राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिला मोठा निर्णय घेत प्रस्तावित जालना- नांदेड समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) रद्द केल्याचे दावे सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. कमिशनसाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमिभा पाटील यांनी केलाय.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य असलेल्या शमिभा पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत ‘वावा.. कमिशनवर सरकार, महाराष्ट्र बेजार’ अशी शेरेबाजी केलीय. मूळ फेसबुक पोस्टमध्ये टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीचा स्क्रिनशॉट दिसतोय. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पहिला मोठा निर्णय. समृद्धी महामार्ग जोडणारा जालना नांदेड महामार्ग रद्द’ असा मजकूर त्यावर दिसतो आहे.
फेसबुकवर हे दावे व्हायरल होण्याचे प्रमाण जोरदार आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च करूनही अशी बातमी कोणत्याही वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीवर मिळाली नाही. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या (Maharashtra DGIPR) फेसबुक पेजवरही अशा प्रकारच्या निर्णयाची कुठलीही माहिती आम्हाला सापडली नाही.
शेवटी आम्ही ‘TV9 मराठी’ने अशी काही बातमी दिली होती का हे तपासण्याचा प्रयत्न केला परंतु तिथेही अशी काहीच बातमी आम्हाला दिसली नाही. स्क्रिनशॉट जर आपण निरखून पाहिलात तर त्यावर ‘फडणवीस-शिंदेंची संयुक्त पत्रकार परिषद live’ असे लिहिलेले दिसतेय. त्याचखाली ‘8- कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी युती शिंदे गटाला मान्य नव्हती’ असेही लिहल्याचे दिसतेय.
यानुसार शोध घेतला असता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यासाठी घेतलेली ही पत्रकार परिषद असल्याचे समजले. ३० जून रोजी सदर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ‘TV9 मराठी’ने केलेल्या लाइव्ह प्रक्षेपणाचा रेकॉर्डेड व्हिडिओ आम्हाला मिळाला.
या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर व्हायरल होणारा स्क्रिनशॉट आणि मूळ बातमीचा स्क्रिनशॉट वेगवेगळा असल्याचे सहज लक्षात येईल. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि शेजारच्या चौकटीत महामार्ग रद्द केल्याच्या घोषणेचा मजकूर एडीट करून टाकल्याचे सहज जाणवते.
शपथविधी होण्याआधीच निर्णय?
काही काळासाठी व्हायरल स्क्रिनशॉट खरा आहे असे जरी मान्य केले तरीही त्यात उल्लेख असलेली ‘फडणवीस-शिंदे संयुक्त पत्रकार परिषद’ काल म्हणजेच ३० जून रोजी झाली. १ जुलै रोजी दिवसभरात अशी संयुक्त पत्रकार परिषद झालीच नाही. ती पत्रकार परिषद शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या घोषणेविषयी होती. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वीच दुपारी ते महामार्ग रद्द करण्याविषयी कसे निर्णय घेतील?
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित जालना- नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केल्याचे दावे फेक आहेत. व्हायरल बातमीचा स्क्रिनशॉट एडीट केलेला आहे.
हेही वाचा: एकनाथ शिंदे नशेत असल्याचे दर्शवणारा व्हिडीओ अर्धवट! जाणून घ्या सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]