Press "Enter" to skip to content

ब्लड कॅन्सरवर कायमस्वरूपी इलाज करणारे औषध पुण्यात मोफत उपलब्ध? वाचा सत्य!

रक्ताच्या कर्करोगावर औषध सापडले असून ‘IMITINEF MERCILET’ नावाचे ते औषध पुण्यातील एका रुग्णालयात मोफत उपलब्ध असल्याचे,मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

व्हायरल मेसेज:

खूप खूप  तातडीची आणि महत्वाची बातमी.
पुण्यामध्ये उपलब्ध
कृपया हा संदेश वाचल्यानंतर इतरांना पाठवा.मी सुद्धा तेच केले आहे.
माझ्या प्रिय मित्रांनो,
रक्ताच्या कर्करोग वर औषध सापडले आहे.
पुन्हा एकदा विनंती हा संदेश इतरांना पाठविल्या शिवाय पुसून टाकू नका.
मला जास्तीत जास्त शक्य होईल तेवढ्याना मी पाठवीत आहे.

कोट्यवधी भारतीयांना तो पोहचू द्या.
,IMITINEF MERCILET हे औषध आहे जे रक्ताचा कर्करोग बरा करते.
ते औषध पुणे येथील यशोधा हेमाटोलॉजि कँसर इन्स्टिट्यूट पुणे येथे विना मूल्य उपलब्ध आहे.
जागृती निर्माण करा
याचा कुणालातरी उपयोग होऊ शकतो.

पत्ता-यशोदा हेमाटोलॉजि क्लिनिक 109 मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स हिराबाग चौक टिळक रोड पुणे 411002.
Phone
020-24484214
09590908080
09545027772.
Advertisement
Source: Facebook

फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटरच्या माध्यमांतून हे मेसेज अनेक दिवसांपासून व्हायरल होताना दिसत आहेत. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक असलम शेख यांनी पडताळणीची विनंती केली.

बॉलिवूड फिल्म्स, कलाकारांवर भाष्य केल्याने सतत चर्चेत असणाऱ्या केआरकेने २०१५ साली अशा प्रकारचा दावा असणारे ट्विट केले होते.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी त्या मेसेजमध्ये असणाऱ्या फोन नंबर्सवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकही क्रमांक चालू नसल्याचे लक्षात आले.

त्यानंतर विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ची बातमी आम्हाला सापडली. यामध्ये त्यांनी व्हायरल मेसेजच्या अनुषंगाने पुण्यातील काही तज्ज्ञांशी संपर्क साधून विचारणा केली होती

“हे व्हायरल मेसेज फेक आहेत. अशा प्रकारचे मेसेज दर वर्षी व्हायरल होत असतात. एवढेच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या शहरांत हे मेसेज स्थानिक रुग्णालयांच्या नावांसह व्हायरल होतात. साधारणपणे २०१० पासून हे मेसेज शेअर होताना दिसतायेत.”

– डॉ. समीर मेलीन्केरी (रक्तविज्ञान शास्त्र)

२०१५ साली टाईम्स ऑफ इंडियाने कर्नाटकच्या कॅन्सर केअर युनिटच्या डॉ. विशाल राव यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी सांगितले होते की सर्व प्रकारच्या कॅन्सरवर इलाज म्हणून वापरण्यात यावे असे एकही औषध जगात उपलब्ध नाही. जर हे २०१५ सालचे निरीक्षण आहे, तर २०१० साली औषध उपलब्ध असण्याचे मेसेज व्हायरल होणे यातच खोटेपणा निदर्शनास येतो.

‘इमिटिनेफ मर्सिलेट‘ असे औषध आहे का?

होय, ‘इमिटिनेफ मर्सिलेट‘ नावाचे औषध जगात उपलब्ध आहे. ते रक्ताच्या कॅन्सरसाठी वापरले जाते. हे औषध अमेरिकेमध्ये 2001 पासून वापरण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्येसुद्धा ‘इमिटिनेफ मर्सिलेट’चा समावेश आहे. हे औषध ब्लड कॅन्सर बरे करते हा दावा चुकीचा आहे. हे औषध केवळ कॅन्सर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कॅन्सरच्या औषधोपचरातील तो एक घटक आहे. परंतु, सगळ्या प्रकारचे ब्लड कॅन्सर बरे करणारे औषध अद्याप तयार झालेले नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की ब्लड कॅन्सरवर खात्रीशीर इलाज करणारे औषध पुण्यात अगदी मोफत मिळत असल्याचे दावे फेक आहेत. असे कुठले औषध रक्ताच्या कर्करोगावर रामबाण इलाज असल्याचे दावेही चुकीचे आहेत. हे औषध उपचाराचा भाग म्हणून वापरले जात असल्याची बाब खरी आहे.

हेही वाचा:जागतिक आरोग्य संघटनेने पिशवीतल्या दुधामुळे ८७% भारतीय कॅन्सरग्रस्त होणार असल्याचा इशारा दिलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा