रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदने २३ जून रोजी कोरोना व्हायरसवरील ‘कोरोनिल’ हे औषध सादर केलं आणि त्याच रात्री आयुष मंत्रालयाने औषधाच्या जाहीरातीवर बंदी घातली. त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारने या औषधीवर बंदी घातली. उत्तराखंड सरकारकडून देखील पतंजलीला नोटीस बजावण्यात आली आहे.
ह्या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ जून रोजी पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा आचार्य बाळकृष्ण यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आलं. या ट्वीटद्वारे आयुष मंत्रालयासोबतचा वाद संपला असल्याचं आचार्य बाळकृष्ण यांनी जाहीर केलं.
आचार्य बाळकृष्ण यांच्या या ट्वीटनंतर लगेचच सोशल मिडीयावर आयुष मंत्रालयाकडून ‘कोरोनिल’ औषधीला परवानगी मिळाल्याचे दावे करण्यात यायला लागले.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या अकाऊंटवरून ‘कोरोनिल’ औषधीला आयुष मंत्रालयाची परवानगी मिळाल्याचं सांगण्यात आलं. हे ट्वीट ५४०० युजर्सनी लाईक आणि १७०० युजर्सनी रिट्वीट केलंय.
त्यानंतर इतरही अनेक युजर्सनी ट्वीटर आणि फेसबुकवर ही माहिती शेअर केलीये.
पडताळणी:
पतंजलीच्या ‘कोरोनिल’च्या घोषणेपासून ते आयुष मंत्रालयाने ‘कोरोनिल’ औषधीच्या जाहिरातीवर घातलेल्या बंदीपर्यंत प्रत्येक सर्व बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आहेत, मात्र ‘कोरोनिल’ला आयुष मंत्रालयाने परवानगी दिल्याची एवढी मोठी बातमी माध्यमांमधून गायब का म्हणून आम्ही पडताळणी सुरु केली.
सर्वप्रथम आम्ही आचार्य बाळकृष्ण यांनी ट्वीट केलेल्या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या पत्रात कुठेही आयुष मंत्रालय ‘कोरोनिल’ औषधीला परवानगी देत असल्याचा उल्लेख नाही.
मग आहे काय या पत्रात ?
पत्रात काय आहे हे समजून घेण्याआधी थोडा भूतकाळ समजून घ्यावा लागेल. २३ तारखेला ज्यावेळी आयुष मंत्रालयाने ‘कोरोनिल’च्या जाहिरातीवर बंदी घातली त्यावेळी आयुष मंत्रालयाकडून ‘पतंजली’कडे काही अत्यावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली.
‘पतंजली’कडून ही माहिती आयुष मंत्रालयाला पाठविण्यात आल्याची माहिती आचार्य बाळकृष्ण यांनी २३ तारखेच्या रात्री ८ वाजून २८ मिनिटांनी ट्वीट करून दिली होती. सरकार आणि आमच्यामधला ‘संवादाचा अभाव’ होता, तो दूर झाला असल्याचं सांगत आवश्यक कागदपत्रे आयुष मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचं आचार्य बाळकृष्ण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटलं होतं.
दुसऱ्या दिवशी आयुष मंत्रालयाकडून जे पत्र आल्याचा आणि ज्यामुळे वाद संपल्याचा दावा आचार्य बाळकृष्ण यांनी केला ते पत्र केवळ आदल्या दिवशी पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची पोच होती.
‘पतंजली’कडून पाठविण्यात आलेले कागदपत्रं मिळाले असून त्याची सत्यता पडताळण्यात येईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच ‘कोरोनिल’ला परवानगी देण्यासंबंधी काही एक निर्णय घेता येईल, असं सांगणारं हे पत्र आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की आयुष मंत्रालयाने अद्यापपर्यंत तरी ‘पतंजली’च्या कोरोना व्हायरसवरील ‘कोरोनिल’ ह्या औषधीला परवानगी दिलेली नाही.
‘पतंजली’ने पाठवलेल्या कागदपत्रांची पोच म्हणून जे पत्र आयुष मंत्रालयाकडून पतंजलीला पाठविण्यात आलं, ते पत्र म्हणजे आयुष मंत्रालयाची ‘कोरोनिल’ला परवानगी असल्याचा दावा केला जातोय. हा दावा धाधांत खोटा आहे.
[…] हेही वाचा: रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ औषधीला मा… […]