कोरोना व्हायरसची ‘pH व्हॅल्यू’ ५.५ ते ८.५ पर्यंत असून यापेक्षा जास्त क्षारयुक्त पदार्थांचे सेवन करून कोरोना (pH Value and corona) बरा करता येत असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
काय आहे व्हायरल दावा?
व्हॉट्सऍपवर एक स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. त्यात कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करता येईल याबद्दल माहिती दिलीय.
‘लक्षात घ्या की कोरोना व्हायरसचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते म्हणूनच, व्हायरसच्या उच्चाटनासाठी आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे व्हायरसच्या आंबटपणाच्या पातळीपेक्षा जास्त क्षारीय पदार्थांचे सेवन करणे.
जसेः केळी, हिरवा लिंबू – 9.9 पीएच, पिवळा लिंबू – 8.2 पीएच, एवोकॅडो – 15.6 पीएच, लसूण – 13.2 पीएच, आंबा – 8.7 पीएच, टेंजरिन – 8.5 पीएच, अननस – 12.7 पीएच, वॉटरक्रिस – 22.7 पीएच, संत्री – 9.2 पीएच’
हे टेक्स्ट असणारी इमेज व्हायरल होत असल्याचं ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ‘अनिकेत दुर्गे‘ यांनी निदर्शनास आणून दिलं. हे टेक्स्ट नेमके कुणामार्फत आले असावे यासाठी आम्ही सर्च केले असता तंतोतंत अशीच वाक्ये असणारी एक मोठी फेसबुक पोस्ट आम्हाला सापडली.
पडताळणी:
कोरोना व्हायरस विषयी मुबलक संशोधन आणि माहिती नसल्यामुळे या व्हायरस संबंधी सोशल मीडियावर अनेक चूकीचे दावे, अफवा व्हायरल झाल्या आहेत. मूळ फेसबुक पोस्टमधील इतर दाव्यांचे ‘चेकपोस्ट मराठी’ने वेळोवेळी पुराव्यानिशी खंडन केले आहेच. ते वाचण्यासाठी आपण ‘येथे‘ क्लिक करून वाचू शकता.
या पडताळणीमध्ये आपण केवळ ‘पीएच व्हॅल्यू’ आणि कोरोना विषाणूचा काही संबंध (pH Value and corona) आहे का ते पाहूया. त्यापूर्वी ph पातळी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया.
काय असते ‘पीएच व्हॅल्यू’?
शाळेत विज्ञानाच्या तासाला साबणाचे पाणी, लिंबाचा रस यात लिटमस पेपर टाकून लाल होतो की निळा असा प्रयोग आपण केलेला असावा. द्रवातील ph value मोजण्यासाठी हा प्रयोग करण्यात येतो.
एखादा पदार्थ/ द्रव्यातील आम्ल किंवा अल्काचे प्रमाण मोजणारे एकक म्हणजे pH (Potential of Hydrogen) होय. pH श्रेणी ही ० ते १४ पर्यंत असते. यात ७ हे तटस्थ असून पाण्याचा पीएच ७ असतो.
७ पेक्षा कमी पीएच आम्ल (acidic) दर्शवतो तर ७ पेक्षा जास्त पीएच अल्क (alkaline) दर्शवतो. याविषयी अधिक माहिती ‘USGS Science for changing world‘ या साईटवर मिळेल.
कोरोना व्हायरसची ‘पीएच व्हॅल्यू’
कोरोना व्हायरसच्या ‘पीएच व्हॅल्यू’ विषयी ‘आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘असोसिएट प्रेस‘ सोबत बोलताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील बर्कले स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील संसर्गजन्य रोग आणि लसीकरणाच्या प्राध्यापिका सारा स्टनले यांनी सांगितले की,
‘विषाणूंना स्वतःचा असा ph नसतो. तसेच आहार, रक्त, पेशी किंवा उतींचे ph बदलणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी आणि संतुलित आहार रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि संक्रमणापासून आपला बचाव करण्यास मदत करतो. मात्र क्षारयुक्त पदार्थांचे सेवन फायदेशीर असल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत’ असे त्यांनी सांगितले.
क्षारयुक्त पदार्थ खाऊन शरीराची ‘पीएच व्हॅल्यू’ बदलते?
medRxiv या साईटवर पब्लिश रिसर्च पेपरमध्ये बालरोग संसर्गजन्यरोग विशेषज्ञ फ्रॅंक एस्पर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस पृष्ठभागावरील वातावरणामध्ये किती काळ टिकू शकतो यावर चीनमधे अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास पीएच पातळीवर आधारित होता. यात विषाणू आम्लिय वातावरणात टिकत नसल्याचे स्पष्ट झाले. हे खरे आहे परंतु;
क्षारयुक्त पदार्थ खाऊन आपण शरिरातील पीएच पातळी बदलू शकत नाही. अल्क धर्मीय म्हणजेच ph पातळी जास्त असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले तरी रक्तातील पीएच बदलत नाही. केवळ आरोग्यावर काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे ‘हेल्थ‘ या आरोग्य आणि विज्ञानविषयक बातम्या देणाऱ्या पोर्टलवर नमूद केले आहे.
मानवी रक्ताची ‘पीएच व्हॅल्यू’ बदलली तर?
‘हेल्थलाईन‘ने मध्ये दिलेल्या माहितीनुसार साधारणतः मानवी रक्तातील ‘पीएच व्हॅल्यू’ ७.३५ ते ७.४५ दरम्यान असते. म्हणजेच मानवी शरीर हे नैसर्गिकरित्या किंचित अल्क धर्मीय (alkaline) असते. परंतु काही कारणास्तव जर ती बदलली तर असे समजावे की आपले शरीर कुठल्याशा आरोग्यविषयक समस्येने ग्रासले आहे.
रक्ताची ‘पीएच व्हॅल्यू’जर कमी जास्त होणारे विविध आजार म्हणजे अस्थमा, डायबेटीस, हृद्य-किडनी विकार किंवा अगदी एखादी विषबाधा सुद्धा.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘ने केलेल्या पडताळणी नुसार कोरोना व्हायरसची स्वतःची ‘पीएच व्हॅल्यू’ नसते.
तो जास्त ‘पीएच व्हॅल्यू’ मध्ये टिकू शकत नाही हे खरे आहे. मात्र आपल्या शरीराची ‘पीएच व्हॅल्यू’ अशा खाद्यपदार्थांच्या सेवनाने बदलू शकत नाही हे देखील तितकेच खरे. त्यामुळे क्षारयुक्त पदार्थांचे सेवन करून कोरोना बरा करता येत असल्याचा दावा खोटा ठरतो.
अशा अशास्त्रीय, निराधार दाव्यांवर विश्वास ठेऊन भलत्याच शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमच्याकडे देखील असे दावे आल्यास त्याची ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधून शहानिशा नक्की करा आणि मगच त्यावर विश्वास ठेवा.
हेही वाचा: लिंबाच्या रसाचे थेंब नाकात टाकल्याने कोरोना जातो सांगणाऱ्या व्हायरल पोस्ट फेक!
Be First to Comment