आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) आणि हैद्राबाद येथील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांनी संयुक्तरीत्या कोव्हॅक्सीन ही कोरोनावरील लस विकसित केली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या लसीच्या मानवी शरीरावरील चाचण्यांना २९ जून रोजी परवानगी देण्यात आली.
या घडामोडीनंतर सोशल मिडीयावर लगेचच एक फोटो व्हायरल व्हायला लागलाय. दावा करण्यात येतोय की फोटोत दिसणारी व्यक्ती भारत बायोटेकचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. के श्रीनिवास आहेत.
कोरोनावरील लसीच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यानचे हे फोटोज आहेत. टिमने विकसित केलेल्या व्हॅक्सीनचा स्वतःवर प्रयोग करणारे आपण पाहिले भारतीय असल्याचा दावा डॉ. श्रीनिवास यांनी केला असल्याचं पोस्टमध्ये सांगण्यात येतंय.
डॉक्टर श्रीनिवास यांना स्वतःवर आणि स्वतःच्या टीमवर असलेल्या विश्वासाचं आणि ते देशासाठी पत्करत असलेल्या धोक्याबद्दल त्यांचं कौतुक केलं जातंय.
ट्विटरसह व्हॉटसअॅपवर देखील तोच फोटो फिरतोय आणि साधारणतः असाच दावा करण्यात येतोय.
पडताळणी
सोशल मिडीयावर व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही ‘भारत बायोटेक’च्या वेबसाईटला भेट दिली. तिथे यासंदर्भात काही माहिती मिळतेय का हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु वेबसाईटवर अशी कुठलीही माहिती मिळाली नाही.
त्यानंतर ‘भारत बायोटेक’च्या ट्वीटर हँडलला भेट दिल्यानंतर आम्हाला एक ट्वीट सापडलं, ज्यात ‘भारत बायोटेक’कडून सोशल मिडीयावर केले जाणारे दावे नाकारण्यात आले होते.
‘भारत बायोटेक’च्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला फोटो भारत बायोटेककडून प्रसिद्धीस देण्यात आलेला नाही. प्रोडक्शन स्टाफच्या रुटीन रक्त तपासणीचा तो फोटो आहे.
वस्तुस्थिती
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला फोटो कोरोना व्हायरसवरील क्लिनिकल ट्रायल दरम्यानचा नसून, नेहमीच्या रक्त तपासणीचा आहे.
भारत बायोटेकने डॉ. व्ही.के. श्रीनिवास यांनी स्वतःवरच ‘कोव्हॅक्सीन’ या कोरोनावरील लसीचा प्रयोग केलेला नाही. सोशल मिडीयावरील व्हायरल दावे फेक आहेत.
हे ही वाचा – कोरोनाचे औषध शोधल्याचा दावा करणाऱ्यावरच प्रयोग करण्याचा कायदा ‘कॅमरून’ देशात आहे का?
Be First to Comment