दिल्ली भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवर एक बातमी शेअर केलीये. या बातमीनुसार गल्वान खोऱ्यात १०० पेक्षा अधिक चीनी सैनिक मारले गेल्याची बाब चीनी सैन्य अधिकाऱ्याने स्वीकारली आहे.
कपिल मिश्रांचं हे ट्वीट आतापर्यंत जवळपास १२ हजार १०० वेळा रीट्वीट केलं गेलंय.
‘न्यूज लाईन आयएफई’ या ट्विटर हँडलवरून देखील हाच दावा करण्यात आलाय.
“ज्या दिवशी चीनमधील कम्युनिस्ट सरकार देशाने गल्वान खोऱ्यात भारताविरुद्धच्या चकमकीत किती सैनिक गमावले याचा आकडा जाहीर करेल, त्या दिवशी संपूर्ण देश शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बंड करून उठेल. हा आकडा १०० पेक्षा अधिक आहे.” असा दावा यांग जिआन्ली या चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याने केला असल्याचं ट्वीटमध्ये सांगण्यात आलंय.
मराठीतील प्रमुख वृत्तपत्र ‘दै. लोकमत’ने देखील ट्विटरवरील ट्रेंडच्या आणि ‘साई-इंग-वेन’ या अकाऊंटवरील ट्वीटच्या आधारे प्रश्नार्थक चिन्हासह ही बातमी दिली आहे.
पडताळणी
‘चेकपोस्ट मराठी’ने सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांची पडताळणी केली. सर्वप्रथम आम्ही कपिल मिश्रांनी ज्या वेबसाईटवरील बातमी शेअर केलीये त्या वेबसाईटला भेट दिली.
‘क्रेटली डॉट इन’ वेबसाईटवर प्रकाशित बातमीनुसार १५ जून रोजी भारतीय सैन्य आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीत १०० पेक्षा अधिक चीनी सैनिक मारले गेले असल्याचा दावा चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचा मुलगा आणि माजी सैन्य अधिकारी यांग जिआन्ली यांनी ‘वाशिंग्टन पोस्ट’ मध्ये लिहिलेल्या लेखात केला आहे, असं या बातमीत म्हंटलंय.
‘क्रेटली’ वेबसाईटवर ही बातमी नेमकी कुणी दिली याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध नाही. शिवाय ‘वाशिंग्टन पोस्ट’ मधील ज्या लेखाच्या आधारे ही बातमी देण्यात आली आहे, त्या लेखाची लिंक देखील उपलब्ध नाही.
‘क्रेटली’ विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही वेबसाईटच्या ट्विटर हँडलला भेट दिली. तिथे आम्हाला एक ट्वीट मिळालं. या ट्वीटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ‘क्रेटली’वर लॉगीन करून कुणीही त्या वेबसाईटवर काहीही प्रकाशित करू शकतं. याचाच अर्थ असा की आपल्यापैकी कुणीही त्या वेबसाईटवर कुठलीही बातमी प्रकाशित करू शकतो.
शिवाय वेबसाईट नेमकं कोण चालवत आहे याविषयीची देखील कुठलीच माहिती उपलब्ध नाही. सहाजिकच या वेबसाईटची आणि त्यावर प्रकाशित बातमीची जबाबदारी घेणारं कुणीच नसल्याने वेबसाईटची कसलीही विश्वासार्हता नाही, हे स्पष्ट झालं. शिवाय नावावरून विदेशी भासत असली तरी ही भारतीय वेबसाईट असल्याचं देखील त्यावर प्रकाशित हिंदी बातम्यांवरून स्पष्ट होतं.
त्यानंतर आम्ही ‘न्यूज लाईन आयएफई’ या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही यांग जिआन्ली यांचा शोध घेतला. यांग जिआन्ली हे यांग फेन्ग्शुंग या चीनी कम्युनिस्ट नेत्याचे चिरंजीव असल्याची माहिती मिळाली, मात्र मात्र त्याचवेळी जिआन्ली हे व्यवसायाने डॉक्टर आणि मानवाधिकार कार्यकर्ते असल्याचं देखील आम्हाला समजलं. व्हायरल दाव्यांमध्ये जिआन्ली माजी सैनिक असल्याचं सांगण्यात आलंय.
जिआन्ली हे चीन सरकारचे विरोधक असून ते चीनमध्ये लोकशाही स्थापनेसाठी लढा देताहेत. या लढाईत त्यांनी चीनमध्ये तुरुंगवास देखील भोगला आहे. त्यांनी ‘वाशिंग्टन टाईम्स’ मध्ये एक लेख लिहिला होता. या संपूर्ण लेखात त्यांनी कुठेच चीनचे १०० सैनिक मारले गेल्याविषयी लिहिलेलं नाही.
‘दै.लोकमत’ने ज्या ‘साई-इंग-वेन’ यांच्या ट्वीटच्या आधारे बातमी दिली होती, त्या ट्वीटर अकाऊंटला देखील आम्ही भेट दिली. हे अकाऊंट मार्च २०२० मध्येच सुरु करण्यात आलं असून अकाऊंटच्या साधारणतः २६०० फॉलोअर्सपैकी ९५ टक्के फॉलोअर्स भारतीय आहेत.
सहाजिकच ते तैवानच्या राष्ट्रपती ‘साई-इंग-वेन’ यांच्या नावाने चालवलं जात असलेलं फेक अकाऊंट असून कुण्या भारतीय व्यक्तीकडून ते चालविण्यात येतंय, हे यावरून स्पष्ट होतं. तैवानच्या राष्ट्रपती ‘साई-इंग-वेन’ यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट @iingwen या हँडलवर उपलब्ध आहे.
असेच दावे मागील काही दिवसांत करताना नेटकऱ्यांन खालील फोटोचा आधार घेतला होता. परंतु आम्ही जेव्हा रिव्हर्स इमेज सर्चचा आधार घेतला तेव्हा आम्हाला ‘न्यूज वायर’ची बातमी सापडली आणि हा फोटो आताचा नसून मागीलवर्षीचा आहे. यात दिसणाऱ्या पेट्यांमध्ये सैनिकांचे शव नसून 1950-53 मध्ये कोरियाच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे जपून ठेवलेले साहित्य आहे.
वस्तुस्थिती
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की भाजप नेते कपिल मिश्रा यांनी फेक बातमीच्या आधारे गल्वान खोऱ्यात १०० पेक्षा अधिक चीनी सैनिक मारले गेल्याचा दावा केलाय.
कपिल मिश्रांनी शेअर केलेल्या बातमीत ज्यांचा उल्लेख माजी चीनी सैनिक असा करण्यात आलाय ते यांग जिआन्ली हे व्यवसायाने डॉक्टर असून मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून ते चीन सरकारचे विरोधक समजले जातात.
हे ही वाचा- चीनचे ५ सैनिक मारल्याच्या बातम्या मिडीयाने दिल्या; पण चीनी पत्रकाराच्या भरोश्यावर
Be First to Comment