सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो शेअर केला जातोय. फोटोसोबत दावा केला जातोय की हा फोटो अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॉन फोर्डचा (John Ford) असून त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे.
“अमेरिका के सबसे अमीर आदमी जॉन फोर्ड के पास 190 अमेरिकी चैनल हैं. आज इस ने ईसाई धर्म छोड़कर. इस्लाम धर्म अपना लिया.” अशा दाव्यांसह हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी वेगवेगळ्या किवर्डसह शोध घेतला. मात्र आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी बघायला मिळाली नाही. त्यानंतर व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता खलीज टाईम्सच्या वेबसाईटवर 23 मार्च 2018 रोजी प्रकाशित बातमी बघायला मिळाली.
खलीज टाईम्सच्या बातमीनुसार 2018 मध्ये एका अमेरिकन व्यक्तीने ओमानमध्ये इस्लामचा स्वीकार केला होता. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दावा करण्यात आला होता की अमेरिकन सैन्य अधिकाऱ्याने इस्लामचा स्वीकार केल्यानंतर तो भावनिक झाला होता. दरम्यान, बातमीमध्ये व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती नेमकी कोण आहे, याविषयीची माहिती मिळाली नाही.
बातमीमध्येच व्हायरल व्हिडिओ देखील बघायला मिळाला.
त्यानंतर आम्ही जॉन फोर्ड (John Ford) यांच्याविषयी शोध घेतला असता असे समजले की त्यांनी 2019 मध्ये NPACT चे महाव्यवस्थापक पद सोडले. NPACT ही मनोरंजनविषयक कार्यक्रमांची निर्मिती करणारी संस्था आहे. 100 हून अधिक कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत.
चेकपोस्ट मराठीला RealScreen नावाच्या वेबसाइटवर जॉन फोर्ड यांच्या पोर्टफोलिओ विषयीची माहिती मिळाली. यामध्ये त्यांनी काम केलेल्या विविध माध्यम संस्थांची यादी आहे. त्यानुसार जॉन फोर्ड यांनी 2007 ते 2009 या काळात डिस्कव्हरी चॅनलचे अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच त्यांनी डिस्कवरीच्या सैन्यविषयक आणि डिस्कव्हरी टाइम्स चॅनेलचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे.
ते 2003-07 दरम्यान नॅशनल जिओग्राफिक चॅनलशी देखील संबंधित राहिलेले आहेत आणि त्यापूर्वी 13 वर्षे त्यांनी डिस्कव्हरी कम्युनिकेशन्समध्ये काम केलेले आहे. त्यांनीच डिस्कव्हरी हेल्थ चॅनेलची सुरुवात देखील केली. दरम्यान व्हायरल दाव्याप्रमाणे 190 अमेरिकन चॅनेलचे मालक असल्याचा उल्लेख मात्र कुठेही बघायला मिळाला नाही.
दरम्यान व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती नेमकी कोण याविषयीची माहिती आम्हाला मिळाली नाही, मात्र ती व्यक्ती जॉन फोर्ड नाही एवढे मात्र नक्की. दोघांमध्ये कुठलेही साम्य नाही.
राहता राहिला प्रश्न जॉन फोर्ड अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा दाव्याचा, तर हा दावा देखील चुकीचा आहे. फोर्डच्या 2010-2021 दरम्यानच्या काळातील अमेरिकेतील 10 सर्वात श्रीमंतांच्या यादीत फोर्ड यांचा समावेश नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. ना जॉन फोर्ड यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केलाय, ना ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जॉन फोर्ड 190 चॅनेल्सचे मालक असल्याचे दावे देखील चुकीचे आहेत.
हेही वाचा- नासाच्या वैज्ञानिकाने कुटुंबासह स्वीकारला हिंदू धर्म? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॉ… […]