Press "Enter" to skip to content

भाजप नेत्याने कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेला दिले ‘हिंदू-मुस्लिम’ वादाचे स्वरूप, माध्यमांनी चालवल्या बातम्या!

भाजप नेते मंजिन्दर सिंग सिरसा (Manjinder Singh Sirsa) यांनी ट्विटरवर आपल्या अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय. व्हिडिओमध्ये काही लोक एका महिलेच्या केसाला पकडून तिला बळजबरी ओढून गाडीत बसविण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.

सिरसा यांनी हा व्हिडीओ ट्विट करताना दावा केलाय की घटना पाकिस्तानातील सिंध प्रांतातील उमरकोट येथील सत्र न्यायालयाच्या परिसरातील असून हिंदू महिलेचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले.

अर्काइव्ह

‘टाईम्स नाऊ’ चॅनेलवर यासंदर्भातील बातमी चालविण्यात आली. बातमीमध्ये पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू महिलांवर कशा प्रकारे अत्याचार केले जाताहेत याविषयीचे वर्णन ऐकायला मिळतेय. अशा प्रकारच्या घटना रोजच घडत असल्याचे रिपोर्टरकडून सांगण्यात येतेय.

अर्काइव्ह

भाजप समर्थक रश्मी सामंत यांनी देखील आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य लाल मल्ही (Lal Malhi) यांनी रश्मी सामंत यांचे ट्विट रिट्विट केलंय. त्यात त्यांनी मंजिन्दर सिंग सिरसा यांना देखील टॅग केलंय. ट्विट रिट्विट करताना लाल मल्ही लिहितात, 

“सदर घटना उमरकोट या त्यांच्या मूळ गावी घडलेली आहे. व्हिडिओतील महिला आदिवासी भिल समुदायाची असून हे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण आहे. सदर महिलेला आपल्या पतीपासून घटस्फोट हवा होता आणि त्यामुळे सासरच्यांनीच तिला ओढत नेले. प्रकरणातील आरोपी मुस्लिम नसून पीडित महिलेचे भिल समाजातील नातेवाईक आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.”

‘डॉन’ या पाकिस्तानी दैनिकाच्या वेबसाईटवर देखील 21 डिसेंबर रोजी या घटनेची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीनुसार पीडित महिलेचे नाव तेजन भिल असून तिने दिलेल्या माहितीनुसार ती वेहरो शरीफ येथील रहिवासी आहे. कौटुंबिक हिंसाचार सहन होत नसल्याने तिला आपला पती हेरचंद भिल याच्यापासून घटस्फोट हवा होता. त्यासाठी तिने दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर ती घरी परतत असताना हेरचंद भिल या तिच्या पतीसह आठ जणांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.

Source: DAWN

तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तिने आरडाओरडा केल्यावर तिच्या बचावासाठी पोलीस आल्याने आरोपी पळून गेले. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एक हेमो भिल याला अटक केली असल्याची माहिती देखील डॉनच्या बातमीत वाचायला मिळतेय. 

डॉनचे उमरकोट प्रतिनिधी ए बी अरीसार यांनी अल्ट न्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तेजनचे नातेवाईक मंगल भिल यांनी याप्रकरणी हेमो, भांजी, पेहलाज, सोमजी, घामन, टोगो, जयपाल ठाकूर आणि हरचंद भिल या आठ जणांविरोधात उमरकोट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप नेते मंजिन्दर सिंग सिरसा यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाला धार्मिक चिथावणीचे स्वरूप दिले आणि काही माध्यमांनी प्रकरणाची कुठलीही खातरजमा न करता पाकिस्तानातील मुस्लिमांनी दिवसाढवळ्या हिंदू महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी चालवली. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की हे एक कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण असून प्रकरणातील पीडित महिला आणि आरोपी दोघेही आदिवासी भिल समाजातील आहेत.

हेही वाचा- भाजप नेत्यांनी पोस्ट केला ‘नोएडा’ विमानतळाचा म्हणून ‘बीजिंग’ विमानतळाचा फोटो, चीनने फटकारले!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा