सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये ल्युपो नावाच्या ब्रँडच्या क्रीम बारमधून गोळ्या बाहेर काढल्या जात आहेत. व्हिडिओसोबत दावा केला जातोय की बाजारात आलेल्या या नवीन केकमध्ये ल्युपो कंपनीची गोळी असून या गोळीमुळे लहान मुलांना अर्धांगवायु होतो. हा केक प्रामुख्याने हिंदूंची लोकवस्ती असलेल्या भागात विकला जात असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही ल्युपो ब्रँडच्या केकचा (Luppo cake) शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला भारतात या नावाने कुठलाही केक किंवा क्रीम बार विकला जात असल्याचे बघायला मिळाले नाही. भारतात या ब्रँडचा केक विकला जात नाही. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2019 मध्ये देखील केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील अशाच प्रकारचे दावे केले गेले होते.
आंतरराष्ट्रीय फॅक्टचेक वेबसाइट स्नोप्सने नोव्हेंबर 2019 मध्ये या व्हिडिओची पडताळणी केली होती. स्नोप्सच्या रिपोर्टनुसार, क्रीम बार बनवणाऱ्या कंपनीनेच त्यामध्ये गोळ्या मिसळवल्याचा काहीही पुरावा उपलब्ध नाही. शिवाय क्रीम बारच्या निर्मात्या कंपनीकडून स्नोप्सला उत्पादन प्रक्रिया, सुरक्षा प्रमाणपत्रे देखील दाखवण्यात आली. यावरून व्हायरल व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
ल्युपो क्रीम बारची उत्पादक कंपनी असणाऱ्या सोलनच्या प्रवक्त्याने स्नोप्सशी बोलताना स्पष्ट केले होते की कंपनीचा ल्युपो क्रीम बार फक्त इराकमध्ये विकला जातो. व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे पूर्णतः चुकीचे असून निराधार आहेत. केवळ कंपनीची प्रतिमा मालिन करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे दावे केले जात आहेत. अशा प्रकारचे दावे पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील कंपनीकडून देण्यात आला होता.
तुर्कीच्या ठेइट या फॅक्ट चेकिंग वेबसाईटने देखील या व्हिडिओची पडताळणी केलेली आहे. या रिपोर्टनुसार व्हायरल फुटेज इराणमधील कुर्दिस्तानातील आहे. कारण क्लिपच्या शेवटी ऐकायला मिळत असलेली भाषा सोरानी ही कुर्दिश भाषा आहे.
व्हायरल व्हिडिओ केल्या जात असलेल्या दाव्यांच्या समर्थनार्थ कुठलाही पुरावा देण्यात आलेला नाही. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने क्रीम बारमध्ये गोळ्या ठेवल्या असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. शिवाय व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गोळीमुळे लकवा मारला जात असण्याचा देखील कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. शिवाय हा क्रीम बार इराक व्यतिरिक्त इतर कुठेही विकला जात नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या आणि निराधार दाव्यांसह व्हायरल होतोय. शिवाय व्हिडीओ भारतातील नसून विदेशातील आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ब्रँडची उत्पादने भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. ही उत्पादने फक्त इराकमध्ये विकली जातात. व्हिडिओसोबत केल्या जाणाऱ्या दाव्यांना कुठलाही आधार नाही.
हेही वाचा- थर्माकॉल पासून साखर बनवली जातेय? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment