‘आपली व्हॉट्सअॅप स्टेटस 30 पेक्षा जास्त लोकांद्वारे पाहिली जात आहे का ?? तर आपण देखील दररोज 500 रुपयांपर्यंत (earn 500 rupees per day) कमाई करू शकता!’
असे काही मेसेज सोशल मिडियामध्ये व्हायरल होत आहेत. अनेकांच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर सुद्धा या अशा प्रकारचे मेसेज दिसत आहेत.
याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’च्या अनेक वाचकांनी पडताळणी करण्याची विनंती केली आहे.
पडताळणी:
सर्वात आधी आम्ही व्हायरल मेसेजमधील लिंकवर जाऊन ती वेबसाईट आणि त्याची कार्यपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न केला.
वेबसाईटवरील माहितीनुसार महाराष्ट्रातील अग्रगण्य ब्रॅण्डच्या जाहिराती व्हाट्सअप स्टेटसला ठेऊन तुम्ही प्रति जाहिरात १० ते ३० रुपये यांप्रमाणे रोज ५०० रुपयांपर्यंतची (earn 500 rupees per day) कमाई करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे.
यासाठी होम स्क्रीनवरील ‘रजिस्टर नाऊ’वर क्लिक करून आपला फोन नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागतो. त्यानंतर आपला जिल्हा नेमका कोणता ते निवडावे लागते. त्यानंतर साईटवर सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण ‘शेअर स्टेटस’वर क्लिक करतो तेव्हा जी व्हायरल झालेल्या मेसेज मधील माहिती आहे, तीच माहिती माहिती आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर लोकांना दिसू लागते.
यामध्ये सांगितल्यानुसार येत्या २४ तासात ते आपल्याला मेसेज किंवा मेलद्वारे संपर्क करतील मग आपल्या स्टेटसला किती व्ह्यूव्ज मिळाले हे त्यांना दाखवण्यासाठी उत्तर पाठवावे लागेल किंवा स्क्रीनशॉट शेअर करावा लागेल.
२४ तासात त्यांचा मेसेज येतो का?
ज्या ज्या लोकांनी हे असे स्टेटस ठेवले त्यापैकी जवळपास ६ ते ७ लोकांकडे आम्ही चौकशी केली परंतु एकालाही या कंपनीकडून काही मेसेज आला नव्हता. अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही साईटच्या ‘टर्म्स कंडीशन’ वाचून पाहिल्या. यामध्ये त्यांनी २४ तासाच्या आत जर आमच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही तर पुन्हा रजिस्टर करा असे आवाहन केले आहे. याच ठिकाणी इतरही काही बाबी दिल्या आहेत ज्यातून वेबसाईट विश्वासार्ह असल्याचे भासवले जातेय.
परंतु एखाद्या आदर्शवत वेबसाईटच्या टर्म्स आणि कंडीशनचे पेज अशा स्वरुपात नसते, मुळात यावर दिलेली माहिती FAQ म्हणजेच Frequently asked Questions किंवा वेबसाईट पॉलिसी किंवा Privacy Policy च्या पेजवर असते. यात काही गोष्टी कायदेशीर बाबींच्या अंगानेही नमूद केलेल्या असतात.
वेबसाईटची विश्वासार्हता:
कुठल्याही कंपनीच्या वेबसाईटवर ‘about us’ म्हणजेच स्वतःविषयी माहिती सांगणारे एक पेज असते. कंपनीला संपर्क करण्यासाठी ‘Contact info’ असलेले पेजअसते. यामध्ये फोन नंबर किंवा मेल आयडी अथवा हेड ऑफिसचा पत्ता तरी असतो. या साईटवर अशा प्रकारची कसलीच माहिती उपलब्ध नाही.
ही वेबसाईट जाहिरातीद्वारे पैसा मिळवून देते असे काही क्षण गृहीत धरले, ही साईट फ्रॉड नाही असे जरी गृहीत धरले तरीही उद्या जाऊन काही प्रश्न विचारायचे असल्यास, तक्रार करायची असल्यास कुठे करावी? कुणाशी संपर्क साधावा? आर्थिक बाबीविषयी काही गफला झाल्यास नेमक्या कोणत्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आपण केस करू शकतो याविषयी कुठेही काहीच माहिती नाही.
१४०० रुपयांना गंडा:
‘बुलडाणा लाइव्ह’ या वेब पोर्टलने काल ‘बुलडानेकरांनो सावधान! ५०० तर मिळणारच नाहीत गंडा कितीला बसेल सांगताही येणार नाही!’ या हेडलाईनखाली बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी करणारे पत्रकार कृष्णा सपकाळ आणि पोर्टलचे संपादक मनोज सांगळे यांच्याशी आम्ही संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी काही लोकांचे १४०० रुपये गेले असे सांगितले.
वेबसाईटवरील व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट रीडायरेक्ट होऊन दुसरी रजिस्ट्रेशन विंडो ओपन होते ज्यातून आपल्याला सुरुवातीची गुंतवणूक म्हणून १४०० रुपये भरण्यास सांगितले जाते. नाव न छापण्याच्या अटीवर काही नागरिकांनी ही आपबिती ‘बुलडाणा लाइव’शी बोलताना सांगितली आहे.
वस्तुस्थिती:
स्टेटस ठेवणाऱ्या नागरिकांशी आमचं जे बोलणं झालं त्यानुसार ही वेबसाईट फेक आहे. यात सरळ सरळ फसवणूक केली जातेय. आमच्या पडताळणीमध्येही या साईटवरील बनाव उघडकीस आला असून ती अजिबात विश्वासार्ह नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यानुसार नागरिकांचे मोबाईल नंबर आणि इमेल आयडी गोळा करून लोकल राजकीय पक्ष किंवा विविध जाहिरात कंपन्यांना ‘डेटा’ विकण्याचा हा प्रकार असावा असा प्राथमिक संशय या वेबसाईटच्या कार्यपद्धतीमध्ये जाणवत आहे.
अशा कुठल्याही व्हायरल मेसेजमधील दाव्यांना भुलून झटपट, कमी कष्टात पैसे कमावण्याचा शॉर्टकट कधी अचानक लाँगकट होईल सांगता येत नाही. त्यामुळे सावध आणि उघड्या डोळ्यांनी निर्णय घ्या.
हेही वाचा: सरकार ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रोज १० जीबी इंटरनेट मोफत देणार?
[…] […]
Nice
[…] […]