Press "Enter" to skip to content

योगी आदित्यनाथ शहीद सैनिकाच्या शवपेटीजवळ बसून हसत आहेत?

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) इतर काही नेत्यांसोबत शहीद सैनिकाच्या शवाजवळ बसून हसतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

भारत-चीन सीमेवरील तणाव वाढत गेल्याने आपल्याकडचे २० हून अधिक जवान शहीद झाले. या घटने नंतर अवघ्या काही दिवसात म्हणजे साधारण १ जुलैच्या आसपास शिव माहेश्वरी या फेसबुक युजरने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये समोर तिरंग्यात लपेटलेले शव असून पलीकडे योगी आदित्यनाथ आणि इतर काही नेतेमंडळी एकमेकांसोबत काहीतरी बोलून मोठमोठ्याने हसताना दिसत आहेत.

Advertisement

माहेश्वरी यांनी हा व्हिडीओ शेअर करत उपरोधिकपणे ‘शहीद के शव के पास बिलख बिलखकर रोते हुए भाजपा नेता’ असे कॅप्शन लिहिले आहे.

ही बातमी करतेवेळी या व्हिडीओला दीड हजार पेक्षा जास्त लाईक्स, ५४२ कमेंट्स, १२ हजार पेक्षा जास्त शेअर्स आणि तीन लाख एकोणनव्वद हजार व्ह्यूव्ज होते.

हा व्हिडीओ ‘शिवभक्त रोहन शेंडगे’ नामक फेसबुक युजरने ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ फेसबुक ग्रुपवर शेअर केल्याचं आढळलं . ‘शिव माहेश्वरी’ यांची पोस्ट ग्रुपवर शेअर करत त्यांनी ‘BJPची देशभक्ती नाटकी साले’ असं कॅप्शन दिलंय.

fb post about Yogi adityanath laughing near martyr's funeral
Source: Facebook

ट्विटरवर देखील अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत असेच दावे केले आहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने ‘Yogi Adityanath laughing at martyr’s funeral’ असे कीवर्ड्स वापरून गुगल सर्च केलं तेव्हा २०१९ मधल्या काही बातम्या समोर आल्या. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या शवासमोर बसून योगी आणि नेतेमंडळी हसत असल्याचे सांगत व्हिडीओज व्हायरल झाले होते. परंतु इंडिया टुडे सारख्या इतर काही माध्यमांनी फॅक्टचेक करत हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले होते.

आम्ही पुन्हा वेगळ्या पद्धतीने सर्च केल्या नंतर ‘डेक्कन हेराल्ड’ची २२ ऑक्टोबर २०१८ची बातमी सापडली. यामध्ये उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांच्या अंतिमदर्शनाच्यावेळी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बिहारचे त्यावेळचे राज्यपाल लालजी टंडन आणि इतर नेते गप्पा मारत हसत असल्याचे म्हंटले आहे. बातमीत कॉंग्रेस नेते नीरज भाटिया यांचे व्हायरल व्हिडीओ असलेले ट्विट सुद्धा वापरलेले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हिडीओ सोबत केलेला दावा फेक असल्याचे समोर आले असून हा व्हिडीओ आताचा नसून २०१८ सालचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात तिरंग्यात लपेटलेली शवपेटी शहीद सैनिकाची नसून कॉंग्रेस नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांची आहे.

हेही वाचा:
रा. स्व. संघाची टिंगल उडविण्यासाठी उपरोधिक पोस्टला खरी मानून फिरवताहेत विरोधक !

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा