Press "Enter" to skip to content

भाजप नेत्यांनी पोस्ट केला ‘नोएडा’ विमानतळाचा म्हणून ‘बीजिंग’ विमानतळाचा फोटो, चीनने फटकारले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 25 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची (Noida International Airport) पायाभरणी केली. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असणार असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आले आहे.

अनेक भाजप नेत्यांनी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची माहिती देणारा 2 मिनिटांची व्हिडीओ क्लिप पोस्ट केलीये. व्हिडिओमध्ये कथितरित्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फोटोचा देखील समावेश आहे. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांमध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

Advertisement

अर्काइव्ह

अनुराग ठाकूर यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष पंकज सिंग यांच्यासह अनेकांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक मंत्र्यांकडून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेला विमानतळाचा फोटो हा बीजिंगमधल्या डॅक्सिंग विमानतळाचा असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या सरकारी माध्यमाशी संबंधित शेन शिवेई यांनी भाजप नेत्यांच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केलाय. हा स्क्रिनशॉट शेअर करताना ते म्हणतात,

“भारत सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पायाभूत सुविधा संबंधीच्या कामाचा पुरावा म्हणून चीनच्या बीजिंग डॅक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाचे फोटोज वापरावे लागल्याचे समजल्याने धक्का बसला”

शेन शिवेई यांच्या दाव्याप्रमाणे खरंच भाजप नेत्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधील फोटो बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आहे का हे बघण्यासाठी हा फोटो  रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला व्हॉइसच्या वेबसाईटवर 2015 मध्ये प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो मिळाला.

Source: Vice

बातमीनुसार फोटो बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिझाईनचाच आहे. आर्किटेक्ट झाहा हदीद (Zaha Hadid) यांच्या टीमने हे डिझाईन बनवले होते. बीजिंगमध्ये नवीन विमानतळ बांधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे ते विजेते होते.

बीजिंग डॅक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (Beijing Daxing International Airport) हे पृष्ठभागाच्या क्षेत्रानुसार जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. विमानतळाचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये हे विमानतळ कार्यान्वित करण्यात आले.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 24 नोव्हेंबर रोजी विमानतळाचे ग्राफिकल डिझाइन शेअर करण्यात आले होते. हे डिझाईन सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या डिझाईनपेक्षा वेगळे आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की केंद्रीय मंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे म्हणून चीनच्या बीजिंग विमानतळाचे फोटोज पोस्ट केले आहेत.

हेही वाचा- भाजप नेत्यांकडून तेलंगणामधील धरणाचा फोटो उत्तर प्रदेशातील म्हणून शेअर!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा