Press "Enter" to skip to content

कोरोनाद्वारे बायोअटॅक करण्यासाठी चीनला मदत केली म्हणून FBI ची प्रोफेसरला अटक?

चीनला कोरोना व्हायरस बनवून देण्याच्या आरोपाखाली अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (FBI) बोस्टन विद्यापीठाच्या फ्रोफेसरला अटक केल्याचे दावे सोशल मिडियात व्हायरल होत आहेत.

‘महत्वाची माहिती: शेवटी एफबीआयने बोस्टन विद्यापीठाच्या एका प्रोफेसरला अटक केली, जो वूहानमधील चीनी विद्यापीठ आणि संशोधन प्रयोगशाळेच्या संदर्भात होता आणि त्याला चीनने जबरदस्त पैसे दिले होते.

Advertisement

आता कोरोना व्हायरस हा बायो ऍटॅक नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि तो चीनने आयोजित केला आहे. एका चीनी तज्ज्ञाने रहस्य सांगितले आहे की गरम पाण्यामधून वाफेचे इनहेलेशन केल्यामुळे कोरोना विषाणूचे प्रमाण १०० टक्के नष्ट होते. जरी व्हायरस नाक, घसा किंवा फुप्पुसात शिरला तरी, कोरोना व्हायरस गरम पाण्याच्या वाफेवर उभे राहू शकत नाही.

कृपया ही माहिती सर्वांना द्या.’

FBI arrested boston professor for selling corona virus to china whatsapp screenshot
Source: Whatsapp

ही अशी माहिती असलेली एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असल्याची माहिती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर यांनी ‘9172011480’ या ऑफिशियल व्हॉट्सऍप नंबरवर दिली.

हे असेच दावे ट्विटरवरून सुद्धा केले जात आहेत. ६ जुलै २०२० रोजी निकिता केशवे यांनी एका बातमीचा व्हिडीओ ट्विट करत ‘कोरोना व्हायरस हा बायोऍटॅक असून चीन यामागे आहे हे लवकरच सिद्ध होईल’ असे म्हंटले आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी FBIच्या वेबसाईटवर व्हायरल दाव्या विषयी काही मिळते का याचा तपास केला. वेबसाईटवर आम्हाला FBIचे २८ जानेवारी २०२०चे एक प्रेस रिलीज सापडले.

‘Remarks Delivered by FBI Boston Division Special Agent in Charge Joseph R. Bonavolonta Announcing Charges Against Harvard University Professor and Two Chinese Nationals’

अशा त्या प्रेस रिलीजच्या टायटलमधूनच लक्षात येईल की प्रोफेसरला अटक झालीय परंतु बोस्टन विद्यापीठाच्या नव्हे तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या.

का झालीय अटक?

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधील प्रोफेसर डॉ. चार्ल्स लिबेर यांनी अमेरिकेतील लोकांच्या टॅक्सचा पैसा वापरून, हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सुविधा वापरून गुपितपणे चीनच्या वूहान विद्यापीठाच्या नावे काही संशोधन केले. २०११ पासून चीन त्यांना फंड्स पुरवत होता. ते वूहान युनिव्हर्सिटीच्यानावे रिसर्च आर्टिकल्स पब्लिश करत होते.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीला अंधारात ठेऊन वूहान युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड मध्ये नॅनोसायन्स रिसर्च लॅब बनवण्यासाठी पाच वर्षाचा करार केला होता. असे सर्व आरोप प्रोफेसर लिबेर यांच्यावर आहेत.

या संपूर्ण प्रेस रिलीजमध्ये कुठेही कोरोना व्हायरस, कोव्हीड१९चा कुठेही उल्लेख नाही.

प्रोफेसर डॉ. चार्ल्स लिबेर यांच्या व्यतिरिक्त आणखी दोघांवर कारवाई झाल्याचा या प्रेस रिलीज मध्ये उल्लेख आहे. ते दोघे ना कुणी प्राध्यापक आहेत ना त्यांच्याही आरोपांत कुठेही कोरोना व्हायरसच्या निर्मितीचा वगैरे उल्लेख आहे.

व्हायरल पोस्टमध्ये असाही दावा केलाय की ‘गरम पाण्यामधून वाफेचे इनहेलेशन केल्यामुळे कोरोना विषाणूचे प्रमाण १०० टक्के नष्ट होते.’ या दाव्यात किती तथ्य आहे हे आपण चेकपोस्ट मराठीच्या ‘या’ बातमीत वाचू शकता.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की व्हायरल दाव्यातील माहिती फेक आहे. FBI ने बोस्टनच्या नव्हे तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरला अटक केलीय. त्या अटकेसाठी जे आरोप करण्यात आले आहेत त्यांत कोरोना व्हायरसचा साधा उल्लेख देखील नाही. त्यांच्यावर असणारे आरोप वेगळेच आहेत.

हेही वाचा: ‘गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस १०० टक्के नष्ट होतो’ दाव्यात किती तथ्य?

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा