सिनेअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अमली पदार्थ बाळगणे आणि सेवन करण्याच्या आरोपाखाली अटक आहे. परंतु यात महत्वाची आणि विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत ज्यांना अटक झालीय त्यात सर्व मुले मुस्लीम आहेत तर मुली हिंदू आहेत. अशा अर्थाचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
फेसबुकवर अनेकांनी याच दाव्याच्या पोस्ट केल्या आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक कमलाकर सोनावळे यांनी व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेले याच दाव्यांचे ग्राफिक निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने आर्यन खान (Aryan Khan) ड्रग प्रकरणी अटक झालेल्या इतर आरोपींची नावे शोधण्याचा प्रयत्न केला. ‘इंडिया टीव्ही‘ने या प्रकरणासंबंधीच्या घडामोडींची आजपर्यंतची सर्व टाईमलाईन दिली आहे.
‘एनसीबी’ने क्रुझवर छापा मारून आर्यन खानसह इतर ७ जणांना अटक केली आहे. यामध्ये अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सतीजा,इश्मीत चड्डा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर यांचा समावेश आहे. या सर्वांसह ड्रग सप्लायरचाही समावेश आहे.
वरील नावांवरून हे लक्षात येते की यामध्ये समावेश असलेल्या मुली मुनमुन धमेचा आणि नुपूर सतीजा या हिंदू धर्मीय जरी असल्या तरी इतर आरोपींपैकी आर्यन खान आणि अरबाज मर्चंट वगळता सर्व मुले हिंदूच आहेत. यातही आर्यन खानची आई गौरी ही हिंदूच आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट होते की व्हायरल दावे फेक आहेत. अटक झालेल्या ८ मुलांमध्ये केवळ २ जण मुस्लीम आहेत. इतर मुले मुली हिंदूच आहेत. त्यामुळे हिंदू मुली आणि मुस्लीम मुले अशा पद्धतीचे दावे करून जाणीवपूर्वक धार्मिक सौहार्दात विरजण टाकण्याचे काम केले जात आहे.
हेही वाचा: टोस्टला थुंकी लावणारा व्हायरल व्हिडीओतील बेकरी कामगार ‘आदिल’ पोलिसांच्या ताब्यात? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]