दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरात राज्यात शिक्षण व्यवस्था खालावली असल्याचे दर्शविण्यासाठी एक ट्विट शेअर केले आहे. त्यात बोर्डाच्या परीक्षेला कसरत करत बाहेरून कॉप्या पुरविल्या जात असलेल्या एका शाळेच्या इमारतीचा फोटो आहे.
शाळेची इमारत दिसणारा फोटो असलेले एक ट्विट रीट्विट करत केजरीवाल यांनी ‘भाजपा के लोग भी गुजरात की चरमराती शिक्षा पर प्रश्न उठा रहे। पार्टी लाइन से ऊपर उठकर गुजरात में अच्छी शिक्षा के लिए आवाज़ उठने लगी है। 27 साल में भाजपा अच्छी शिक्षा नहीं दे पायी। गुजरात के लोगों और सभी पार्टियों को साथ लेकर “आप” सरकार गुजरात में भी दिल्ली की तरह अच्छी शिक्षा देगी’ असा मजकूर लिहिला आहे.
डॉ. भारत कनाबार यांनी गुजराती भाषेत ट्विट केलेला मजकूर आणि फोटो केजरीवाल यांनी शेअर केला होता. चूक लक्षात आल्यानंतर डॉ. कनबार यानी ते ट्विट डिलीट केले परंतु केजरीवाल यांचे अजूनही तसेच आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च करून पाहिला असता ९ जून २०१६ रोजी ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेली बातमी आम्हाला सापडली यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सदर फोटो बिहार येथील आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने सुद्धा याविषयी २३ मार्च २०१५ रोजी बातमी केलीय. यामध्ये असे सांगितले आहे की बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील मनहर येथील हा फोटो आहे. विद्या निकेतन स्कूलचा हा फोटो असून येथे १० वीच्या बोर्ड परीक्षा चालू होत्या. लोक दोऱ्या बांधून त्यांना लटकत पैशांच्या मोबदल्यात खिडकीतून चिठ्ठ्या पुरवत होते. एका चिठ्ठीला तिसऱ्या मजल्यावर पोहचविण्याचा दर ५० रुपये तर दुसऱ्या मजल्यावर पोहचविण्याचा दर ४० रुपये एवढा होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढताना शेअर केलेल्या ट्विटमधील फोटो गुजरातचा नसून बिहारचा आहे; तसेच तो फोटो २०१५ सालचा आहे आताचा नाही. केजरीवाल यांनी शेअर केलेले ट्विट गुजराती भाषेत असल्याने हे चित्र गुजरातचेच आहे असे समजून त्यांनी स्वतःची आणि जनतेची दिशाभूल केली.
हेही वाचा: मागच्या काही वर्षांतच मोदींचे नातेवाईक लक्षाधीश-अब्जाधीश झाल्याचे व्हायरल मेसेज फेक! वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment