Press "Enter" to skip to content

मिठाचे पाणी पिल्याने बाहेर पडलेल्या कफावाटे कोरोना जातो? गायकवाड बाबांचा दावा किती खरा?

कोमट पाण्यात मीठ टाकून पिल्याने (salt water flush) , जुलाबावाटे जो कफ बाहेर पडतो, त्यातून कोरोना निघून जात असल्याचा दावा अहमदनगरच्या गायकवाड फार्मसीचे संचालक संभाजी गायकवाड यांनी केलाय. त्यांच्या दाव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Advertisement

‘फक्त मिठाच्या पाण्याने कोरोना जातो, ही गोष्ट शोधून काढली अहमदनगर च्या गायकवाड बाबांनी.
घाबरण्यासारखे काही नाही, एकदम साधा उपाय आहे, व्हीडीओ नक्की बघा आणि दुसऱ्यांना ही पाठवा अशी त्यानी जीव तोडून विनंती केलेली आहे .
हे जर खरचं गुणकारी असेल तर नक्कीच आपली हॉस्पिटल च्या लुटमारी पासुन सुटका होईल, भीतीने जास्त लोकांचा जीव जात आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेव नका आणि कुणाला ही चुकीच काही सांगु नका.
धन्यवाद 🙏🙏’

या मेसेजसह गायकवाड यांच्या दाव्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ‘सी न्यूज मराठी’ आणि ‘एन टीव्ही मराठी’ या दोन न्यूज युट्युब चॅनल्सने गायकवाड यांची बातमी केलीय. हे दोन्ही व्हिडीओज शेअर होत आहेत.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रुपेश पोळ आणि रामहरी शिंदे यांनी सदर व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी विविध पद्धतीने माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात जे गवसलं ते पुढीलप्रमाणे-

१. साल्ट वॉटर फ्लश

कोमट पाण्यात मीठ टाकून पिणे (salt water flush) ही पद्धती काही नवीन नाही. त्यास ‘साल्ट वॉटर फ्लश‘ टेक्निक असे म्हणतात. कोमट पाण्यात (आयोडीन नसलेले) मीठ टाकून रिकाम्या पोटी एका दमात पिल्यास साधारण अर्ध्या ते एक तासात जुलाब होतात. यातून जठरातील, मोठ्या आतड्यातील घाण व विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. म्हणूनच विषबाधा झाल्यास मिठाच्या पाणी पाजले जाते. (संभाजी गायकवाड यांनी नेमके कोणते मीठ? याचा स्पष्ट उल्लेख केला नाही.)

२. वैज्ञानिकांचे मत काय?

‘साल्ट वॉटर फ्लश’द्वारे जठरातील, आतड्यातील घाण साफ होऊ शकते. जर्नल फॉर अल्टरनेटिव्ह अँड कॉम्पलिमेंटरी मेडिसिन मध्ये नमूद केल्या प्रमाणे ज्यांना बद्धकोष्ठता म्हणजे शौचास साफ होण्यास त्रास आहे त्यांना विशिष्ठ योगासने आणि साल्ट वॉटर फ्लश दोन्हींच्या प्रमाणबद्ध संयोगाने फायदा होऊ शकतो. परंतु या पद्धतीने मोठ्या आतड्यातील घाण पूर्णत्वाने साफ होऊ शकते यावर शास्त्रज्ञांची मतमतांतरे आहेत. या दाव्यास अजूनतरी वैज्ञानिक आधार नाही.

३. ‘साल्ट वॉटर फ्लशचे अपाय

मिठाचे पाणी पोटात गेल्याने ‘सोडियम ओव्हरलोड’ होऊ शकतो. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मळमळ व उलट्या होऊ शकतात. हृदयाचे ठोके अनियमित पडणे, अशक्तपणा, स्नायूंचे दुखरेपण इत्यादी गोष्टी जाणवू शकतात. मिठाचे प्रमाण जास्त झाले आणि पोटात जर अल्सर असेल तर प्रचंड वेदना होऊ शकतात.

४. आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

“विकृत कफ व पित्त दोष शरीराबाहेर काढण्यासाठी पंचकर्मातील वमन आणि विरेचन अशा दोन मुख्य चिकित्सा पद्धती आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास या पद्धतीमध्ये अगोदर ३ ते ४ दिवस औषधी तूप पिण्यास दिले जाते. बरोबरीनेच तूप पचल्यानंतर औषधी तेलाने शरीराचे स्नेहन(मसाज) व स्वेदन (वाफ देणे) ही क्रिया केली जाते. या स्नेहन व स्वेदनामुळे शरीरात मुरलेले विकृत दोश, विषारी पदार्थ हे कोष्ठात (जठरात) आणले जातात. त्यानंतर विशिष्ठ औषधी वनस्पतींच्या काढ्याने किंवा त्यासोबत मिठाच्या पाण्याचा वापर करून वमन म्हणजे उलट्या अथवा विरेचन म्हणजेच जुलाब करवले जातात.

परंतु जर कुणी केवळ मिठाचे पाणी पिऊन उलट्या अथवा जुलाब केल्या तर केवळ जठरात असलेल्या गोष्टी बाहेर पडतील; फुफ्फुसात झालेल्या कोरोना इन्फेक्शनचे काय? किंबहुना कुठल्याही पद्धतीने शरीरातील सर्वच्या सर्व कफ बाहेर जरी पडला तरीही कोरोना इन्फेक्शन समूळ नष्ट होणे अशक्य. त्यास अँटीबायोटिक्स किंवा तत्सम गुणधर्म असणारे आयुर्वेदिक उपचार गरजेचे आहेतच.”

– डॉ. श्रेया देवरे (आयुर्वेदाचार्य)

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की संभाजीराव गायकवाड यांनी सांगितलेला मिठाच्या पाण्याचा उपाय कोरोनावर लागू होतो यास कुठलाही शास्त्रीय आधार नाही. मुळात त्यांनी सहा दिवसांत हजार रुग्ण बरे केले सांगताना त्यांच्या लक्षणांची तीव्रता किती होती, त्यांना इतर आधुनिक पद्धतीची औषधी चालू होती का या विषयी काहीच खुलासा केला नाहीये.

अशा दाव्याची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी केल्याशिवाय सहज विश्वास ठेऊन स्वतःवर प्रयोग करणे अपायकारक ठरू शकते. मुळात आयुर्वेद असो किंवा ऍलोपथी दोन्हीमध्ये रुग्णाची लक्षणे आणि त्याची एकंदर प्रकृती पाहिल्याशिवाय सरसकट उपाय देता येत नाही, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्लाच आवश्यक आहे.

हे ही वाचा: ‘सरकारी कीट’वर टाकलेल्या नळाच्या पाण्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याच्या दाव्यात कितपत तथ्य?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा