक्य राहणे ओळखणे अवघड जाते तसे व्हायरस एकसारख्या आकाराचे असल्याने ओळखणे अवघड आहे असं सांगतायत.

व्हायरस नेमका कसा शोधला जातो हे जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल सर्च केलं तेव्हा PCR Detection test ही पद्धत वापरली जात असल्याचं समजलं. या पद्धतीत डबल स्ट्रँड DNA ९५ डिग्री सेल्सियस तापमानात सिंगल स्ट्रँड केला जातो. त्यानंतर त्यावर Denaturation, Annealing आणि Extensions या तीन पद्धती जवळपास ४५ वेळा वारंवार वापरल्या जातात. आणि मग त्यांचे परीक्षण केले जात असल्याचे समजले.

PCR डिटेक्शन टेस्ट प्रोसेस:

या एकंदर प्रोसेसमधून हे लक्षात आलं की मायक्रोस्कोप मध्ये पाहून आकारावरून व्हायरस ओळखला जात नाही, त्यासाठी PCR डिटेक्शन टेस्ट प्रोसेस केली जाते.

कोव्हीड१९ टेस्टिंग किट्सच्या GMP सर्टिफिकेशनमध्ये गडबड

हे खरंय की कुठल्याही मेडिकल प्रोडक्टला मार्केटमध्ये येण्यासाठी GMP सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं. परंतु WHO स्वतः असे सर्टिफिकेट देत नाही, त्यांनी केवळ एक नियमावली बनवली आहे. त्या नियमावलीला धरून प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने तपासणी करतो आणि GMP सर्टिफिकेट देतो. ही माहिती आम्हाला WHO च्या अधिकृत वेबसाईटवर मिळाली.

भारत कुठेलेही मेडिकल प्रोडक्ट वापरण्यासाठी ICMR (Indian Council of Medical Research) कडून मंजुरी मिळणे आवश्यक असते. हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ICMRच्या काही गाईडलाईन्स आहेत. गाईडलाईन्सप्रमाणे US-FDA (U.S. Food and Drug Administration) ने ज्यांना मंजुरी दिली आहे ते पुन्हा तपासण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रोडक्टचे परीक्षण केल्यानंतरच ICMR त्याला मंजुरी देते.

याचा अर्थ असा आहे की कुठल्याही टेस्टिंग कीटची व्यवस्थित तपासणी केल्याशिवाय ते वापरात आणले म्हणणे अति धाडसाचे होईल.जगभरात कोव्हीड१९ टेस्टिंग कीट बनवणाऱ्या केवळ १३-१४ कंपन्या आहेत

जगभरात कोव्हीड१९ टेस्टिंग कीट बनवणाऱ्या केवळ १३-१४ कंपन्या, त्यापैकी ८ कंपन्या चायनीज

कोव्हीड१९ टेस्टिंग कीट बनवणाऱ्या जगभरात किती कंपन्या आहेत याचा परफेक्ट आकडा समजला नाही परंतु २३ एप्रिल २०२० रोजी पब्लिश झालेल्या रिपोर्टनुसार एकट्या FDAने ३२ कंपन्यांच्या किट्सला मंजुरी दिल्याचं समजलं. यातील जवळपास सर्व कंपन्या अमेरिकेच्याच आहेत.

FDA व्यतिरिक्त विविध देशातील संस्थांनी आपापल्या पातळीवर अप्रुव्हल दिलेल्या टेस्टिंग कीट कंपन्या आणि २३ एप्रिल पासून आजवर मंजुरी मिळालेल्या इतर कंपन्या यांची आकडेवारी तर वेगळीच. याचाच अर्थ असा की डॉ. निलेश पाटील (Dr. Nilesh Patil) सुचवू पाहताहेत त्याप्रमाणे चीन स्वतः कीट बनवून नफा कमावत आहे, असं समजायल आकडेवारीचा आधार नाही.

कोरोनाचा इन्क्यूबेशन पिरीयड ७-८ दिवसांचा असतो

डॉ. पल्लवी पाटील व्हिडीओच्या १२.२५ मिनिटापासून पुढे सांगताहेत की “व्हायरसचा ७-८ दिवसांचा इन्क्यूबेशन पिरीयड असतो, एवढे दिवस तो आपल्या शरीरात राहतोच, आपण कितीही अँटीबायोटीक घ्या..”

मुळात इन्क्यूबेशन पिरीयड म्हणजे व्हायरस शरीरातून जाण्याचा वगैरे काळ नसून तो व्हायरस शरीरात प्रवेश करण्यापासून लक्षणे दिसून येईपर्यंतचा काळ म्हणजे इन्क्यूबेशन पिरीयड आहे. हा प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो. इन्क्यूबेशन पिरीयड आणि त्याबद्दलचे समज गैरसमज समजून घेण्यासाठी आपण ‘चेकपोस्ट मराठी’चा ‘हा’ फॅक्टचेक रिपोर्ट वाचू शकता.

पेशंटला डिस्चार्ज देण्याच्या नियमांत WHO आणि भारत सरकारच्या नियमांत विसंगती

डॉ. निलेश पाटील (Dr. Nilesh Patil) व्हिडीओच्या २०.३५ मिनिटाला म्हणताहेत ” गव्हर्नमेंटच्या प्रोटोकॉलनुसार १०-१२ दिवसांत टेस्ट न करता घरी सोडतात. WHO म्हणतं टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच तुम्ही निगेटिव्ह होता. आणि आता नियम असे बदलले की टेस्ट न करता घरी सोडतायत. समजा हे पॉझिटिव्ह राहून घरी जात असतील तर दुसऱ्यांना फैलाव करू शकतात.”

याची पडताळणी केली असता WHOच्या साईटवर ‘Criteria for releasing COVID-19 patients from isolation’ या शीर्षकाखाली दिलेले स्पष्टीकरण आढळले. यात सांगितल्याप्रमाणे १२ जानेवारी २०२० ला जारी केलेल्या नियमानुसार रुग्ण बरा झाल्याचे दिसून येत असल्यास २४ तासांच्या अंतराने टेस्ट करून पहावी आणि निगेटिव्ह आल्यास डिस्चार्ज द्यावा सांगितले होते परंतु २७ मे २०२० रोजी हे नियम अपडेट केले गेले आणि यात टेस्ट करण्याची गरज नाही असे सांगितले आहे.

लक्षणे असणाऱ्या रुग्णाचा ताप आणि श्वसनासंबंधी त्रास गेला असेल तर साधारण १३ दिवसांत आयसोलेशन मधून डिस्चार्ज द्यावा आणि लक्षणे नसणाऱ्या व्यक्तीला १० दिवसांनी डिस्चार्ज द्यावा असे सांगितले आहे. हे नियम त्या व्यक्तीचा इतरांना संसर्ग होऊ नये याचा अभ्यास करून बनवले असल्याचं त्या रिपोर्टमध्ये आढळून येईल.

औषधांविना रुग्ण बरे केले/पीपीई कीट न घालता ठणठणीत

मुलाखतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ४ रुग्णांवर प्रयोग करण्यासाठी आयुक्तांकडून परवानगी घेतली, वेगवेगळी लक्षणे आणि वये असणाऱ्या रुग्णांना योगा आणि ‘क’ जीवनसत्वाच्या नैसर्गिक डोसेजने चार दिवसांत कोरोना निगेटिव्ह केले असे दावे केले आहेत.

सोबतच त्यांनी पीपीई कीट न घालता संपर्कात राहूनही/ पेशंटच्या हातून पेढा खाऊन/ त्यांच्या हातून मोबाईल घेऊनही ठणठणीत असल्याचे अनुभव कथन केले आहे.

या सर्व दाव्यांना नेमका काय शास्त्रीय आधार आहे याबद्दल ते कुठेही बोलताना आढळत नाहीत. पेढा खाऊन, मोबाईल घेऊनही काही झाले नसल्याचे सांगणारे डॉ. निलेश आणि पल्लवी पाटील एका युट्युब व्हिडीओमध्ये तोंडाला मास्क लाऊन रुग्णांना योगा शिकवत असल्याचे दिसत आहेत.

मुंबई मिरर आणि सकाळच्या माहितीनुसार डॉ. निलेश पाटील (Dr. Nilesh Patil) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव जिल्हा सह संघचालक आहेत. डॉ. निलेश ओर्थोपेडिक सर्जन आणि डॉ. पल्लवी रेडीओलॉजिस्ट आहेत.

९ जुलै रोजी मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार डॉ. पाटील यांच्या सर्व दाव्यांना अशास्त्रीय म्हणत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली असून ७ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी डॉ. निलेश पाटील आणि डॉ. पल्लवी पाटील यांना कोव्हीड केअर सेंटर मध्ये येऊन योगा शिकवण्यासाठी दिलेल्या परवानग्या काढून घेतल्या आहेत. तसेच सिव्हील हॉस्पिटलच्या शल्यचिकित्सकाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये डॉ. निलेश आणि पल्लवी पाटील यांनी केलेले बहुतांश दावे अशास्त्रीय, निराधार आणि चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी रुग्णांना हाताळण्यासाठी वापरलेली पद्धत भावनिक आणि माणुसकीला अनुसरून जरी असली तरीही WHO आणि ICMRच्या नियमावलीनुसार चुकीची आहे. याने ते स्वतःलाच नव्हे तर त्यांच्या खाजगी दवाखान्यात इलाज करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनासुद्धा धोक्यात टाकत आहेत.

हेही वाचा: नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टर्सच्या नावे फिरताहेत कोरोनावरील घरगुती उपाय!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा