Press "Enter" to skip to content

श्रीनगरमधील लाल चौकात फडकला तिरंगा म्हणत भाजप नेते शेअर करताहेत एडिटेड फोटो!

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर भाजपच्या नेत्यांकडून सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आलाय. हा फोटो जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकात फडकावलेल्या तिरंग्याचा (tricolour at lal chowk) असल्याचं सांगण्यात येतंय.

यानिमित्ताने कलम ३७० मधील दुरुस्तीनंतर घडलेला हा बदल असल्याचा प्रचार करण्यात येतोय. 

कपिल मिश्रा यांनी १४ ऑगस्ट रोजी हा फोटो ट्विट केलाय. कपिल मिश्रा यांचं ट्विट साधारणतः ९१०० वेळा रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह पोस्ट

भाजपचे लडाख येथील खासदार ज्यामांग नामग्याल यांनी देखील हा फोटो ट्विट करताना ५ ऑगस्ट २०१९ (कलम ३७० मध्ये दुरुस्ती करण्यात आलेला दिवस) नंतर काय बदललं? असा सवाल उपस्थित करून त्याचं उत्तर दिलंय. भारतविरोधी आणि जिहादी लोकांचा अड्डा असलेला लाल चौक आता राष्ट्रवादाचे प्रतीक बनला असल्याचा दावा नामग्याल यांनी केलाय. 

अर्काइव्ह पोस्ट

नामग्याल यांचं ट्विट देखील २००० हुन अधिक युजर्सनी रिट्विट केलंय.

भाजपच्या चंदिगढ येथील खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांनी ट्विट केलेल्या फोटोला देखील ८४० रिट्वीट्स मिळालेत.

अर्काइव्ह पोस्ट

केवळ भाजप नेतेच नाही, तर ‘न्यूज नेशन’ या न्यूज चॅनेलने देखील याच फोटोच्या आधारे बातमी दिली आहे.

News nation news screen shot
Source: News Nation

पडताळणी :

फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही हा फोटो यांडेक्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला.

आम्हाला पत्रकार मुबस्सीर मुश्ताक यांच्या ‘संडे जंटलमन’ या ब्लॉगवर साधारणतः १० वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पॅराडाईज लॉस्ट’ या ब्लॉग मध्ये हा फोटो वापरण्यात आल्याचे लक्षात आले.

२०१० सालच्या मूळ फोटोत लाल चौक तर दिसतोय, परंतु त्यात तिरंगा नाही.

lal chowk old photo
Source: sunday gentlmen

त्यानंतर आम्हाला मुबस्सीर मुश्ताक यांचंच एक ट्विट देखील मिळालं.

मुश्ताक यांनी कपिल मिश्रा यांचं ट्विट रिट्विट करताना फोटोशी छेडछाड केल्याबद्दल मिश्रा यांची कानउघडणी केलीये. शिवाय हा फोटो आपण २२ जुलै २०१० रोजी काढला असल्याचं सांगितलंय.

मूळ फोटो आपण तिरंग्याशिवाय काढला असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय.

मुबस्सीर मुश्ताक यांच्या ब्लॉगवरचा फोटो आणि भाजप नेत्यांकडून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोची तुलना केली असता, दोन्ही फोटो वेगवेगळे नसून एकच आहेत हे अगदी सहज लक्षात येतं. फक्त मुश्ताक यांच्या फोटोमध्ये तिरंगा नाही आणि भाजप नेत्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये तिरंगा (tricolour at lal chowk) दिसून येतोय.

lal chowk flag comparison

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर भाजप नेत्यांकडून श्रीनगरच्या लाल चौकात फडकाविण्यात आलेल्या तिरंग्याचा म्हणून पोस्ट करण्यात आलेला फोटो एडिटेड आहे.

मूळ फोटो २२ जुलै २०१० रोजी पत्रकार मुबस्सीर मुश्ताक यांनी काढला असून, त्यांच्या २०१० सालीच प्रकाशित ब्लॉगवरील पोस्टमध्ये तो वापरण्यात आला आहे.

भाजप नेत्यांकडून मूळ फोटोमध्ये छेडछाड करून यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी लाल चौकात तिरंगा (tricolour at lal chowk) फडकाविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो हे कलम ३७० मधील दुरुस्तीनंतर बदललेल्या काश्मीर खोऱ्याचे प्रतीक असल्याचे भासविण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय.

हे ही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हिंदुराष्ट्रासाठी योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करणारं व्हायरल पत्र फेक !

More from राजकारणMore posts in राजकारण »

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा