ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी 13 एप्रिल 2022 रोजी राजस्थानमधील जयपूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी करौली येथील हिंसाचाराच्या (Karauli Violence) संदर्भाने राज्यातील काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर टीका केली. राज्यातील काँग्रेस सरकारच्या नाकर्तेपणामुळे करौलीमध्ये हिंसाचार उसळला आणि मुस्लिम समाजाला लक्ष्य बनविण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आता ओवैसी यांच्या याच दौऱ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये समर्थकांच्या गर्दीत ओवैसी बघायला मिळताहेत. समर्थकांकडून घोषणाबाजी देखील केली जातेय. हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की ओवैसी समर्थकांकडून त्यांच्या उपस्थितीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आली.
‘झी राजस्थान’ने याच व्हिडिओच्या आधारे ओवैसींच्या उपस्थितीत पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आल्याची बातमी देखील दिली आहे.
दरम्यान, जयपूर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ‘झी राजस्थान’च्या बातमीवर प्रतिक्रिया देताना व्हायरल दावे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जयपूरचे डीसीपी मृदुल कच्छावा यांनी देखील ओवैसी समर्थकांकडून कुठलीही देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत. काही लोकांकडून यासंदर्भांत दुष्प्रचार केला जातोय. अशा प्रकारची चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे डीसीपी कच्छावा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- हिंदुत्ववादी संघटनांचा छत्तीसगडमधील मशिदीत घुसून धुडगूस? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत सम… […]
[…] हेही वाचा- असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत सम… […]