Press "Enter" to skip to content

‘नंबर 140 चा कॉल उचलू नका’ फेक मेसेजमध्ये ‘सोनी लिव्ह’च्या प्रोमोशनची भर!

‘आपल्याला 140 या नंबरचा फोन आल्यास घेऊ नये. आताच मेसेज आला असून त्या प्रमाणे मुंबईत सर्व लोकांना PA सिस्टीमवर अनाउन्स करून सांगितले जात आहे. बहुदा तुमचे अकाऊंट खाली होईल. काळजी घ्या, दुसऱ्याला पण सांगा!’

हे असे लिहून त्यावर काही नंबर्सचा स्क्रिनशॉट जोडून मेसेज व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियामध्ये मुंबई पोलिस स्वतः ‘140 सुरुवात असणारे कॉल उचलू नका नाहीतर तुमचा बँक बॅलन्स शून्य होईल’ अशी सूचना देतानाचे व्हिडीओज व्हायरल होत आहेत.

‘चेकपोस्ट मराठी’च्या अनेक वाचकांनी हे व्हायरल मेसेज पाठवून सत्यतेबद्दल विचारणा केली.

पडताळणी:

व्हायरल मेसेज मध्ये स्वतः पोलिस या सूचना देत असल्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. यावर मुंबई पोलीस किंवा सायबर क्राईम विभागाचे काही अधिकृत म्हणणे आहे का हे सर्च करण्याचा आम्ही प्रयत्न केला.

‘महाराष्ट्र सायबर’ या अधिकृत ट्विटर हँडलवर आम्हाला याविषयीचे एक ट्विटथ्रेड सापडले.

त्यामध्ये असे लिहिले आहे की:

‘पोलिस कॉन्स्टेबल +१४० या नंबर वरून येत असणारे कॉल उचलू नका असे आवाहन करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर आम्ही स्पष्टीकरण देऊ इच्छितो की +१४० वरून येणारे कॉल्स हे ‘टेलीमार्केटिंग’चे कॉल आहेत.’

त्या खालच्या ट्विटमध्ये ते पुढे म्हणतायेत ‘याच किंवा कुठल्याही क्षणी नागरिकांनी आपले गोपनीय वैयक्तिक डीटेल्स किंवा OTP अशा कॉल करणाऱ्यांना सांगू नयेत.’

TRAI म्हणजेच ‘टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया’च्या अधिकृत वेबसाईटवर आम्हाला एक पत्रक मिळाले ज्यामध्ये ‘टेली मार्केटर्स’साठीची नियमावली दिलेली आहे.

‘Code(s) of Practice (CoPs) provide evolving and adaptive framework’ या मुद्द्या अंतर्गत 140 ही सिरीज खास टेलीमार्केटर्ससाठीच दिली असल्याचे सांगितले आहे.

या सुविधेतून त्यांना एकावेळी अनेक कॉल्स आणि मेसेजेस करता येण्याची परवानगी आहे. ग्राहकांना सुद्धा हे लक्षात येईल की हा टेलीमार्केटिंगचा कॉल आहे त्यामुळे तो उचलावा की नाही ही त्याची ऐच्छिक बाब राहावी हा ‘ट्राय’चा उद्देश असल्याचे लक्षात येते.

ते पत्रक आपण येथे वाचू शकता.

या व्यतिरिक्त ट्विटरवरच आम्ही ‘140 call’ या कीवर्ड्सचा वापर करून सर्च केले तेव्हा दुसरी एक बाब समोर आली.140 ने सुरुवात होणाऱ्या काही नंबर्स वरून लोकांना कॉल गेले आणि त्यामध्ये कुणी व्यक्ती घाबरलेल्या आवाजात बोलत होता.

“ मै ऋषी बोल रहा हुं, यहां एक मर्डर हो गया है और उसे मैने अपने कॅमेरापर रेकॉर्ड कर लिया है. अब वो मुझे भी मारना चाहता है. ओह शीट…”

परंतु तो कॉल काहींनी रेकॉर्ड करून व्यवस्थित ऐकून पाहिला तेव्हा समोर आले की ‘सोनी लिव्ह’ नावाच्या OTT अॅपवर ‘अनदेखी’ नावाची वेबसिरीज येत आहे त्याचे हे प्रोमोशन आहे.

ट्विटर युजर ‘स्मृती किरण’ यांनी हा कॉल ऐकला तेव्हा घाबरून नेमके फोन कॉलवर काय झाले सांगत मुंबई पोलिसांना ट्विट केले. त्यानंतर एक तासाने जेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा त्या वेबसिरीजची जाहिरात करण्यासाठीचा फंडा आहे तेव्हा त्यांनी ‘सोनी’ला खडे बोल सुनावले. सोबतच मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रार सुद्धा केलीय.

यावर ‘सोनी लिव्ह’ने ही एक टेस्ट ऍटिव्हिटी होती आणि अपघाताने बाहेर गेल्याची सारवासारव करत माफी मागितली आहे.

‘महाराष्ट्र सायबर’ने कार्यवाही करत ‘सोनी लिव्ह’ला ते प्रोमोशनल कॉल थांबवण्याचे आदेश दिले असल्याचं ट्विट केलं आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल मेसेज मधील दावे फेक असल्याचे लक्षात आले. ट्रायच्या नियमावलीनुसार १४० ही सिरीज टेलीमार्केटर्सना दिलेली आहे.

महाराष्ट्र सायबरने सांगितल्याप्रमाणे या टेलीमार्केटर्सनाच नव्हे तर इतर कुणालाही आपले वैयक्तिक डीटेल्स आणि OTP न देता फसवणुकीपासून वाचू शकतो.

आधीच पोलिसांकडून स्वतः या अशा सूचना येत असल्याचे दिसत असताना ‘सोनी लिव्ह’ने मार्केटिंग फंडा म्हणून घबराट निर्माण करणाऱ्या कॉलची भरीस भर घातलीय.

या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांचे जे व्हिडीओज व्हायरल झाले आहेत त्यात ते खरेच मुंबई पोलिस आहेत की ते सुद्धा ‘सोनी लिव्ह’च्या जाहिरातबाजीचा भाग आहेत बाबत अजून तरी अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. ते मिळाल्यास येथेच अपडेट केले जाईल.

हेही वाचा: आधार क्रमांकाविषयी खबरदारी घ्यायला सांगणाऱ्या व्हायरल ऑडीओशी मुंबई पोलिसांचा संबंध नाही!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा