Press "Enter" to skip to content

मोबाईल हरवल्यास पोलिसांकडे जायची गरज नाही, एका मेलने मिळणार फोन?

‘तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर?’ काळजी करायची गरज नाही केवळ एका मेल आयडीवर आपली काही महत्वाची माहिती पाठवायची. आपला फोन आपल्या ताब्यात असेल (find your lost mobile phone through a mail) असे महाराष्ट्र पोलिसांकडून सांगण्यात आल्याचा दावा करणारी पोस्ट सर्वत्र फिरत आहे.

Advertisement

काय आहे पोस्टचा मजकूर?

🔰 महाराट्र पोलिस 🔰

तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?…असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?

त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी ही माहिती देत आहोत. ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा. तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.

  • ☑१. तुमच्या मोबाइलवर डायल करा *#06#
  • ☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.
  • ☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.
  • ☑४. मोबाइल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर cop@vsnl.net वर मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.
  • ☑५. मोबाइल हरवला तर तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.
  • ☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.
  • ☑७. IMEI नंबर वरून २४ तासात आपला मोबाइल सिम चेंज केले असेल तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य ठिकाण समजेल.
  • ☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन, शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.

मित्रांनो Share करा सर्वांना कळू दे…
– महाराट्र पोलिस

या मजकुराचे मेसेज व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दयानंद यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

सोशल मिडिया सर्च मध्ये आमच्या लक्षात आले की जवळपास २०१३ पासून हे असे मेसेज, पोस्ट विविध माध्यमांतून फिरत आहेत. ‘IPS विश्वास नांगरे पाटील FC’ म्हणजे नांगरे पाटलांच्या चाहत्यांनी बनवलेल्या या फेसबुक पेजवरून २०१७ साली ही पोस्ट केली होती त्यास ७८३ जणांनी शेअर केले होते.

🔰 महाराष्ट्र पोलिस 🔰तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?… असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय…

Posted by IPS विश्वास नांगरे पाटील Fc on Tuesday, 21 March 2017

फेसबुकवरच २०१३ साली पोस्ट केलेला तोच मजकूर:

पडताळणी:

व्हायरल मेसेज व्यवस्थित वाचल्यानंतर काही प्रश्न अनुत्तरीत राहिले, जसे की समजा या मेल आयडीच्या मदतीने आपला मोबाईल फोन नेमका कुठे आहे याचे लोकेशन समजले (find your lost mobile phone through a mail) तरीही आपण थेट जाऊन त्या चोराकडे तो मागू शकतो का? तिथे काही घातपाताची शक्यता नाही का? जर असं असेल तर मग महाराष्ट्र पोलीस आपल्याला असे सल्ले का देईल ज्यात धोका आहे? थेट तक्रार नोंदवण्याचे आवाहन का नाही करणार?

तरीही आम्ही या मेल आयडीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आणि विविध कीवर्ड्सच्या आधारे सर्च केल्या नंतर ‘copvsnl.net.in’ या वेबसाईट वर जाऊन पोहचलो. या साईटच्या होमपेजवरच सदर पोस्ट फेक असून तो ‘cop@vsnl.net’ हा मेल आयडी बंद आहे. त्यामुळे त्यावर मेल करून आपला वेळ आणि उर्जा वाया घालवू नये असा सल्ला सुद्धा त्यात दिलाय.

copvsnl website screenshot check post marathi
Source: copvsnl.net.in

याच साईटवर असेही लिहिले आहे की हा मेल आयडी चेन्नईच्या पोलीस कमिशनरचा होता. त्यांना यावर तक्रारी पोहचल्यावर त्यांचे निवारण सुद्धा होत होते परंतु ‘द हिंदू’च्या एका बातमीद्वारे हा मेल आयडी सर्वांपर्यंत पोहचला. त्यानंतर देशातल्या प्रत्येक भागातून त्यावर तक्रारी जाऊ लागल्या. त्यानंतर कुणीतरी खोडसाळपणा करत हा मेल आयडी मोबाईल शोधून देण्यात मदत करेल असे पसरवले. या सर्व प्रकारानंतर तो मेल आयडी बंद करण्यात आला.

‘द हिंदू’च्या बातमीमुळे मेल आयडी व्हायरल?

वेबसाईटवरील माहिती नक्की खरी आहे का हे पडताळण्यासाठी आम्ही पुन्हा सर्च केले असता ‘द हिंदू’ची ती बातमी आम्हाला सापडली ज्यात या मेल आयडीचा उल्लेख केला होता. चेन्नईमध्ये महिला सुरक्षेच्या संबंधी तक्रारी नोंदवण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर आणि सदर मेल आयडी बातमीच्या शेवटी देण्यात आला होता परंतु ही बातमी ६ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध झाली होती. जर मराठी मेसेज २०१३ सालचा मिळत आहे म्हणजे मूळ इंग्रजी व्हायरल पोस्ट त्याच आसपासच्या किंवा त्या आधीच्या काळातील असणार. याचाच अर्थ तो मेल आयडी व्हायरल होण्यात ‘द हिंदू’च्या बातमीचा संबंध नाही तरीही या बातमीने तो चेन्नई पोलिसांचा अधिकृत मेल आयडी होता हे सिद्ध झाले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल मेसेजमधील दावे फेक असल्याचे समजले. तो मेल आयडी कोणे एके काळी चेन्नई पोलिसांचा होता हे खरे आहे. म्हणजेच यात महाराष्ट्र पोलिसांचा काहीएक संबंध नाही. मेसेज व्हायरल होण्यासाठी खोडसाळपणे कुणीतरी महाराष्ट्र पोलिसांच्या नावाचा वापर करत आहे.

आपण जर अँड्रॉईड फोन वापरत असाल तर ‘फाईंड माय डिव्हाईस‘ आणि आयफोन वापरत असाल तर ‘फाईंड माय आयफोन‘ हे ऍप्स/फीचर्स आताच चालू करून ठेवा. यांच्या वापराने आपला हरवलेला फोन मिळणे सोपे जाते. जर चोरीला गेला असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदवा.

हेही वाचा: स्टेटस ठेऊन रोजचे ५०० रुपये कमावण्याच्या लोभाने ‘त्या’ लिंकवर क्लिक करण्याआधी हे वाचा!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा