पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद जिल्हातील आलमपुर गावात कालीमातेच्या मूर्तीला आग ((burnt kali idol) लावली असल्याचा फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ‘जिहादीं’चे कृत्य असल्याचा दावा तेथील वरिष्ठ भाजप नेत्याने केलाय.
पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष आणि बराकपोर मतदारसंघातून खासदार असलेल्या अर्जुन सिंह यांनी ट्विट करून काही फोटोज शेअर केले आहेत. त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतायेत पहा:
‘दीदींच्या (ममता बॅनर्जी) राजकारणाचे जिहादी स्वरूप आता हिंदू धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याच्या मागे आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद भागात एका धार्मिक गटाने मंदिरावर हल्ला करुन ते उद्ध्वस्त केले आणि माँ कालीची मूर्ती जाळली हे पहा.’
या ट्विटला ८७५ लोकांनी रीट्विट केले आहे. अर्जुन सिंह यांनी फेसबुकवर सुद्धा अशाच अर्थाची विस्तृत पोस्ट लिहिली आहे. ट्विटर युजर राजू दास नामक बांगलादेशी हिंदू व्यक्तीनेसुद्धा हेच फोटोज वापरून एक ट्विट केलेय. ते ट्विट ५१४ लोकांनी रीट्विट केले आहे.
‘मुरशिदाबाद येथील नौदा पी.एस. च्या आलमपूर गावच्या काली मंदिरात काल रात्री उशिरा दहशतवाद्यांनी कालीच्या मूर्तीला आग लावली. त्याच मंदिरातून सर्वात आधी, सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले.
आलमपूर हे मुस्लीमबहुल क्षेत्र आहे. वेगवेगळ्या वेळी हिंदूंना त्यांचा धर्म पाळण्यात अडथळ्यांचा सामना करावा लागतो.’ असा मजकूर त्या ट्विटमध्ये आहे.
पडताळणी:
पश्चिम बंगाल मध्ये येत्या काळात विधानसभा निवडणुका आहेत त्यामुळे या अशा घटना, वक्तव्ये समोर येण्यात आश्चर्य नाही. परंतु वस्तुस्थिती काय आहे याचा पडताळा करणे आवश्यक असल्याने आम्ही ही घटना व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला.
भाजप नेते अर्जुन सिंह यांचे ट्विट वाचले तेव्हा तिथे त्याच ट्विटवर मुर्शिदाबाद पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून आलेला रिप्लाय सुद्धा आम्हाला दिसला. त्यात त्यांनी (burnt kali idol) मंदिर समितीने जारी केलेल्या पत्रकाचा फोटो शेअर केला होता आणि काही मजकूरही लिहिला होता.
काय आहे मजकूर?
‘मंदिर समितीने सांगितल्यानुसार ही आग अपघात होती. मंदिर अधिकारी आवश्यक ती कारवाई करत आहेत. स्थानिक पोलिस आणि प्रशासनासोबत ते समन्वय साधत आहेत. वैयक्तिकरित्या पडताळणी केल्याशिवाय अशा गोष्टी पसरवू नका. अधिक माहितीसाठी आपण मंदिर समितीशी संपर्क साधू शकता.’
पत्रकातील मजकूर:
मंदिर समितीच्या पत्रकाचे भाषांतर करून आम्ही त्यातील म्हणणे समजून घेतले. त्यात असे लिहिले आहे की,
‘३१ ऑगस्ट रोजी रात्री काली देवीच्या मूर्तीला आग लागली. या भागात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. आम्हाला विश्वास नाही की ही घटना धार्मिक द्वेषाचा परिणाम होऊ शकते. मंदिर तोडले गेले नाही ना ही कोणती चोरी झालीय. परंतु काही लोक या घटनेला जातीय रंग देत आहेत. आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की शांततेत व्यत्यय आणू नये. प्रशासन आम्हाला मदत करत आहे.’
पश्चिम बंगाल पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अर्जुन सिंघ यांनी केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. त्यावर ‘MISLEADING‘ म्हणजे ‘दिशाभूल‘ करणारे वक्तव्य असा शिक्का मारलाय. त्यावर ‘कायदेशीर कारवाई केली जात आहे. कृपया दिशाभूल करणार्या, भडकवणार्या आणि लबाडीच्या पोस्ट्सला बळी पडू नका’ अशी सूचनाही करण्यात आलीय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्हातील आलमपुर गावात मूर्तीला आग (burnt kali idol) लागली हे सत्य आहे. हा अपघात असण्याची शक्यता आहे, त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु मंदिराची तोडफोड झालीय, सोन्या-चांदीची चोरी झालीय वगैरे दावे अगदीच निराधार आहेत.
गावात हिंदू मुस्लिम सलोखा आहे. दोन्ही समाज शांततापूर्ण मार्गाने राहतात. मात्र भाजप नेते अर्जुन सिंह आणि इतर मुस्लीम द्वेष्टे लोक या घटनेला धार्मिक वळण देऊन समाजात तेढ निर्माण करू पाहतायेत. सोबतच या घटनेआडून सत्तेवर असणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला जात आहे.
हेही वाचा: कॉंग्रेस नेत्यांनी स्वतःचेच सरकार असलेल्या राज्यातला व्हिडीओ खपवला केजरीवालांच्या नावे!
[…] […]
[…] […]