Press "Enter" to skip to content

‘विदेशी मिडिया भारताविषयी फेक न्यूज पसरवतोय’ सांगणाऱ्या व्हायरल व्हिडीओतील दावे चुकीचे!

आर्मी रिटायर्ड ऑफिसरकडून चीनी, विदेशी मिडियाच्या भारतातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दलच्या दुष्प्रचाराची, मुद्दाम पसरविण्यात येत असलेल्या ‘फेक न्यूज’ची पोलखोल केली जात असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय.

Advertisement

भारताला संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेची सदस्यता मिळू नये म्हणून ‘व्हॅक्सीन डिप्लोमसी’ कुचकामी ठरवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा त्या व्हिडीओचा दावा आहे.

व्हॉट्सऍप, ट्विटर, फेसबुक यांसारख्या माध्यमांत जोरदार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘सिकर टाईम्स’ या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. बातमी करेपर्यंत तब्बल २ लाख ७४ हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

बढ़ता प्रभाव ख़त्म करने के लिए चीनी साजिश

बढ़ता प्रभाव ख़त्म करने के लिए चीनी साजिश

Posted by Sikar Times on Monday, 24 May 2021

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओमध्ये एकापाठोपाठ विविध दावे केले आहेत. त्यातील प्रमुख दाव्यांची ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी केली. त्यात समोर आलेल्या बाबी पुढील प्रमाणे.

 • व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती रिटायर्ड आर्मी ऑफिसर नाही

व्हॉट्सऍपवर दावा व्हायरल करताना व्हिडीओतील व्यक्ती आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले जात आहे. याविषयी माहिती घेतली असता व्हिडीओतील व्यक्ती डॉ. यशवंत चौधरी (Dr. Yashvant Chaudhari) असल्याचे समजले. ‘सिकर टाईम्स’नावाच्या युट्युब चॅनलवरून त्यांचे विविध विषयांवरील व्हिडीओज पब्लिश होत असतात.

लिंक्डईन प्रोफाईलवर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते ‘फार्मसी’ प्रोफेशनशी संबंधित आहेत. त्यांनी जयपूर नॅशनल युनिवर्सिटीतून ‘फार्मासुटीकल सायन्स’मध्ये Phd केली आहे. यात कुठेही त्यांनी सैन्याचे अधिकारी असल्याचा उल्लेख केलेला नाही.

 • जुने फोटोज वापरून गंगा घाटावरील आताची परिस्थिती सांगणाऱ्या बातम्या ?

होय हे खरे आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये आताचे म्हणून जुनेच फोटो वापरले गेले होते. याविषयी विविध ठिकाणी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

गंगा नदीमध्ये मृतदेह सोडण्याची किंवा किनाऱ्यावरील वाळूत मृतदेह पुरण्याची परंपरा आताची नाहीच. त्यामुळे जुन्या काळातही या गोष्टी होतच होत्या परंतु हजारो मृतदेह नदीमध्ये किंवा किनाऱ्यावर पुरून ठेवले असल्याची दृश्ये ताजीच आहेत. याविषयी स्वतः भारतीय माध्यमांनीदेखील घटनास्थळी जाऊन वार्तांकन केले आहे.

 • गंगा नदीवरील मृतदेह कोरोना मृतांचेच असल्याचे चीनी वृत्तपत्राने खोटेच जाहीर केले?

व्हिडीओमध्ये डॉ. चौधरी यांनी SCMP नावाच्या चीनी वृत्तपत्राची बातमी दाखवत दावा केलाय की हे चीनी षडयंत्र आहे. कुठलाही अधिकृत पुरावा नसताना हे वृत्तपत्र गंगा नदीवरील मृतदेह कोरोना बाधितांचे असल्याचे सांगत आहे.

आम्ही ती मूळ बातमी शोधली तेव्हा लक्षात आलं की ही बातमी ‘रॉयटर्स’ या अंतराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या मूळ बातमीवर आधारित आहे. ‘रॉयटर्स’ जगातली दुसरी विश्वासार्ह वृत्तसंस्था मानली जाते आणि महत्वाचं म्हणजे ती बातमी कुणा विदेशी व्यक्तीने लिहिलेली नसून कृष्णा दास या भारतीय बातमीदाराने लिहिलेली आहे. त्यांनीच ‘कुमार सिंह’ नावाच्या व्यक्तीने जिल्हा प्रशासनास लिहिलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे.

SCMP news screenshot
source: SCMP
 • बातमीत वापरलेला फोटो जुना आहे?

व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. चौधरी यांनी SCMP वृत्तपत्राने वापरलेला फोटो त्यात दिसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही म्हणून जुना असल्याचे घोषित केले आहे. परंतु आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले तेव्हा सदर फोटो १५ मे २०२१ च्या आधी कुठेही अस्तित्वात नसल्याचे आढळले. मास्क नसणे ही बाब फोटो जुना असण्यासाठी सबळ पुरावा ठरू शकत नाही कारण भारतात आजही कित्येक लोक बिना मास्क आढळत आहेत.

 • ‘अरब न्यूज’ने भारताला मुद्दाम बदनाम करण्यासाठी ‘Indian Variant’ असे वापरले आहे?

व्हिडीओमध्ये अरब न्यूजने ‘Indian Variant’ असा उल्लेख केलेल्या बातम्या दाखवल्या आहेत. इतर कुठल्याही देशाच्या variant चा उल्लेख नसल्याचे त्यात सर्च करून दाखवले आहे.

सर्च करताना त्यांनी वूहान, चीन अशी नावे टाकून सर्च केले आहे. अशा नावाचा variant अजून सिद्ध झाला नाही. म्हणजेच कोरोना व्हायरस हा चीनच्या वूहान मधून निर्माण झाल्याचे सबळ पुरावे नसताना बातमीत तसा शब्द वापरणे बेकायदेशीर ठरेल. अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘चायनीज व्हायरस’ असा उल्लेख केला असता त्यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

‘अरब न्यूज’वर आम्ही केवळ ‘variant’ अशा शब्दाने सर्च करून पहिले असता ‘UK Variant’, ‘Britain Variant’, ‘Brazilian Variant’ असे शब्दप्रयोग विविध बातम्यांत पहायला मिळाले.

 • चायनीज सोशल मिडीयावर सरकारी ऑफिशियल अकाऊंटवरून भारताच्या परिस्थितीची उडवली खिल्ली

होय हे खरे आहे. चौधरी यांनी व्हिडीओ मध्ये BBCच्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केलाय. त्यात चायनीज मिडीयाने त्या पोस्टबद्दल नाराजी व्यक्त केलीय आणि खडे बोल सुनावलेत. सर्व बाजूनी रोष पाहून ती पोस्ट डिलीट करण्यात आली. त्या आधीच्या दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधून सहानुभूती व्यक्त करत मदतीला तयार असल्याचे आश्वासन दिले होते.

 • भारताला संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेची सदस्यता मिळू नये म्हणून ‘व्हॅक्सीन डिप्लोमसी’ कुचकामी ठरवण्याचे षडयंत्र?

संयुक्त राष्ट्रसंघाचे ५ देश कायम स्वरूपी सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत. यात चीन, फ्रांस, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देश आहेत. दर दोन वर्षांच्या मुदतीवर १० देशांची मतदानाद्वारे निवड केली जाते. सध्या या १० देशांत भारत असून २०२२ साली ती मुदत संपेल.

पुन्हा निवडून येण्यासाठी सदस्य राष्ट्रांकडून बहुमत गरजेचं आहे. तेच मिळावं म्हणून भारताने इतर देशांना लशी पुरवल्या. इतर देशांनी लशी घेऊ नये आणि ही सदस्यता देशाला मिळू नये म्हणून विदेशी माध्यमे भारतातील कोरोना परिस्थितीच्या खोट्या बातम्या लावत असल्याचे डॉ. चौधरी यांचे म्हणणे आहे.

वस्तुस्थिती पाहता ‘परराष्ट्र मंत्रालयाच्या’ वेबसाईटवरील माहितीनुसार भारताने आजवर ९५ देशांना लशी पुरवल्या आहेत. त्या ९५ देशांच्या यादीत पॅलेस्टाईन सारखा देश सुद्धा आहे जो अजूनही संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांच्या यादीत नाही. म्हणजेच लशींचा पुरवठा खरेच सदस्यत्वासाठी असल्याचा दावा तितका प्रबळ नाही. या आधी १९५० सालापासून भारत ८ वेळा म्हणजेच १६ वर्षे सदस्य राहिलेला आहे.

 • इतर देशांनी भारतात बनलेली लस न घेण्याचा आणि वाढत्या मृत्यूदराचा काहीएक संबंध नाही

भारताची परिस्थिती बिकट दिसली तर बाहेरचे देश आपली लस घेणार नाहीत असा काहीसा दावा त्यांनी केला आहे. जर भारतात संपूर्ण लसीकरण होऊनही संसर्गाचं, मृत्युचं प्रमाण जास्त असतं तर इतरांनी लस घेताना तिच्या कार्यक्षमतेवर नक्कीच प्रश्न उभे केले असते परंतु भारतात आताशी ३.१% जनतेस लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

 • जानेवारी महिन्यात संपत आलेला कोरोना संसर्ग अचानक वाढला हे सुद्धा षडयंत्र?

व्हिडीओत दाखवलेल्या ग्राफनुसार जानेवारी महिन्यात संसर्गाचे प्रमाण अगदी खाली गेले होते परंतु भारताची ‘व्हॅक्सीन डिप्लोमसी’ सकारात्मक बदल घडवून आणतेय असे दिसताच अचानक आकडे कसे वाढले असा सवाल चौधरी यांनी केलाय. तो करताना त्यांनी स्वतः पश्चिम बंगाल मध्ये कोरोनाचा नवा variant सापडल्याचा उल्लेख केलाय. याच काळात कुंभमेळा, निवडणुकांच्या सभा यांमध्ये सोशल डीस्टन्सिंगचा उडालेला फज्जा यावर त्यांनी बोलणे सोयीस्कर टाळले.

 • NCP म्हणजेच राष्ट्रवादी पक्षानेही यास दुजोरा दिलाय?

व्हायरल व्हिडीओमध्ये विरोधी पक्ष NCP सुद्धा हेच सांगत आहे की नदीत मृतदेह दिसले तर बाहेरचे देश आपली लस विकत घेणार नाहीत असे वाक्य चौधरी यांनी वापरले आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’च्या मूळ बातमीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते नवाब मलिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनावर उलट टीका करत आहेत. त्यात त्यांनी वापरलेले वाक्य बाहेरील देश लस (vaccine) विकत घेणार नाहीत या संबंधी नसून; लसीकरण नियोजन (vaccination model) अंगीकारणार नाहीत असा उपरोधिक टोला आहे.

NCP leader on river bodies free press journal ss
Source: Free Press Journal
 • कॉंग्रेस शासित राजस्थानमध्येच सर्वात जास्त लस जातेय वाया?

व्हिडीओमध्ये वापरलेल्या बातमीचे कात्रण जरी खरे असले तरी संपूर्ण देशाच्या परिप्रेक्ष्यात पाहिल्यास ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या ताज्या बातमीनुसार एप्रिल महिन्यात सर्वात जास्त म्हणजे ८% लस तमिळनाडू राज्यात वाया गेली. येथे भाजपच्या साथीत AIDMK पक्षाची सत्ता आहे. ताजी आकडेवारी पाहता छत्तीसगढमध्ये ७.५% लस वाया गेल्याचं प्रमाण आहे. येथे कॉंग्रेसची सत्ता आहे.

vaccine wastage graph by TOI
Source: The Times of India

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ‘सिकर टाईम्स’च्या डॉ. यशवंत चौधरी यांच्या व्हायरल व्हिडीओतील दावे अंशतः खरे, दिशाभूल करणारे आणि काही संपूर्णतः असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा: ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने मोदींचे कौतुक केल्याचे भासविण्यासाठी मंत्री शेअर करताहेत भलत्याच ‘गार्डियन’चा रिपोर्ट!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा