राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा बाबरी मशीद कधी उभी राहणार या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकडे वळवलाय. अशात सोशल मीडियात अयोध्या निकालात मिळालेल्या पाच एकर जागेत बाबरी हॉस्पिटल (Babri Hospital) उभारणार आणि डॉ. काफील खान त्याचे संचालक असणार असे दावे व्हायरल होतायेत.
काय आहेत व्हायरल मेसेज पाहूयात.
‘सुप्रीम कोर्ट ने जो पांच एकड़ जमीन दी थी,सुन्नी वकफ बोर्ड ने लिया फैसला उस पर बनेगा बाबरी हॉस्पिटल ( Babri Hospital) जो #AIIMS के बराबर मुफ्त सुविधा देगा..जाने माने डॉक्टर #KafilKhan को इस अस्पताल का प्रशासक बनाया जा सकता है!’
सोबत एक स्क्रिनशॉट जोडला जातोय.
सदर निर्णयाचे काहींनी कौतुक सुद्धा केलेय. सोबत हॉस्पिटलची ( Babri Hospital) ब्लू प्रिंट म्हणून एक फोटो शेअर केला जातोय.
काही लोकांनी याबद्दल टिंगल करत तोच ईमारत असलेला फोटो वापरलाय.
सदर व्हायरल दाव्याची पडताळणी करण्याची विनंती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक करण गायकवाड यांनी केली होती.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सदर व्हायरल मेसेजची पडताळणी करण्यासाठी काही कीवर्ड्सच्या आधाराने सर्च केले तेव्हा आमच्या हाती काही माहिती लागली ती पुढील प्रमाणे:
हॉस्पिटल आणि लायब्ररीचा निर्णय नवा नाही:
आमच्या पडताळणीत ‘द ट्रिब्युन’ची २४ फेब्रुवारी २०२०ची बातमी सापडली. त्यामध्येच वक्फ बोर्डाचे चेअरमन झुफर फारुकी यांनी सदर ५ एकराच्या जागेत मशीद, इंडो इस्लामिक रिसर्च सेंटर, पब्लिक लायब्ररी आणि चॅरिटेबल हॉस्पिटल होईल असे सांगितले होते.
त्याचवेळी त्यांनी बाबरी मशिदीच्या नावानेच सर्व असणार आहे का? या प्रश्नावर ‘नावाचा निर्णय ट्रस्ट घेईल, याचा अधिकार बोर्डाला नाही’ असे स्पष्ट केले होते.
‘बाबरी हॉस्पिटल आणि काफील खान संचालक’ मेसेज फेक:
सर्च मध्ये आमच्या हाती वक्फ बोर्डाचे प्रेस रिलीज लागले. काय लिहिलेय यात? पाहूयात सारांश-
उत्तर प्रदेश सुन्नी सेन्ट्रल वक्फ बोर्डाने गठीत केलेल्या ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ने मिळालेल्या जागेवर मशीद, कल्चरल रिसर्च सेंटर आणि लोकोपयोगी सुविधांनीयुक्त कम्युनिटी किचन, हॉस्पिटल आणि ग्रंथालय बनावेत असा प्रस्ताव ठेवला आहे.
‘युपी सुन्जीनी सेन्ट्रल वक्फ बोर्डाने बाबरी हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला असून काफील खान त्याचे संचालक असणार आहेत’ असा एक फेक मेसेज सर्वत्र व्हायरल होतोय. ही बाब चुकीची आहे, फेक आहे.
मिडीयाला आम्ही सूचित करू इच्छितो की इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे सचिव आणि अधिकृत प्रवक्ता अथार हुसेन यांच्या व्यतिरिक्त इतर कुणाचेही मत गृहीत धरू नये.
ती नियोजित हॉस्पिटलची अधिकृत ईमेज नाही:
बाबरी हॉस्पिटल ( Babri Hospital) असा बोर्ड लावून व्हायरल होत असलेल्या ईमारतीचा फोटो आम्ही रिव्हर्स सर्च करून पाहिला तेव्हा आम्हाला लिंक्डईन वरील ‘UVA Health System Hospital & Health Care’ ने कव्हर फोटो म्हणून अपलोड केलेला फोटो सापडला. जो या कथित ‘बाबरी हॉस्पिटल’शी तंतोतंत जुळणारा आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की वक्फ बोर्डाने गठीत केलेल्या ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ने अयोध्या खटल्याच्या निलाकात जी पाच एकर जमीन मिळालीय त्यावर इतर महत्वाच्या सुविधांसह हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव ठेवला हे खरंय. परंतु,
हॉस्पिटलचे नाव ‘बाबरी हॉस्पिटल’ असेल, त्याचे संचालक ‘डॉ. काफील खान’ असतील या व्हायरल दाव्यांना कसलाही आधार नाही. त्याचप्रमाणे व्हायरल दाव्यांसह ‘बाबरी हॉस्पिटल’ असे नाव लिहिलेल्या इमारतीचा फोटोसुद्धा फेक आहे.
हेही वाचा: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोना झाल्याचे सांगत ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने दिली फेक बातमी!
[…] […]