Press "Enter" to skip to content

‘जग भारताच्या बाजूने’ भासविण्यासाठी भाजप नेते घेताहेत फेक ट्वीटर अकाऊंट्सचा आधार!

भारत-चीन सीमेवर सध्या प्रचंड तणाव आहे. १९७५ नंतर प्रथमच सीमेवर भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. भारत-चीन युद्धजन्य परिस्थितीत एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचं सध्या तरी दिसतंय.

Advertisement

भारत-चीन युद्ध भडकलं तर जगभरातले कुठले कुठले देश भारताच्या बाजूने उभे राहतील, भारताला पाठींबा देतील याचे दावे करणारे अनेक ट्वीट सध्या फिरताहेत. सगळ्यात जास्त फिरतंय ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या अकाऊंटवरून करण्यात आलेलं ट्वीट. या ट्वीटमध्ये डोनाल्ड ट्रंप भारताच्या बाजूने उभे असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Trump's tweet 'Stand With India'
source: twitter

जवळपास साडे सोळा हजार युजर्सनी हे ट्वीट रिट्वीट केलंय. रिट्वीट करणाऱ्यांमध्ये भाजपच्या विदेश विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले आणि आयएएस नवीन कुमार चंद्र यांचा देखील समावेश होता.  

Naveen Kumar Chandra retweeted Donald k Trump's tweet
Source: Twitter

डोनाल्ड ट्रंप यांच्यानंतर त्यांची कन्या इवांका ट्रंप यांच्या अकाऊंटवरून देखील त्या भारतासोबत असल्याचं सांगणारं ट्वीट करण्यात आलंय. भाजप महिला मोर्चा सोशल मिडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रीती गांधी यांनी ते ट्वीट रिट्वीट केलंय.

Priti Gandhi retweeted Ivanka Trump's tweet
Source: Twitter

इजरायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील ट्विटरवरूनच घनिष्ठ मित्र नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने चीनला धुळीत मिळविण्याचं आश्वासन दिलंय. विशेष म्हणजे ते देखील शुद्ध हिंदीत.

Benjamin Netanyahu tweet in Hindi
Source: Twitter

उत्तर प्रदेशचे वित्त आणि संसदीय कार्य मंत्री सुरेश कुमार खन्ना, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभात झा आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनी हे आश्वासन हातोहात स्वीकारलं देखील.

Source: Twitter

पडताळणी:

एवढ्या मोठ्या नेत्यांनी चीनविरोधात भारताच्या समर्थनात उभं राहायचा निर्णय घेतला आणि मिडीयाला कानोकान खबर कशी नाही लागली म्हणून मग आम्ही पडताळणी सुरु केली.

एक एक करून आम्ही डोनाल्ड ट्रंप, इवांका ट्रंप आणि बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या अकाऊंटला भेट दिली. परंतु या अकाऊंटवर आम्हाला भारताच्या समर्थनातील कुठलंही ट्वीट बघायला मिळालं नाही.

त्यानंतर आम्ही एक एक करून व्हायरल होत असलेल्या ट्वीटच्या हँडलवर जाऊन शोध घेतला. डोनाल्ड ट्रंप यांच्या नावाने जे अकाऊंट चालवलंय जातंय ते @RealDonldTump_ या हँडलवरून चालवलं जातंय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं ट्वीटर हँडल @realDonaldTrump असं आहे. शिवाय @RealDonldTump_ या हँडलवर ते डोनाल्ड ट्रंप यांचं पॅरोडी अकाऊंट असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. हे अकाऊंट मार्च २०२० मध्येच सुरु करण्यात आलंय.

Trump's handle is not real its parody account
Source: Twitter

त्यानंतर आम्ही इवांका ट्रंप यांच्या नावे चालवलं जात असलेलं अकाऊंट शोधण्याचा प्रयत्न केला पण @IvankaaTrump या हँडलवर आम्हाला कुठलंही अकाऊंट मिळालं नाही. म्हणजेच हे अकाऊंट डिलीट करण्यात आलंय. ट्रंप यांच्या कन्येचं अधिकृत ट्विटर हँडल @IvankaTrump असं आहे.

बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या नावाने चालवलं जात असलेलं अकाऊंट @Netyanyahu या हँडलवरून चालवलं जातंय, तर इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू अधिकृत ट्विटर हँडल @Netanyahu असं आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये स्पष्ट झालं आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, त्यांच्या कन्या इवांका ट्रंप आणि ईजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यापैकी कुणीही चीन विरोधात भारताला पाठींबा दिलेला नाही.

ट्रंप बाप-लेक आणि नेत्यान्याहू यांच्या नावे चालविण्यात येत असलेल्या फेक ट्विटर अकाऊंटवरून भारताच्या समर्थनाचे ट्वीट करण्यात येत आहेत आणि मोठमोठे भाजप नेते याच फेक अकाऊंटच्या आधारे चीनविरोधात जग भारताच्या बाजूने उभं असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करताहेत.

हेही वाचा: ‘चीन स्वतःच ‘बॉयकॉट चायना’ लिहिलेल्या टोप्या बनवतोय’ सांगणारी व्हायरल पोस्ट फेक

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा