सोशल मीडियात BBC न्यूजचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हिंदू दंगेखोरांसह स्वतः पोलीस कर्मचारी मुस्लीम मोहल्ल्यावर दगडफेक करताना दिसतायेत. बातमीतील का प्रतिक्रियेत एक हिंदू युवक पोलिसांनी आम्हाला दगड पुरवले असेही सांगतोय. हा सर्व प्रकार त्रिपुरा दंगलीतील असल्याचे दावे केले जात आहेत.
‘त्रिपुरा दंगे पर दलाल मीडिया ने कुछ नहीं बताया मगर बीबीसी न्यूज़ ने सारी पोल खोल कर रख दी #BBC #news’ अशा कॅप्शनसह तो २.५४ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
ट्विटर, फेसबुक सह व्हॉट्सऍपवरही हेच दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक नंदकिशोर भारसाखळे यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओतील दाव्यानुसार ऍडव्हान्सड् कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता ३ मार्च २०२० रोजी ‘BBC News India’ च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट झालेला एक व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओशी तंतोतंत जुळणारा आहे.
या ट्विटच्या कॅप्शनमध्येच हा रिपोर्ट दिल्ली दंगलीशी संबंधित असल्याचे लिहिले आहे. तसेच या व्हिडीओच्या १.३९ मिनिटाला ‘थाना खजुरा खास’ असे नाव असलेले पोलीस सहाय्यता केंद्र दिसते आहे. हे केंद्र दिल्लीच्या सोनिया विहार भागातील असल्याचे गुगल मॅप वर समजले.
‘द हिंदू‘नुसार ‘सीएए विरोधक आणि समर्थक’ अशा दोन समुदायांतील वादाचे पर्यवसान या दंगलीत झाले होते. यामध्ये एक आयबी अधिकारी, एक पोलीस आणि नागरिक असे मिळून ४२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. शेकडो जखमी झाले होते. यामध्ये पोलिसांच्या निष्क्रियतेवर आणि भूमिकेवर प्रचंड टीका झाली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की मुस्लीम समुदायाविरोधात हिंदूंना मदत करणाऱ्या पोलिसांचे व्हिडीओज दर्शवणारा BBC चा रिपोर्ट त्रिपुरा दंगलीशी संबंधित नसून २०२० सालच्या दिल्ली दंगलीतील आहे.
हेही वाचा: पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडणाऱ्यांना योगी सरकारने धडा शिकवल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]