भारत-चीन ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम हाती घेतलीये.
सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर या मोहिमेने अजून जोर पकडला. चीनी वस्तूंवर बहिष्कारासाठी भारतीय आणि चीनी वस्तूंमधील फरक ओळखण्याची ट्रिक देखील सोशल मिडियावरूनच सांगण्यात आली.
बारकोडची सुरुवात जर ६९० ते ६९९ यापैकी कुठल्याही संख्येने झाली तर ती वस्तू चायनीज आहे, असं समजायचं कारण तो चीनचा कोड आहे, असा दावा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात केला जातोय.
काही ठिकाणी ६९० ते ६९९ ऐवजी ६९० ते ६९५ या बारकोडने सुरुवात होणाऱ्या वस्तू चीनी असल्याचं सांगितलं जातंय.
काही जण फक्त ६९ ने सुरु होणाऱ्या वस्तू चायनीज असल्याचं सांगताहेत.
पण हे दावे ना फक्त आताचे आहेत, ना ते केवळ भारतात केले जाताहेत. जेव्हा कधी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरायला लागते, त्यावेळी देशात आणि विदेशात सोशल मिडीयावर असे दावे केले जातात.
पडताळणी:
सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी आम्ही संशोधन सुरु केलं असता आम्हाला अशी माहिती मिळाली की जगभरातील सर्व उत्पादनांना बारकोडचे क्रमांक हे ‘GS1’ या स्वयंसेवी संस्थेकडून दिले जातात.
‘GS1’ वेबसाईटवर उपलब्ध बारकोडचे प्रिफिक्स अर्थात पहिले २ किंवा ३ आकडे हे संबंधित उत्पादन कुठल्या देशात तयार झालं, याबाबतीत माहिती देत नाहीत तर संबंधित उत्पादनांची कंपनी कुठल्या देशात आहे, हे मात्र त्यावरून समजतं.
ही गोष्ट मात्र खरी आहे की चीनला ६९० ते ६९९ हा प्रिफिक्स देण्यात आला आहे म्हणजेच चीनी कंपनीला देण्यात येणारा बारकोड हा ६९० ते ६९९ पासून सुरु होणारा असतो.
बारकोडवरून एखाद्या वस्तूची कंपनी कुठल्या देशातील आहे, हे स्पष्ट होत असलं, तरी ‘संबंधित वस्तू’ कुठे तयार झाली, हे मात्र स्पष्ट होत नाही. ‘GS1’ ने स्पष्ट केलेलं आहे की संस्थेचे सदस्य जगभरात कुठेही उत्पादन करू शकतात.
ही गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघुत. समजा एखाद्या वस्तूचं उत्पादन पूर्णतः भारतात होत असेल, परंतु संबंधित वस्तूची मूळ कंपनी जर चीनी असेल, तर त्या वस्तूचा बारकोड भारतात उत्पादन होऊन सुद्धा, मूळ कंपनी चीनी असल्याने ६९० ते ६९९ दरम्यान असेल.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालं आहे की एखाद्या वस्तूच्या बारकोडवरून त्या वस्तूचं उत्पादन नेमकं कुठे झालं हे स्पष्ट सांगता येत नाही. बारकोडच्या प्रिफिक्सचा वस्तूच्या उत्पादनाशी काहीही संबंध नाही. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले दावे संपूर्णतः चुकीचे नसले तरी दिशाभूल करणारे नक्कीच आहेत.
बारकोडचा प्रिफिक्स हा कंपनी कुठल्या देशाची आहे, यावरून देण्यात येतो. चीनला ६९० ते ६९९ हे प्रिफिक्स देण्यात आलेले आहेत, हे खरं आहे; परंतु म्हणून ६९० ते ६९९ प्रिफिक्स असणारं उत्पादन चीनी आहे, असं म्हणणं योग्य नाही. जगभरात कुठेही अगदी भारतात देखील उत्पादित झालेल्या वस्तूच्या बारकोडची सुरुवात ६९० ते ६९९ दरम्यानच्या अंकांनी झालेली असू शकते.
हेही वाचा: TikTok ला ‘स्वदेशी’ पर्याय म्हणून तुफान चाललेलं Mitron ऍप मूळचं ‘पाकिस्तानी’!
[…] […]
[…] […]