पश्चिम बंगालमधील निवडणुका जवळ आल्या आहेत तसे राजकारण तापू लागलेय. ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकून नाराजी व्यक्त करत कार्यक्रम सोडला होता, परंतु त्यांचाच एक व्हिडीओ ज्यामध्ये त्या ‘इन्शाह अल्लाह’ म्हणताना दिसत असल्याचे (mamata appeasing muslims) बंगाल भाजपच्या अधिकृत अकाऊंट वरून शेअर झालाय.
‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जर पश्चिम बंगाल सरकारच्या कार्यक्रमात इस्लामी प्रार्थना वाचू शकतात, तर त्यांना जय श्रीरामने अभिवादन करण्यात का त्रास होतो?
तुष्टीकरण? त्यांनी बंगालची बदनामी केली आणि नेताजींच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेताजींच्या वारसाचा अपमान केला.’ अशा शब्दात कॅप्शन देत तो व्हिडीओ बंगाल भाजपने ट्विट केलाय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिल्या असता २ जानेवारी २०१८ रोजी युट्युबवर अपलोड करण्यात आलेला २५ मिनिटांचा मूळ व्हिडीओ आम्हाला सापडला.
बंगाल सरकारद्वारे २०१३ पासून सुरु असलेल्या ‘माटी उत्सवा’च्या अनुषंगाने झालेला तो कार्यक्रम होता. यात शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा सत्कार केला जातो. २०१८सालच्या कार्यक्रमातील या भाषणाच्या व्हिडीओमध्ये २१.३० व्या मिनिटाला ममता बॅनर्जी त्याचं भाषण संपवताना प्रत्येक धर्मास अभिवादन करताना दिसताहेत.
सर्वात आधी काली आणि दुर्गा आराधना मग अल्लाहसाठीची प्रार्थना, त्यानंतर ‘May God bless you all’, ‘वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरुजी दा फतेह’ या अशा सर्वधर्मीय देवांची आराधना करून जनतेच्या कल्याणाची प्रार्थना त्यांनी केली आणि शेवटी ‘सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा!’ असे त्या म्हणाल्या.
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कार्यक्रमात काय घडले?
२३ जानेवारी २०२१ रोजी नेताजींची १२४वी जयंती होती. सर्वपक्षीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते. ममता बॅनर्जी भाषणास उभ्या राहिल्या तशा ‘जय श्रीराम’च्या घोषणा जोर धरू लागल्या. त्यामुळे त्यांनी भाषणातच खडे बोल सुनावले आणि मध्येच भाषण बंद करत त्या निघाल्या.
“मेरेको लगता है की गव्हर्न्मेंट के प्रोग्राम का कोई डिग्निटी होना चाहिये. ये एक गव्हर्न्मेंट प्रोग्राम है, कोई पोलिटिकल पार्टी का प्रोग्राम नहीं है. ये ऑल पोलिटिकल पार्टी का, पब्लिक का प्रोग्राम है. मैं तो आभारी हुं प्रधानमंत्री का, कल्चरल मिनिस्ट्रीका, की उन्होने कलकत्तामें प्रोग्राम मनाया. लेकीन किसीको निमंत्रित करके उसको बेइज्जत करना ये आपको शोभा नहीं देता.”
अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ‘जय हिंद, जय बांग्ला’ म्हणत भाषण संपवले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भर सभेत जे खडेबोल सुनावले त्याचा बदला म्हणून ‘बंगाल भाजप’ने अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून जो व्हिडीओ शेअर केलाय तो अर्धवट आहे.
ममता बॅनर्जी यांनी २०१८सालच्या माटी उत्सवात सर्व धर्मीय देवी-देवतांची आराधना केली होती. केवळ मुस्लीम धर्मियांना खुश करण्यासाठी (mamata appeasing muslims) इस्लामशी संबंधित प्रार्थना केल्याचे दावे चुकीचे आहे. व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करण्यात येत आहे.
हे ही वाचा: ठाकरे सरकारने 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवरील ‘हिंदू’ शब्द काढून टाकलाय?
[…] हे ही वाचा: ममता बॅनर्जींचे मुस्लीम प्रेम दाखवण्… […]