Press "Enter" to skip to content

रामदेव बाबा यांचा ‘१ मिनिट श्वास रोखून कोरोना टेस्ट करण्याचा’ दावा सपशेल चुकीचा

रामदेव बाबा यांनी ‘एबीपी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीला कोरोना व्हायरस संदर्भात दिलेल्या मुलाखतीतील दाव्यांची बरीच चर्चा आहे. रामदेव बाबांनी दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये २.४१ मिनिटापासून पुढे रामदेव बाबांनी काही दावे केलेत. रामदेव बाबांनी केलेल्या दाव्यात ते म्हणतात ‘तुम्हाला कोरोना आहे की नाही याची टेस्ट कशी कराल? ज्याला कोरोनाचा हलकासा जरी संसर्ग झाला असेल त्याची श्वसनयंत्रणा कमजोर झालेली असेल.

कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाची फुप्पुस प्रसरण आकुंचनाची क्षमता कमी झालेली असेल त्यामुळे त्याला जोर जोरात श्वास घ्यावा लागेल. जर तुम्ही कमीतकमी एक मिनिट तुमचा श्वास रोखून धरू शकत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोरोना नाही. तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात’ कोरोना संदर्भातील व्हिडीओत बाबा रामदेव असा दावा करताना आपण पाहू शकाल.

पडताळणी:

रामदेव बाबा यांच्या या दाव्याची उलटतपसणी करताना आम्ही जगभरातील देशांना कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सल्ला देणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वेबसाईटवर शोधाशोध केली. त्यात जागतिक आरोग्य संघटनेने हा दावा स्पष्टपणे खोडून काढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ’१० सेकंद किंवा त्याहून जास्त वेळ जर तुम्ही न खोकता किंवा अगदी सहजतेने श्वास रोखून धरु शकत असाल तर याचा अर्थ असा बिलकुलच होत नाही की तुम्ही कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या किंवा इतर कुठल्याही फुप्पुसाच्या आजारांपासून मुक्त आहात.’

वस्तुस्थिती:

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे १० सेकंद किंवा त्याहून अधिक वेळ तुम्ही श्वास रोखून धरत असाल तर तुम्ही कोरोना मुक्त आहात असे अजिबात नाही. कोरडा खोकला, थकवा, ताप ही या रोगाची सामान्य लक्षणे आहेत. काही लोकांमध्ये न्युमोनिया सुद्धा आढळून येतो.

कोरोनाचा संसर्ग आहे की नाही हे जाणून घेण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे दवाखान्यात जाऊन कोरोना चाचणी करून घेणे. कोरोना चाचणीतून जे काही समोर येईल, त्यावरूनच तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही, याची खातरजमा होऊ शकते. श्वास रोखण्याने वगैरे तुम्ही घरच्या घरी कोरोना चाचणी करत असाल तर ते चूक आहे. रामदेव बाबांच्या या निराधार दाव्याला ‘चेकपोस्ट’वर अडवण्यातच आपल्या आरोग्याचे सौख्य सामावले आहे.

हे ही वाचा – ‘स्मोकर्सना कोरोनाचा सर्वाधिक धोका’ WHOने सांगितली स्पष्ट कारणे

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा